‘मला सत्ता द्या, महाराष्ट्र सुतासारखा सरळ करतो, असे म्हणणाऱ्या राज ठाकरे यांच्या मनसेची राज्यभरात दाणादाण उडाली, तोच प्रकार पिंपरी-चिंचवडमध्येही झाला. भोसरी, पिंपरी व चिंचवड या तीनही मतदारसंघातील उमेदवारांचा दारुण पराभव झाला असून त्यांची अनामत रक्कम जप्त झाली आहे. अशीच परिस्थिती कायम राहिल्यास महापालिका निवडणुकीतही मनसेला ‘नो एन्ट्री’ला सामोरे जावे लागेल, अशी शक्यता नाकारता येणार नाही.
राज्यात सत्ता स्थापन करण्याची व स्वत: मुख्यमंत्री होण्याची महत्त्वकांक्षा असलेल्या राज ठाकरे यांच्या मनसेला मतदारांनी पूर्णपणे नाकारले. राज्यभरातून जुन्नरचे शरद सोनवणे हे एकमेव आमदार निवडून आले, त्यातही त्यांचे वैयक्तिक योगदानच मोठे आहे. पिंपरी-चिंचवड शहरात मनसेची पुरती दाणादाण उडाली. भोसरीचे उमेदवार सचिन चिखले यांना चार हजार २३१, पिंपरीच्या उमेदवार अनिता सोनवणे यांना ५ पाच १६९ आणि चिंचवडचे मनसेचे उमेदवार अनंत कोऱ्हाळे यांना ८ हजार २१७ मते मिळाली. या तीनही उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे. महापालिका निवडणुकीत मनसेचे चार नगरसेवक निवडून आले होते तेव्हा राज ठाकरे शहरात फिरकलेदेखील नव्हते. अनेक उमेदवार पराभूत झाले, तरीही त्यांनी घसघशीत मते मिळवली होती. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत मनसे उमेदवार लक्षणीय मते घेतील, असा विश्वास पक्षाच्या नेत्यांना होता. तथापि, तसे होऊ शकले नाही. मनसेला राज्यातील जनतेप्रमाणे िपपरी-चिंचवडकरांनीही नाकारले. राज यांनी पिंपरी-चिंचवड शहराच्या राजकारणात, येथील प्रश्नांमध्ये कधी लक्ष घातले नाही. लोकसभा निवडणुकीत अनधिकृत बांधकामे पाडण्याचे विधान त्यांनी केले. पक्षात संघटनात्मक पातळीवर प्रचंड कुरबुरी आहेत, असे अनेक मुद्दे दारुण पराभवास कारणीभूत ठरले. सध्याच्या परिस्थितीत सुधारणा न झाल्यास मनसेला पालिकेच्या राजकारणात प्रवेशबंदी होण्याचा धोका पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना वाटतो आहे.