मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर प्रवासी वाहतूक करणाऱ्या भरधाव कारचा अपघात होऊन दोन प्रवासी जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झाला. ही कार पुण्याच्या दिशेला जात होती. हा अपघात आज (मंगळवार) सकाळी सहाच्या सुमारास ओझर्डे गावच्या हद्दीतील आढेगावजवळ झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईहून सकाळी प्रवासी वाहतूक कार प्रवासी घेऊन पुण्याच्या दिशेने येत होती. आढेगावजवळ आल्यावर चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने ती थेट रस्त्यालगत असलेल्या ५० फूट खोल ओढ्यात पडली. यात दोघा जणांचा जागीच मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झाला. शशिकांत प्रितम साळुंखे, राहुल राजगुरू अशी मृत तरुणांची नावे आहेत. प्रतीक अमरे हा तरुण जखमी झाला आहे. तिघेही पुण्यातील रहिवासी असून प्रतीक अमरे याच्यावर सोमाटणे फाटा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.  या अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.