पिंपरी-चिंचवडच्या महापौरपदाची संधी मिळाल्यानंतर २० वर्षांत कोणतेही पद न मिळाल्याने अस्वस्थ असलेले संजोग वाघेरे यांनी आता थेट लोकसभेच्या उमेदवारीसाठी फिल्डिंग लावली आहे. वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. जातीय समीकरणातून त्यांना शहराध्यक्षपद नाकारण्यात आले, हक्काचा पिंपरी मतदारसंघ राखीव झाल्याने आमदारकीची संधी हुकली. त्यामुळे खासदारकीशिवाय पर्याय नसून आता नाहीतर कधीच नाही, या भूमिकेतून ते रिंगणात उतरले आहेत.
महापौरपदावर निधन झालेल्या व खऱ्या अर्थाने लोकनेते ठरलेल्या भिकू वाघेरे यांचे संजोग चिरंजीव आहेत. भिकू पाटलांच्या पुण्याईमुळे वाघेरेंच्या घरात आजही अखंडपणे सत्ता आहे. संजोग वाघेरेंनी विधी, क्रीडा व पीसीएमटीचे सभापतिपद उपभोगले, नंतर ते महापौरही झाले. त्यांच्या पत्नी उषा वाघेरेंनी स्थायी समितीचे अध्यक्षपद भूषविले असून, सध्याही त्या पिंपरीगावचे प्रतिनिधित्व करत आहेत. वाघेरेंच्या बरोबरीने नगरसेवक असलेले गजानन बाबर खासदार आहेत. विलास लांडे, लक्ष्मण जगताप आमदार असून आझम पानसरेंकडे ‘लाल दिवा’ आहे. राखीव जागेमुळे अण्णा बनसोडे आमदार झाले. कनिष्ठ असूनही योगेश बहल शहराध्यक्ष झाले. मग, आपणास संधी का नाही, अशी सल वाघेरेंच्या मनात आहे. पिंपरी मतदारसंघ राखीव झाल्याने त्यांनी चिंचवडसाठी जय्यत तयारी केली होती, मात्र काँग्रेसला ‘धोबीपछाड’ देण्यासाठीच्या अजितदादांच्या डावपेचात वाघेरे फिट बसत नव्हते. त्यामुळे तो जुगार त्यांनी लक्ष्मण जगताप यांच्या माध्यमातून खेळला व तो यशस्वी ठरला. पुढे शहराध्यक्षपदासाठी वाघेरे स्पर्धेत होते. मात्र, दोन्ही आमदार मराठा समाजाचे असल्याने शहराध्यक्ष त्या समाजाचा नको. ‘मराठय़ांचा पक्ष’ ही प्रतिमा बदलायची असल्याचे सांगून वाघेरेंना थांबवण्यात आले. तेव्हा ते प्रचंड नाराज झाले. पक्ष सोडण्याची भाषा कार्यकर्त्यांनी केली. मात्र, ‘साहेबांशी’ असलेल्या कौटुंबिक संबंधांमुळे वाघेरेंनी तसा विचार केला नाही. आता लोकसभेचे पडघम वाजू लागताच पै-पाहुणे, मित्रपरिवार व कार्यकर्त्यांच्या जोरावर मुसंडी मारण्याचा निर्धार त्यांनी केला आहे. शहरात ‘माथेरान महोत्सव’ घेऊन त्यांनी सुरुवात केली. आता वाढदिवशी शहरभरात झालेली फलकबाजी, भरगच्च कार्यक्रम, जाहिरातबाजीतून लोकसभेची जोरदार मोर्चेबांधणीच केली आहे. चिंचवडच्या एका कार्यक्रमात वाघेरेंना ‘लोकनायक’ किताब देण्यात आला. महापौर मोहिनी लांडे यांनी आमदार किंवा खासदार व्हावे, असे वाटणे गैर नाही. मात्र, जे झेपेल तेच पद घ्या, अशा सूचक शुभेच्छा तेव्हा दिल्या. वास्तविक पालिका निवडणुकीत उषा वाघेरेंना निवडून आणण्यासाठी संजोग यांना बरेच परिश्रम घ्यावे लागले होते. पिंपरीतील चार-दोन नगरसेवक त्यांनी निवडून आणले, असेही काही नाही. त्यामुळे लोकसभेच्या रिंगणात शिवसेनेच्या बलाढय़ ताकदीसमोर ते कितपत तग धरतील, हा पक्षातील चिंतेचा विषय आहे. खरोखर त्यांना खासदारकी लढायची आहे, की दबावतंत्रातून मोठय़ा पदाची सोय करून ठेवायची आहे, असा तर्कही लढवण्यात येतो.