निवडणुकीआधी काँग्रेसमध्ये सामील झालेल्या नवज्योत सिंग सिद्धू यांच्यावर शिरोमणी अकाली दलाचे नेते आणि पंजाबचे उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांनी जोरदार टीका केली आहे. ‘सिद्धू हे मानवी बॉम्ब आहेत. या मानवी बॉम्बचा झाल्याने नुकसान होऊ शकते,’ अशा शब्दांमध्ये सुखबीर सिंग बादल यांनी नवज्योत सिंग सिद्धू यांच्यावर तोंडसुख घेतले आहे.

‘सिद्धू सहा महिन्यांपूर्वी काँग्रेसच्या विरोधात बोलत होते. आता ते काँग्रेसकडून बोलत आहेत. त्यांच्या अहंकारामुळे हे घडले आहे,’ असे सुखबीर सिंग बादल यांनी म्हटले आहे. ‘सिद्धू म्हणजे मानवी बॉम्ब आहे. या बॉम्बच्या स्फोटामुळे मोठे नुकसान होऊ शकते. सिद्धू यांना प्रचंड अहंकार आहे. सहा महिन्यांनंतर सिद्धू काँग्रेस पक्ष सोडून राहुल गांधींच्या विरोधात बोलतील, याची मला खात्री आहे,’ असे म्हणत सुखबीर सिंग बादल यांनी सिद्धू यांच्या काँग्रेस प्रवेशावर टीका केली.

नवज्योत सिंग सिद्धू यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करताना भाजपला कैकयी आणि काँग्रेसला कौसल्या म्हटले होते. सिद्धू यांच्या या विधानाचा समाचार घेताना सुखबीर सिंग बादल यांनी खालच्या पातळीवर जाऊन टीका केली. ‘नवज्योत सिंग सिद्धू दररोज आई बदलत असतात. सिद्धू यांच्यापेक्षा वाईट व्यक्ती असू शकत नाही,’ अशा शब्दांमध्ये सुखबीर सिंग बादल यांनी सिद्धू यांच्या टिकेला प्रत्युत्तर दिले.

काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर नवज्योत सिंग सिद्धू यांनी शिरोमणी अकाली दलावर शरसंधान साधले होते. ‘जे सरकार लोकांचे असायला हवे होते, ते आता फक्त एका कुटुंबाचे आहे. पंजाबची अवस्था दयनीय करणे, हेच या सरकराचे उद्दिष्ट आहे. माझा लढा हा वैयक्तिक नाही. माझा संघर्ष पंजाबच्या अस्तित्वासाठी आणि अस्मितेसाठी आहे. संपूर्ण देशासाठी धान्याचे कोठार असणारे राज्य कर्जबाजारी कसे झाले, याचा विचार व्हायला हवा,’ अशा शब्दांमध्ये सिद्धू यांनी शिरोमणी अकाली दल आणि सुखबीर सिंग बादल यांच्यावर हल्लाबोल केला होता.