सध्या चर्चा आहे ती पुढचं सहस्रक कसं आशियाचं असणार आहे, त्याची. अनेकांना छान वाटतं ते ऐकल्यावर. पण खरा प्रश्न वेगळाच आहे..
तीन वर्षांपूर्वी जर्मनीत गेलो होतो, तेव्हाचा हा प्रसंग. बर्लिनमध्ये अनेक संस्थाप्रमुखांशी भेटी झाल्या. विद्यापीठ, नगरपालिका, जुना विमानतळ, उद्यान वगरे वगरे. त्यातली एक होती बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आयोजित करणारी. तो चित्रपट महोत्सव दोन-तीन महिन्यांवर आला होता तेव्हा. माझं भारतीयत्व ओळखून आयोजक मोठय़ा उत्साहात सांगत होती, गेल्या वर्षी इथं शाहरुख खान आला होता. काय गर्दी जमली होती त्याला पाहायला. अगदी चेंगराचेंगरीच.
या असल्या बाष्कळ माहितीत पाहुण्याला काही रस नाही हे ओळखून माझ्या यजमानबाईंनी विषय बदलला. किती देशांचे सिनेमे इथे येतात, इतरांपेक्षा आम्ही आयोजनात कसे वेगळे असतो असं काहीबाही सुरू होतं.  मी मुद्दा खर्चावर वळवला. बíलन नगरपालिका या महोत्सवाचा खर्च करते की सरकार? दोघेही. तिनं उत्तर दिलं. वर म्हणाली, गेल्या वर्षीपासून या महोत्सवाला एक मोठा प्रायोजक लाभलाय, त्यामुळे खर्चाचा भार जरा हलका झालाय.
मला वाटलं डिस्ने, ट्वेंटिएथ सेंच्युरी फॉक्स किंवा अशाच कोण्या चित्रपट निर्मात्या कंपनीनं प्रायोजकत्व घेतलं असणार या महोत्सवाचं. अपेक्षित उत्तर काय असणार याचा अंदाज होता. त्यामुळे उत्तराबाबत काहीसा बेसावध होतो. पण तिचं उत्तर ऐकून एकदम चमकलो. ती म्हणाली हा नवा मोठा प्रायोजक आहे चीन.
तो विषय तिकडेच संपला. चीनचा एकंदर वाढता प्रभाव हा दिसत होताच. त्याच्या बातम्याही येत होत्या. गुरुवारी संध्याकाळी एकदम बातमी आली ब्रिटनमधलं अत्यंत प्रतिष्ठित असं फायनान्शियल टाइम्स हे वर्तमानपत्र त्याच्या मालकांनी विकून टाकायचा निर्णय घेतल्याची. भारताबाहेर जी काही आदरणीय, ज्यातली संपादकीय जागा विकाऊ नाही अशी शंभर टक्के खात्री देता येते, ज्यांच्याबाबत अशोकपर्व घडू शकत नाहीत अशी जी काही वर्तमानपत्रं आहेत, त्यातलं हे एक. १९९८ साली लंडनला शिष्यवृत्ती काळात होतो त्या वेळी एफटीच्या कॅनरी व्हार्फ इथल्या कार्यालयासमोरनं नुसतं गेलं तरी काही पुण्यसंचयाचा आनंद मिळायचा. तेव्हा हे वर्तमानपत्र मालक विकून टाकणार हे वाचून धस्सच झालं आणि बíलन चित्रपट महोत्सवाची आठवण झाली. वाटलं आणखी एक संस्था आता चीनच्या मालकीची होणार. पण नाही. सुदैवानं तसं झालं नाही. एफटी जपानच्या निक्केई कंपनीनं विकत घेतला. त्या संदर्भात एका आंतरराष्ट्रीय वित्तसंस्थेतल्या मित्राशी बोलणं झालं. त्यानं यादीच दिली कोणकोणत्या युरोपीय संस्था, कंपन्या वगरे आशियाई मालकीच्या झाल्या त्याची.
यात अत्यंत महत्त्वाचे असे आहेत ते काही फुटबॉल क्लब. युरोपमध्ये क्लबमधल्या फुटबॉल स्पर्धा मोठय़ा धडाक्यात होत असतात. लोकांच्या देशांवर निष्ठा असतील-नसतील, पण या क्लबांवर मात्र नक्कीच असतात. अशा अनेक क्लबांमधला एक म्हणजे क्वीन्स पार्क रेंजर्स. टोनी फर्नाडिस यांची त्यात ६६ टक्के मालकी आहे. हे टोनी अर्थातच मूळचे भारतीय. सध्या मलेशियाचे नागरिक. एअर एशियाचे मालक. फुटबॉल क्लबमधल्या मालकीसाठी त्यांनी ३.५ कोटी स्टìलग पौंड मोजले. यातली राहिलेली ३४ टक्के मालकी कोणाकडे आहे, माहिती आहे? लक्ष्मी मित्तल आणि त्यांच्या जावयाकडे. हे मित्तल म्हणजे तेच आंतरराष्ट्रीय पोलादसम्राट.
झालंच तर मँचेस्टर सिटी हा यातला प्रतिष्ठित क्लब. त्याचा मालक आहे कतारचा धनाढय़ शेख मन्सूर बिन झायेद. त्यानं हा क्लब घेतला कोणाकडून? तर थायलंडचे पंतप्रधान थकसेन शिनावर्त यांच्याकडून. म्हणजे या क्लबचा आधीचाही मालक आशियाई होता आणि आताचाही. शेख मन्सूर यांनी या क्लबसाठी २० कोटी पौंड मोजले. असे अनेक छोटेमोठे दाखले आहेत. पण विषय काही फक्त फुटबॉल क्लबांचा नाही. तो आहे आशियाईंच्या वाढत्या प्रभावाचा.
द इकॉनॉमिस्ट या साप्ताहिकांत मध्यंतरी एका लेखात इटलीचे माजी पंतप्रधान रोमानो प्रोदी यांना उद्धृत केलं होतं. ते असं म्हणाले होते, हल्ली इटलीची आíथक धोरणं ही बीजिंगमध्ये ठरतात. संदर्भ होता इटलीची अत्यंत नामांकित अशी पिरेली नावाची मोटारींचे टायर बनवणारी कंपनी चायना नॅशनल केमिकल कॉर्पोरेशन या कंपनीनं गिळंकृत करण्याचा घाट घातला होता, त्याचा. पिरेली ही इटलीतलं अत्यंत प्रतिष्ठित कंपनी. चीनने तब्बल ७७० कोटी डॉलर ओतले आणि त्यावर आपला कब्जा मिळवला. त्या एका व्यवहारानं चीन हा इटलीतला सर्वात मोठा गुंतवणूकदार ठरला. फेर्रेटी ही इटलीतली आलिशान खासगी याट बनवणारी कंपनी. तीही आता चिनी हातात आहे. सालोव समूह हादेखील इटलीतला. ऑलिव्ह तेलाच्या क्षेत्रातला. चिनी कंपनीनं त्यावरही कब्जा केलाय.
आपल्याला कल्पनाही नाही, पण हे आता अनेक ठिकाणी मोठय़ा प्रमाणावर होऊ लागलंय. लंडनमधल्या थेम्स वॉटर आणि हिथ्रो विमानतळ या मोठय़ा कंपन्या. या दोन्हींत चीननं लक्षणीय गुंतवणूक केली आहे. फ्रान्समधला टोल्युज विमानतळ चिनी हातात आहे. प्युजो सित्रोन ही मोठी मोटार कंपनी. तिच्या मालकीचा लक्षणीय वाटा हा चीनच्या हाती गेलाय. सध्या डबघाईला आलेल्या ग्रीसमधलं महत्त्वाचं पायरस बंदर चीन चालवतोय. वरच्या स्वीडनमधली वोल्व्हो ही मोटारी बनवणारी कंपनी आपल्या परिचयाची. ती आता चिनी होतीये. इनफ्रंट हा स्वित्र्झलडमधला महत्त्वाचा समूह. कशाच्याही निर्मितीत वगरे नाही तो. तर विविध क्रीडा स्पर्धाचे दूरचित्रवाणी प्रसारणाचे हक्कविकणं, अन्य क्रीडा उद्योग यात तो आहे. पण तो सुद्धा आता चिनी झालाय. वायूआधारित वीजनिर्मितीची चक्की बनवणारी कंपनी, फॅशनचा मोठा ब्रॅण्ड असं बरंच काही आता चीनच्या मालकीचं झालंय किंवा त्यात लक्षणीय अशी चिनी मालकी आहे.
यातली लक्षात घ्यावी अशी बाब म्हणजे हे सर्व काही युरोपीय देशांतच होतंय. यातले बरेचसे देश चीनच्या तुलनेत अगदीच किरकोळ आहेत. दुसरं म्हणजे जवळपास सर्व युरोपीय देशांत चांगल्या पातळीवर खासगीकरण झालंय आणि नियामक व्यवस्था उत्तम आहेत. आणि मुख्य म्हणजे या देशांतल्या बऱ्याच कंपन्या आíथकदृष्टय़ा डबघाईला आल्यात. त्या खासगी असल्यामुळे त्यांच्या त्यांच्या सरकारांना त्या वाचवण्यात रस नाही आणि युरोपीय संघटना आणि समाईक चलनामुळे त्या वाचवण्याचं सामथ्र्यही सरकारांना नाही. कारण या संघातला कोणताही देश स्वत:चं चलन छापू शकत नाही. मग या अशा असहाय कंपन्या वखवखलेल्या चिनी कंपन्यांना बळी पडू लागल्यात.
यातली मेख.. आणि गंभीरही बाब. ही की बव्हंश: चिनी कंपन्यांना स्वत:च्या सरकारचा उघड पािठबा आहे. एक तर यातल्या बऱ्याच कंपन्या सरकारी मालकीच्याच आहेत. आणि ज्या नाहीत त्यांच्यामागे रसद पुरवठय़ासाठी सरकार आहे. त्यामुळे एका अर्थानं ही असमान लढाई आहे. ज्या युरोपनं जगाला लोकशाही आणि समतेची तत्त्वं दिली, त्या युरोपातलं हे बहरलेलं उद्योगविश्व डोळ्यांदेखत हुकूमशाही व्यवस्थेपुढे नांगी टाकत चाललंय.
आपल्यासाठी यात आणखी एक गंभीर बाब आहे. एक म्हणजे या सगळ्या खेळात आपण कुठेही नाही. नावापुरताच अपवाद करायचा तर वेंकटेश्वरा हॅचरीजच्या राव यांचा. ब्लॅकबर्न रोव्हर्स नावाचा एक फुटबॉल क्लब त्यांच्या मालकीचा आहे. या कंपनीचे प्रवर्तक डॉ. बीव्ही राव यांचे कुटुंबीय म्हणजे चिरंजीव वेंकटेश आणि बालाजी आणि कन्या अनुराधा देसाई यांची या क्लबवर ९९.९ टक्केइतकी मालकी आहे. भारतीय संबंध काय तो तेवढाच. या खेळात आपलीच इतकी बोंब. तेव्हा पाकिस्तानची याहून असणार हे उघड आहे. त्या देशाचे अनिवासी पाकिस्तानी अमेरिकी उद्योगपती शाहिद खान यांच्या नावावर तेवढा एक क्लब आहे. फुल्हम नावाचा. त्याखेरीज पाकिस्तानचंही काही नाही.
तेव्हा प्राधान्याने या सगळ्या खेळाचे फासे पडताहेत ते चीनच्या अंगानेच. हे समजून घ्यायला हवं. कारण सध्या चर्चा आहे ती पुढचं सहस्रक कसं आशियाचं असणार आहे, त्याची. अनेकांना छान वाटतं ते ऐकल्यावर. बरोबरच आहे ते.
प्रश्न फक्त इतकाच की त्यात आपला टक्का किती?