घरात एकटय़ा असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना चोरटय़ांकडून लक्ष्य करण्याच्या घटना पुन्हा शहरात घडू लागल्या आहेत. बुधवारी सहकारनगर येथे घरात एकटय़ा असलेल्या एका वृद्ध महिलेवर हल्ला होण्याची घटना ताजी असतानाच गुरुवारी विमाननगर येथे चोरीसाठी एका वृद्ध नागरिकाचा चाकूने वार करून खून करण्यात आला. या घटना पाहता घरात एकटे असणारे ज्येष्ठ नागरिक चोरटय़ांकडून पुन्हा लक्ष्य करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे.
घरात एकटय़ा असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांवर हल्ला करून चोरी करण्याच्या गंभीर घटना पुणे शहरामध्ये मागील काही वर्षांमध्ये घडल्या होत्या. याची दखल घेऊन पोलिसांनी घरात नेहमीच एकटय़ा राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची माहिती घेऊन याबाबत उपाययोजना केल्या होत्या. मागील दोन दिवसांमध्ये शहरात अशा प्रकारच्या पुन्हा दोन घटना घडल्या. यातील ज्येष्ठ नागरिक घरात एकटे राहत नसले, तरी त्यांचे कुटुंबीय बाहेर गेले असल्याने घटनेच्या वेळी ते घरात एकटेच होते. हीच बाब हेरून त्यांच्यावर हल्ला करण्यात आला.
सहकारनगरमध्ये बुधवारी पत्ता विचारण्याच्या बहाण्याने घरात शिरलेल्या अज्ञात व्यक्तीने वृद्ध महिलेवर हल्ला केला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी विमाननगर भागामध्ये चोरीच्या उद्देशाने घरात शिरलेल्या चोरटय़ाच्या हल्ल्यामध्ये एका वृद्ध नागरिकाचा मृत्यू झाला. सतीशचंद्र गोपाळराव द्रविड (वय ८६, रा. लुंकड, व्हेलेनशिया, फ्लॉट क्र. ३०१, विमाननगर) असे मृत्यू झालेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. गुरुवारी द्रविड यांची पत्नी व मुले गणपतीच्या प्राणप्रतिष्ठेसाठी एका नातलगाकडे गेले होते.
द्रविड हे आजारी असल्याने ते एकटेच घरी होते. त्या वेळी एक अज्ञात चोरटा घरात शिरला. त्याने द्रविड यांच्यावर चाकूने हल्ला केला. मानेवर चाकूचे वार झाल्यामुळे द्रविड यांचा मृत्यू झाला. त्यानंतर चोरटय़ाने घराच्या कपाटातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम मिळून एक लाख ३० हजारांचा ऐवज चोरून नेला. द्रविड यांचे कुटुंबीय रात्री सव्वाआठच्या सुमारास घरी आल्यानंतर हा प्रकार उघड झाला. ज्येष्ठ नागरिकांच्या बाबतीत घडत असलेल्या या गंभीर घटनांबाबत पोलिसांनी तातडीने कठोर पावले उचलून कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.