शि. द. फडणीस  (ज्येष्ठ व्यंगचित्रकार)

राजकीय टीकाचित्र असो किंवा एखादे मिश्कील हास्य फुलविणारे व्यंग्यचित्र; यामध्ये ते चित्र साकारणाऱ्याचे वाचन आणि त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन महत्त्वाचा ठरतो. व्यावसायिक म्हणून काम करण्यापासून ते सामाजिक, राजकीय, कविता, शालेय व विनोदी पुस्तकांच्या मुखपृष्ठांसाठी काढलेल्या चित्रांनी वाचकाच्या मनाला भिडेल, असा विषय मांडण्याचा मी प्रयत्न केला. ज्येष्ठ व्यंगचित्रकार

शि. द. फडणीस शनिवारी (२९ जुलै) ९३ व्या वर्षांत पदार्पण करीत आहेत. त्यानिमित्ताने चित्रांचा आणि त्या अनुषंगाने केलेल्या वाचनाचा हा आखीवरेखीव वाचनप्रवास खुद्द फडणीस यांनीच उलगडला.

बेळगावमधील भोज या लहान गावामध्ये आम्ही राहायचो. घरात काही प्रमाणात वाचनाचे वातावरण होते. आमच्या घरामध्ये मराठी वर्तमानपत्र आणि चित्रमय जगत असे दोन अंक यायचे. वर्तमानपत्राऐवजी चित्रमय जगतमधील चित्रे वाचण्याचे वेड मला तेव्हा लागले. चित्र उलटण्यासोबतच ती कथा किंवा घटना वाचकांसमोर मांडण्याचा चित्रमय प्रवास मी अनुभवित होतो. त्याच ‘चित्रमय जगत’च्या सुवर्णमहोत्सवी वर्षांनिमित्त केलेल्या विशेष स्मरणिकेचे मृखपृष्ठ मी साकारले, याचा मला अभिमान वाटतो. बालवयात ह. ना. आपटे यांची ‘गड आला पण सिंह गेला’ ही कादंबरी कुतूहलापोटी वाचून मी झपाटून गेलो. गावामध्ये दिवे नसायचे, त्यामुळे दिवसभर वाचन करायचे व संध्याकाळी अंधार झाला की थांबवायचे, असा काहीसा त्या वेळचा माझ्या आठवणीतील अनुभव.

चित्रकलेची आवड असल्याने व्यावसायिक कला क्षेत्रात करिअर करण्याच्या उद्देशाने मुंबईच्या जे. जे. कला महाविद्यालयात प्रवेश घेतला. त्यानंतर मुखपृष्ठ साकारण्याचे काम सुरू केले, ते ‘मोहिनी’ मासिकाच्या १९५२ च्या अंकापासून. ते मुखपृष्ठ सगळ्यांना खूप आवडले आणि माझ्याकडून पुस्तकांचे मुखपृष्ठ साकारण्याच्या कामाला सुरुवात झाली. पुस्तकांची अंतर्बाह्य सजावट करण्याचे दोन प्रकारांत काम असे. त्यामुळे बहुतांश वेळा एखादे पुस्तक आवडो वा नावडो, ते पुस्तक वाचायला लागत असे. पु. ल. देशपांडे यांचे ‘अपूर्वाई’, ‘चिमणरावचे चऱ्हाट’, व. पु. काळे यांचे ‘रंगपंचमी’, गो. नी. दांडेकर यांचे ‘पूर्णामायची लेकरं’, दिलीप प्रभावळकर यांचे ‘चिमणरावचा गजरा’, रमेश मंत्री यांचे ‘एक हाती टाळी’ अशी अनेक पुस्तके चित्रं साकारण्याकरिता वाचली. यानिमित्ताने पत्नी शकुंतला फडणीस हिचे ‘मी आणि हसरी गॅलरी’ हे पुस्तक मी वाचले.

चित्रांच्यानिमित्ताने ललितेतर साहित्य वाचन झाले. त्यामध्ये बँकिंग, गणिती तर्कशास्त्र, इमारतींबद्दल स्वस्त वास्तू, व्यवस्थापन, बांधकाम अशा विविध विषयांसाठी चित्रं रेखाटली. केंद्र सरकारच्या योजनांशी निगडित काही पुस्तकांच्या मुख्यपृष्ठांसाठी मी चित्रे करीत होतो. हे करताना वाचनाचा छंद सुरुच होता. वेगळा बाज असलेली पुस्तके मला विशेष आवडत होती. ‘पेशवेकालीन महाराष्ट्र’ या पुस्तकात युद्ध वगळता इतिहास देण्यात आला होता. तर, गजानन जहागीरदार यांचे ‘पाऊलखुणा’, श्यामला शिरोळकर यांचे महाराष्ट्रातील सर्कसचा इतिहास सांगणारे ‘सर्कस सर्कस’, आनंद अंतरकर यांचे ‘रत्नकीळ’, दया पवार यांचे ‘बलुतं’ अशी वेगळी पुस्तके मी आवडीने वाचली. कुमार गंधर्व यांचे ‘कालजयी’ हे पुस्तक मला भेट मिळाले. त्यामध्ये त्यांचा जीवनप्रवास, वेगळ्या वाटेने गेलेले व्यक्तिमत्त्व म्हणून उत्तमप्रकारे वर्णन केले आहे.  मराठीसह इंग्रजी पुस्तकांचेही वाचन मला आवडते. त्यामुळे ‘पिकासो- मास्टर ऑफ द न्यू’ आणि नॉर्मन रॉकवेल यांच्या पुस्तकांचा संग्रह माझ्याकडे आहे. लंडनला प्रदर्शनासाठी गेलो असताना ही पुस्तके घेण्याची संधी मला मिळाली. कलाविषयक शिल्पकार चरित्रकोश, सुहास बहुळकर यांचे ‘बॉंम्बे स्कूल’ ही पुस्तके माझ्या संग्रहात आहेत. चित्र आणि वाचनप्रवासात विविध मान्यवरांशी प्रत्यक्ष भेटण्याची संधी मला मिळाली. त्यामुळे चित्रकार, छायाचित्रकार आणि वेदाभ्यास करणारे वेदमहर्षी पं. सातवळेकर या व्यक्तिमत्त्वाचे चरित्र मी वाचले. काही पुस्तके मी आवर्जून विकत घेतली. ‘तुकोबांचे अभंग’ या पुस्तकामध्ये विडंबन आणि उपहासात्मक पद्धतीने समाजप्रबोधनाचा मार्ग सांगितला आहे. त्यावरुन दहा वर्षांपूर्वी मी ‘अभंगचित्र’ ही चित्रमालिका साकारली. पुस्तकातील संदर्भ आणि केलेल्या नोंदी या वेळी मला उपयोगी पडल्या.

माझ्या वाचनप्रवासात अनेकदा काही गोष्टींविषयी अडचणी आल्या. त्याची उत्तरे शोधण्याकरिता ब्रिटिश कौन्सिल लायब्ररी, मुंबईतील आर्ट सोसायटी ऑफ इंडिया या संस्थांच्या ग्रंथालयामध्ये मी जात असे. माझे शेजारी असलेले द. मा. मिरासदार हे आवडते लेखक. त्यांची अनेक पुस्तके माझ्या संग्रहात आहेत. त्यांच्या ‘गप्पाष्टक’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ मी साकारले होते. त्यामध्ये वेळेचे भान दाखविण्याचा व्यंग्यचित्राच्या माध्यमातून केलेला प्रयत्न सर्वाच्याच पसंतीस उतरला होता. पुस्तकांचे मुख्यपृष्ठ करताना कथेचे सार समजून घेण्यासोबतच माझ्या कल्पनाविष्काराचा उपयोग मी केला. या विषयी मला लेखकांनी स्वातंत्र्य दिले. त्यामुळे सर्वप्रथम मराठी मासिकांवर बहुरंगी विनोदी मुखपृष्ठे रुजविणे मला शक्य झाले. राजकीय टीकाचित्रामध्ये मी रमलो नाही. परंतु राजकीय टीकाचित्रकार व्हायचे असेल, तर चालू घडामोडींसह इतिहासाचे सखोल वाचन महत्त्वाचे आहे. त्या विषयाचे सर्वागीण वाचन असल्यास प्रभावी राजकीय व्यंग्यचित्र रेखाटणे शक्य होते. सामान्यांच्या मनाला भिडतील अशी चित्रे साकारण्याकरिता किमान वाचन गरजेचे आहे. समाजाच्या ज्या घटकासाठी चित्र काढतो, त्या घटकाविषयीचे वाचन व अभ्यास करायला हवा. त्यामुळे अगदी कायद्यापासून ते कवितांपर्यंत विविध पुस्तकांच्या वाचनानेच मी पुस्तकांना सचित्र करु शकलो. माझे अवांतर वाचन सुरू असून माणसाच्या मनातील गुंतागुंत सोडविण्यास चित्रांचा आधार घेत विचार मांडण्याचा प्रयत्न मी सातत्याने करीत आहे.