विद्यापीठातील विद्यार्थिनी वसतिगृहे आणि जयकर ग्रंथालयाच्या महिला स्वच्छतागृहात सॅनेटरी नॅपकिन उपलब्ध करून देणारी आणि नष्ट करणारी यंत्रे बसवण्याचा निर्णय सोमवारी घेण्यात आला.
महाविद्यालयांच्या आणि विद्यापीठांच्या महिला स्वच्छतागृहांमध्ये ‘सॅनेटरी नॅपकिन व्हेंडिंग मशिन’ उपलब्ध करून देण्याबाबत उच्च शिक्षण विभागाने ऑक्टोबरमध्ये सूचना केल्या होत्या. त्याला महाविद्यालयांनी तर नाहीच विद्यापीठानेही प्रतिसाद दिला नव्हता. मात्र आता विद्यापीठाची सर्व विद्यार्थिनी वसतिगृहे, जयकर ग्रंथालयातील महिला स्वच्छतागृह येथे सॅनेटरी नॅपकिन उपलब्ध करून देणारी यंत्रे बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचप्रमाणे सॅनेटरी नॅपकिन नष्ट करणारी यंत्रेही बसवण्यात येणार असल्याची माहिती कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांनी दिली.
यापूर्वी विद्यापीठाच्या विद्यार्थिनी वसतिगृहात ‘सॅनेटरी नॅपकिन व्हेंडिंग मशिन’ बसवण्यात आले होते. मात्र, त्याचा विद्यार्थिनींकडून वापर करण्यात आला नाही. त्यामुळे ते मशिन तेथून हलवण्यात आले. मात्र आता उच्च शिक्षण विभागाच्या सूचनांनंतर विद्यापीठाच्या आवारात पुन्हा ही यंत्रे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. उच्च शिक्षण विभागाच्या सूचनांनंतर आता शहरातील इतर महाविद्यालयांनीही पुढाकार घेत ही यंत्रणा उभी करण्याचा निर्णय घेतला आहे.