आपल्या पदाचा राजीनामा दिलेले भाजपचे पंजाबमधले प्रदेशाध्यक्ष विजय सांपला यांनी भाजप अध्यक्ष अमित शहांची आज दुपारी भेट घेतली. या भेटीनंतर आपण राजीनामा दिल्याचं वृत्त खोटं आहे असा दावा त्यांनी केला. पंजाबमध्ये पुढच्या महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी भाजपच्या सर्व उमेदवारांना आपला पाठिंबा असल्याचे सांपला यांनी म्हटले.

आजच्या भेटीत अमित शहांनी विजय सांपला यांना दम भरल्याचं कळतंय. आपल्या असंतोषाला जाहीरपणे वाचा फोडणाऱ्या विजय सांपलांविषयी पक्षात नाराजी असल्याचं अमित शहांनी त्यांना सांगितलं. ४ फेब्रुवारीला होणाऱ्या पंजाबच्या निवडणुकांसाठी प्रचारात स्वत:ला झोकून द्या असं त्यांना शहांनी सांगितलंय

पंजाब निवडणूक भाजपमधील कलहामुळे चर्चेचा विषय ठरली आहे. सर्वप्रथम नवज्योतसिंग सिध्दू आणि त्यांच्या पत्नीने पक्षाला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष विजय सांपला हेदेखील नाराज असल्याचे वृत्त आहे. सोमवारी भाजपने निवडणुकीतील उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये फगवाडामधून सोमप्रकाश यांना उमेदवारी देण्यात आली असून सांपला यांनी सोमप्रकाश यांच्या उमेदवारीला विरोध दर्शवला होता. मात्र त्यानंतरही सोमप्रकाश यांना उमेदवारी दिल्याने सांपला नाराज आहेत. त्यांनी पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा सोपवला होता.

विजय सांपला हे मोदी यांच्या मंत्रिमंडळात केंद्रीय राज्यमंत्रीदेखील आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर सांपला यांची नाराजी ही पक्षासाठी तापदायक ठरु शकते. सांपला हे दलित कुटुंबातून आले असून गेल्या वर्षीच भाजपने त्यांची प्रदेशाध्यपदी निवड केली होती. राज्यात दलित मतदारांची संख्या ३० टक्क्यांहून अधिक असल्याने भाजपने सांपला यांना पुढे केले होते.

दरम्यान, पतियालामधील भाजपच्या दोन नेत्यांनीही सोमवारी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. भारतीय जनता युवा मोर्चाचे पतियालामधील अध्यक्ष चरणजित सिंग मंगी आणि उपाध्यक्ष मीता समना या दोघांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. पंजाबमध्ये ४ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. ११७ आमदार असलेल्या पंजाबमध्ये ९४ जागांवर अकाली दल तर उर्वरित जागांवर भाजप निवडणूक लढवणार आहे. अंमली पदार्थ आणि भ्रष्टाचारावरुन अकाली दलवर काँग्रेस आणि आम आदमी पक्षाने टीका केली आहे. आपमुळे पंजाबमध्ये तिरंगी लढत होणार आहे.

रविवारी नवज्योतसिंग सिद्धू  यांनी भाजपला रामराम करत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ही तर माझी घरवापसी असल्याने सिध्दू यांनी म्हटले होते. भाजपला कैकेयीची उपमा देत सिध्दू यांनी अकाली दलवरही जोरदार टीका केली होती. भाजपने मित्र पक्षाची निवड केली, तर मी पंजाबची निवड केली. काँग्रेसमध्येच मला पंजाबचे हित दिसते असे त्यांनी म्हटले होते. भाजपमधील या संघर्षाचा फायदा काँग्रेसला होणार का यावर चर्चा रंगली आहे.