‘विनोद अँड सरयू दोशी फाऊंडेशन’तर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘विनोद दोशी नाटय़महोत्सवा’त याआधी बघायला न मिळालेल्या नावीन्यपूर्ण नाटय़प्रयोगांच्या मेजवानीचा आस्वाद पुणेकरांना घेता येणार आहे. २२ ते २६ फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवात केवळ मराठीच नव्हे तर हिंदी, इंग्रजी आणि पंजाबी भाषेतील मिळून आठ प्रयोग सादर होणार आहेत.
संस्थेच्या सरयू दोशी, महोत्सवाचे प्रमुख अशोक कुलकर्णी यांनी ही माहिती दिली. हा महोत्सव सशुल्क असून त्याची तिकीटविक्री बुधवारपासून सुरू झाली आहे. पाँडिचेरी येथील ‘आदिशक्ती लॅबोरेटरी फॉर थिएटर’ निर्मित कुडिअट्टम नाटय़पद्धती व लोकसंगीताचा वापर करणाऱ्या ‘गणपती’ या नाटय़प्रयोगाने महोत्सवाची सुरुवात होईल. दिवंगत रंगकर्मी वीणापाणी चावला यांनी हे नाटक दिग्दर्शित केले आहे.
‘आसक्त कलामंच’चे ‘मैं हूं यूसुफ और ये हैं मेरा भाई’ हे हिंदी-उर्दू नाटक १९४८ मधील इस्राएल-पॅलेस्टाईनमधील युद्धाच्या पाश्र्वभूमीवर बेतलेले असून मोहित टाकळकर यांनी त्याचे दिग्दर्शन केले आहे. पुण्यातील ‘नाटक कंपनी’ या गटाचे ‘सिंधू, सुधाकर, रम आणि इतर’ हे नाटक ‘एकच प्याला’ या नाटकाचे आधुनिक रूप आहे. तरुण दिग्दर्शक आलोक राजवाडे यांनी दिग्दर्शित केलेल्या या नाटकाचे लेखन आशुतोष पोतदार यांनी केले आहे. मुंबईच्या ‘तमाशा थिएटर’चे ‘ब्लँक पेज’ या नाटकात कविता व संगीताच्या आधारे विषय मांडला आहे, तर ‘बीज’ गटाच्या ‘रेज अँड बीयाँड- इरावतीज गांधारी’ या नाटकात इरावती कर्वे यांच्या ‘युगांत’मधील उताऱ्यांवर आधारित गांधारीची कथा मांडली आहे. चंढीगडच्या ‘द कंपनी’ या गटाच्या व नीलम मानसिंग यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘नाग मंडल’ या गाजलेल्या पंजाबी नाटकाने महोत्सवाचा समारोप होईल. हे नाटक गिरीश कर्नाड यांच्या नागमंडल याच नावाच्या नाटकावर आधारित आहे.