पिंपरी पालिकेतील कारभार भ्रष्ट असल्याचा आरोप करत भाजपने बुधवारी सभेच्या दिवशीच मुख्यालयात आंदोलन केले. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांच्या निषेधार्थ ‘हाय-हाय’ ची जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. स्थायी समितीने सात महिन्यात २०४ कोटींचे प्रस्ताव ऐनवेळी मंजूर केले आणि ‘निवडणूक फंड’ गोळा करण्यासाठी सत्ताधारी नेत्यांनी १३५ कोटींचे वाढीव खर्च मंजूर केल्याच्या आरोपांचा पुनरूच्चार करून त्याच्या चौकशीची मागणी आंदोलकांकडून करण्यात आली.

भाजपचे माजी शहराध्यक्ष सदाशिव खाडे, एकनाथ पवार, सरचिटणीस सारंग कामतेकर, नगरसेविका सीमा सावळे, आशा शेंडगे आदींसह जवळपास २५० कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते. दुपारी दोन वाजता सभा होणार होती. तत्पूर्वी, एक वाजता भाजप कार्यकर्त्यांनी प्रवेशद्वारासमोर ठिय्या केला. पालिकेतील राष्ट्रवादीच्या विषेशत: स्थायी समितीच्या भ्रष्ट कारभारावरून घोषणाबाजी करण्यात आली. या वेळी ‘भ्रष्टवादी-राष्ट्रवादी’ आणि ‘अजित पवार हाय-हाय’ घोषणा देऊन पालिका परिसर दणाणून सोडण्यात आला. करदात्या नागरिकांची लूट थांबवा, विकासाच्या नावाखाली सुरू असलेला भ्रष्टाचार बंद करा आदी घोषणा देत होत्या. यासंदर्भात, आंदोलकांच्या वतीने नगरसेविका सीमा सावळे यांनी पत्रकारांना सांगितले की, कोटय़वधी रूपयांचे विषय आयत्यावेळी आणून मंजूर केले जातात. थेट निविदा निघाल्यानंतर त्याची माहिती कळते. राष्ट्रवादीचा हा गोलमाल व्यवहार चव्हाटय़ावर आणण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले.