पिंपरीत आतापर्यंत पाच जणांना बिनविरोध निवडीचा ‘मान’

‘श्रीमंत’ पिंपरी महापालिकेच्या आतापर्यंतच्या प्रवासात ‘बिनविरोध’ निवडणूक करण्याची किमया अनेकांनी साधली आहे. एखाद्या प्रभागात विरोधी उमेदवारच रिंगणात उतरत नाही, यामागे विशिष्ट ‘शास्त्र’ आहे, तितकेच पक्षीय राजकारण व ‘अर्थकारण’ही आहे. प्रमुख नेत्यांचे संगनमत असल्याशिवाय बिनविरोध निवडणूकजिंकू शकत नाही, हे उघड गुपित आहे. पालिकेच्या २५ वर्षांच्या इतिहासात बिनविरोध निवडून येण्याचा ‘मान’ पाच जणांना मिळाला आहे.

[jwplayer VXgwZHOX]

पिंपरी महापालिकेची स्थापना १९८६ मध्ये झाली. त्यानंतरच्या दुसऱ्याच वर्षांत आझम पानसरे (१९८७) बिनविरोध निवडून आले. त्यानंतर, उषा गजभार (१९९७), जावेद शेख (२००७), शकुंतला धराडे आणि रामदास बोकड (२०१२) हे बिनविरोध नगरसेवक म्हणून निवडून आले. १९८६ च्या निवडणुकीत चिंचवड स्टेशन परिसरातून फकिरभाई पानसरे निवडून आले होते. थोडय़ाच कालावधीत त्यांचे निधन झाले. तेव्हाच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या तिकीटावर आझम पानसरे बिनविरोध निवडून आले होते. पुढे, पानसरे बिनविरोध महापौरही झाले. १९९७ च्या निवडणुकीत खराळवाडी परिसरातून काँग्रेसच्या उषा गजभार बिनविरोध निवडून आल्या. सध्याचे नगरसेवक कैलास कदम यांनी ती ‘किमया’ साधली होती. २००७ मध्ये राष्ट्रवादीचे जावेद शेख आकुर्डी प्रभागातून बिनविरोध निवडून आले. तेव्हाच्या परिस्थितीत शेख यांची गुन्हेगारी पाश्र्वभूमी होती, त्याचा  त्यांना बऱ्यापैकी उपयोग झाला होता. २०१२ मध्ये राज्यभरात निवडणुकांचा राजकीय आखाडा रंगला असताना राष्ट्रवादीने पिंपरीत प्रत्यक्ष मतदानाला सामोरे जाण्यापूर्वी एकाच वेळी दोन जागा बिनविरोध काढल्या होत्या. राष्ट्रवादीचे तत्कालीन आमदार लक्ष्मण जगताप यांच्या ‘धडाडी’ने पिंपळे गुरव या एकाच गावातून शकुंतला धराडे व रामदास बोकड दोन्ही बिनविरोध निवडून आणले.

मध्यंतरी अण्णा बनसोडे यांनी स्थायी समितीचे अध्यक्षपद बिनविरोध काढण्याची किमया साधली होती. सहानुभूतीचा विषय वगळला, तर एखादी निवडणूक बिनविरोध करण्यासाठी बरेच उद्योग करावे लागतात. पक्षीय पातळीवर संगनमत आणि अर्थकारण हे महत्त्वाचे घटक ठरतात. सन २०१२ मध्ये एकाच गावातून दोन जण बिनविरोध झाले, त्यामागे अर्थकारण झाल्याची चर्चा उघडपणे झाली होती. पिंरीत पाच जण बिनविरोध नगरसेवक होण्यात यशस्वी झाले असले, तरी भोसरी, पिंपळे गुरव आदी भागात तसे आणखी प्रयत्न झाले होते. मात्र, त्यात यश मिळू शकले नव्हते. २०१७ च्या निवडणुकीतही काही जागांवर बिनविरोध निवडणुका करण्याच्या जोरदार हालचाली सुरू आहेत.

[jwplayer 8KwdNmdB]