हिटलरने जर्मन समाज हा शुद्ध आर्य अतएव सर्वश्रेष्ठ वंश असल्याचा दावा केला. या वंशाचा भूतकाळ त्याच्या लेखी अर्थातच गौरवास्पद होता. मात्र याच वंशाने जगावर राज्य गाजवणे हे भवितव्याचे स्वप्न त्याने जर्मनांना दिले.           ते जर्मन-समाजवास्तवाचा भाग बनले.  या प्रकाराची परिणती शेवटी महायुद्धात झाली,जर्मनीचा नाश ओढवला व त्याहीपेक्षा महत्त्वाची बाब, ज्याला त्याने शत्रू मानून जगातून नष्ट करण्याचा चंग बांधला होता, त्या यहुद्यांच्या स्वप्नाची पूर्ती होऊन इस्रायलची निर्मिती होणे शक्य झाले.  
‘Societal fact’ हा शब्द बहुधा दुर्खाइम या फ्रेंच समाजवैज्ञानिकाने रूढ केला. त्याच्या पुढे-मागे जाणारा ‘समाजवास्तव’ असा शब्दप्रयोग आपण करू शकू. जाती, वर्ग ही अशी समाजवास्तवेच आहेत. आपल्याकडील बौद्ध विचारवंत त्याचप्रमाणे पाश्चात्त्य विचारविश्वातील नाम(मात्र) वादी (Nominalist) तत्त्ववेत्ते भले अशा समाजवास्तवांना वैचारिक संरचना म्हणोत. व्यवहारात या वास्तवावरून किती कलह व संघर्ष होत असतात हे आपण जाणतो. तेव्हा या वास्तवांचे स्वरूप काय असते हे जरूर समजून घेतले पाहिजे.
पहिली गोष्ट अशी आहे, की ही वास्तवे अर्थातच वर्तमानकाळातच असतात. आपल्यासमोर, सभोवती, मागे-पुढे असतात. एका अर्थाने आपण स्वत:सुद्धा त्यांचे घटक किंवा हिस्सेच असतो; पण ती आपण म्हणजे एखाद्या दुसऱ्या व्यक्तींनी बनवलेली असतात असे नाही. ती तशी व्यक्तींनीच बनलेली असतात. तिच्या घटकव्यक्ती वगळल्या, तर ती अस्तित्वात नसणार हे उघड आहे; पण ती ज्या व्यक्तींनी बनलेली, घडलेली असतात, त्याच व्यक्तींनी बनवलेली, घडवलेली असतात असे मात्र नाही. खूप वेळा व्यक्ती जन्माला येते, वाढते ती या वास्तवातच किंवा वास्तवाचा घटक म्हणूनच. या अर्थाने ही वास्तवे व्यक्तिनिरपेक्ष असतात आणि मुख्य म्हणजे अनेकदा व्यक्तीचे वर्तन नियंत्रित करीत असतात. या वास्तवाचा भागच असलेल्या व्यक्तींना त्यांची ही नियंत्रणशक्ती जाणवतही नाही. इतक्या सहजपणे ही प्रक्रिया घडते. अर्थात, असे जाणवण्याचे व त्यामुळे हतबलता व अगतिकताही अनुभवण्याचे, इतकेच नव्हे तर प्रसंगी त्याविरुद्ध बंडखोरी करण्याचे प्रसंगही व्यक्तीच्या जीवनात येतात. सामाजिक परिवर्तनासाठी हे आवश्यकही असते. एरवी कधी सहजगत्या, कधी यांत्रिकपणे, कधी जाणीवपूर्वक स्वेच्छेने, तर कधी मर्जीविरुद्ध अनिच्छेने व्यक्ती वास्तवशरण होऊन जगत असतात.
व्यक्ती समाजवास्तवाचा भाग म्हणूनच समाजवास्तवात अवतरते. याची एक निष्पत्ती म्हणजेच या वास्तवांची ऐतिहासिकता. समाज हा शब्द विस्ताराने लहान असलेला एखादा समाजगट या अर्थाने घ्या किंवा अत्यंत व्यापक अर्थाने मानवी प्रजाती (Human Species) या अर्थाने घ्या. कोणत्याही विशिष्ट काळातील वर्तमान समाजवास्तव हे ऐतिहासिकच असते. ते घडत आलेले असते व घडण्याचा इतिहास त्या समाजात कथा, मिथके, लोकगीते, लोककहाण्या, विधी (rituals) या इत्यादींच्या रूपात टिकवून धरून संक्रमित केला जातो. याचे सर्वाना परिचित व प्रभावी उदाहरण म्हणजे यहुदी लोकांमधील त्यांच्या मूळ भूमीची कल्पना. यहुदी समाजाच्या या ऐतिहासिकतेमुळे या समाजाला जगण्यासाठी आवश्यक असलेली अस्मिता आणि आधार मिळाले. अशी ऐतिहासिकता समाजाला जगण्यासाठी उत्साह आणि ऊर्जा देते, त्याचप्रमाणे जगण्यासाठी दिलासा आणि धीरही देते. समाजाबाहेरील लोकांना असे प्रकार अनाकलनीय किंवा प्रसंगी हास्यास्पदही वाटू शकतात. त्यांचे बुद्धिवादी विश्लेषण करून त्यांना थोतांड ठरवण्याची घाईसुद्धा केली जाते; पण प्रकरण एवढे सोपे कधीच नसते.
याच ऐतिहासिकतेचा वारंवार उच्चार करून ती अधोरेखित करण्याची गरज समाजाला वाटते. एरवी स्वातंत्र्य दिन, क्रांती दिन, संचलने, समाजनायकांच्या जयंत्या, पुण्यतिथ्या हा काय प्रकार असतो? इतिहासाला इतिहासजमा होऊ न देता सतत वर्तमानाचा हिस्सा बनवत जाणे ही मानवसमाजाची गरजच असते. तो Human Conditions चाच भाग आहे. मग असे तत्त्वज्ञ उपदेशक वर्तमानात जगण्याचा कितीही सल्ला देवोत.
कधी कधी ही ऐतिहासिकता समाजाच्या प्रगतीच्या मार्गात अडथळा आणते हेही लक्षात घ्यायला हवे. अशा वेळी इतिहासाचे हे ओझे झुगारून द्यायची गरज निर्माण होते. समाजात जागृत विचारवंत असतील, तर ते अशा वेळा ओळखू शकतात व समाजाचा रोष पत्करून तसे सांगण्याचे धाडसही करू शकतात. एकोणिसाव्या शतकात विशेषत: ब्राह्मणांसाठी हे काम लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांनी केले; पण ते करताना त्यांनी एक टोक गाठले, तेव्हा विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी याच ऐतिहासिकतेला सकारात्मक आशय देऊन तिचा राजकीय जागृतीसाठी उपयोग करून घेतला.
ऐतिहासिकतेचा हा प्रश्न अमेरिकेला किंवा सोविएत युनियनला फारसा पडला नाही. अमेरिकेला मुळात फारसा इतिहासच नाही. रशियाला तो होता; पण साम्यवादी समाजाच्या निर्मितीनंतरच मानवाचा खरा इतिहास सुरू होतो. या मार्क्‍सच्या वचनानुसार त्याला त्यांच्याकडे दुर्लक्ष करता आले!
 चीनने आपली सारी ऐतिहासिकता सांस्कृतिक क्रांतीच्या नावाखाली जणू पुसूनच टाकली.
इतिहास हे एक विलक्षण रसायन आहे. त्याचा उत्साहवर्धक टॉनिक म्हणून उपयोग करता येतो. त्याप्रमाणे गुंगवून, गुंतवून स्मरणरंजनाची नशाही बनवता येते. समाजवास्तवाच्या देहाचे पेशीद्रव्य बनून ते त्या देहात वावरते; पण त्याची विकृत वाढ देहाला हानिकारक ठरू शकते.
वर्तमान समाजवास्तव हे या अर्थाने जसे ऐतिहासिक असते, तसेच दुसऱ्या बाजूला ते भविष्यलक्ष्यी असल्यामुळे त्या अर्थाने भविष्यकालीन असते, असेही म्हणता येते. प्रत्येक समाजाला आपल्या भवितव्याची काही एक कल्पना असते. ही कल्पना स्वप्नरंजक असेल तर ती Utopia चे रूप धारण करते. वेगवेगळ्या धर्मसमाजांमध्ये प्रचलित असलेल्या स्वर्गनरकादी पारलौकिक गतीच्या कल्पना. हे त्या त्या समाजांच्या वास्तवाचाच भाग मानला पाहिजे. या कल्पनांनीही समाजातील व्यक्तींच्या वर्तनाचे नियमन नियंत्रण होत असते.
पारलौकिकाचा मुद्दा बाजूला ठेवू. यहुद्यांचेच उदाहरण घ्यायचे झाले तर त्यांच्या समाजाच्या ऐतिहासिकतेचा त्यांच्या भवितव्याच्या स्वप्नाशी अत्यंत निकटचा संबंध होता. आपल्याला मूळ स्थानापासून च्युत केले गेले आहे, ही ऐतिहासिकता आपल्या (वर्तमान) वास्तवाचा भाग बनवून जगणाऱ्या या स्थानभ्रष्ट समाजाने त्या स्थानाची पुनरुपलब्धी करून तेथे आपली सत्ता प्रस्थापित करण्याचे स्वप्न उराशी बाळगले होते. स्वर्गरूपी नंदनवनातून ईश्वराकडूनच हाकलून दिल्या गेलेल्या अ‍ॅडमची संताने असलेल्या मानवाने धर्माच्या माध्यमातून तेथे परत जायचे, हा झाला ‘Paradise Lost’ पासून ‘Paradise Regained’चा प्रवास. तो तर सेमिटिक परंपरेतील धर्माचा महत्त्वाचा भाग आहेच; परंतु यहुद्यांचा उपरोक्त मुद्दा हा त्यांच्या ऐहिक जीवनाचा भाग बनला. शेवटी विसाव्या शतकाच्या मध्यावर तो प्रत्यक्षातही आला.
इतिहास आणि भविष्य ही (वर्तमान) समाजवास्तवाची अविभाज्य अंगे कशी बनतात याचे विवेचन करून झाले. काही समाजांच्या बाबतीत त्याचा इतिहास गौरवशाली असतो; परंतु वर्तमान बिघडलेला असतो. त्यांच्यासाठी या गौरवशाली इतिहासाची भविष्यात पुन:स्थापना करणे हा सरळ सोपा कार्यक्रम असतो. ही सुलभता लक्षात घेऊनच ज्यांचा इतिहास गौरवशाली वा वैभवाचा नाही, ते त्या इतिहासाचे उदात्तीकरण करतात. त्यातून त्या समाजातील व्यक्तींना कृतीची प्रेरणा मिळू शकते. अलीकडच्या काळात हिटलरने जर्मन समाज हा शुद्ध आर्य अतएव सर्वश्रेष्ठ वंश असल्याचा दावा केला. या वंशाचा भूतकाळ त्याच्या लेखी अर्थातच गौरवास्पद होता. मात्र याच वंशाने जगावर राज्य गाजवणे हे भवितव्याचे स्वप्न त्याने जर्मनांना दिले. ते जर्मन-समाजवास्तवाचा भाग बनले. या प्रकाराची परिणती शेवटी महायुद्धात झाली, मात्र त्यातून जर्मनीचे – शुद्ध आर्य वंशाचे जगावरील राज्य जाऊ द्या, जर्मनीचा नाश ओढवला व त्याहीपेक्षा महत्त्वाची बाब, ज्याला त्याने शत्रू मानून जगातून नष्ट करण्याचा चंग बांधला होता, त्या यहुद्यांच्या स्वप्नाची पूर्ती होऊन इस्रायलची निर्मिती होणे शक्य झाले.
वर्तमान काळातील संघर्ष समाजा-समाजामधील असतात. असे दिसले तरी ते त्या त्या समाजांच्या ऐतिहासिकतांमधील आणि स्वप्नांमधीलदेखील असतात. मुक्त भांडवली व्यक्तिप्रधान उदारमतवादी समाजरचना हे पाश्चात्त्य संस्कृतीचेच स्वप्न असल्याचे प्रतिपादन अलीकडे पाश्चात्त्य विचारवंत करीत आहेत. त्या मार्गातील एक काटा – साम्यवादी रशियाचा- काढण्यात तिला यश आले. आता तिला इस्लामी धर्मसंस्कृतीशी संघर्ष करायचा आहे. या संघर्षांमधून काय निष्पन्न होईल, ते इतिहासच ठरवील.
*लेखक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील तत्त्वज्ञानाचे निवृत्त प्राध्यापक असून संतसाहित्याचे व्यासंगी व विचारवंत आहेत.
*उद्याच्या अंकात मुकुंद संगोराम यांचे ‘स्वरायन ’ हे सदर