भारत हे सव्वा अब्ज लोकसंख्येचे, राजकीय स्वातंत्र्य असलेले, लोकशाही राज्यव्यवस्थेचे, बहुप्रांतीय, बहुभाषिक, बहुधार्मिक व धर्मनिरपेक्ष असे प्रचंड गुंतागुंतीचे पण जगातील एक महत्त्वाचे राष्ट्र आहे. त्यामुळे आपले आजचे    प्रश्न आजच्या ‘विज्ञान व मानवता’ या मार्गाने आपणालाच सोडवावे लागणार आहेत.  या समस्यांची उत्तरे आपल्याला  मायबाप संतांच्या विचारात मिळणे काही शक्य नाही.

महाराष्ट्रात सुमारे पाच शतके प्रसार होत राहिलेल्या संत चळवळीने त्यांच्या देश-काळ-परिस्थितीत आवश्यक व उपयुक्त असे लोकशिक्षण मोठय़ा प्रभावीपणे करून, आमच्यावर उपकार केले आहेत, याबद्दल काहीच शंका नाही. आजही संतांची भक्ती चळवळ बहुजनांत लोकप्रिय आहे. पण आम्हाला संतांचे थोरपण नेमके कशात होते हे कळत नाही, असे मला वाटते. आपणाला असे सांगितले जाते की, संतांना ईश्वरी साक्षात्कार होत असत आणि संतांच्या आजूबाजूला ‘चमत्कार’ घडत असत, त्याअर्थी ते मोठे होते. नामदेवादी संतांशी ईश्वर प्रत्यक्ष बोलत असे. तुकाराम महाराजांना न्यायला (सदेह, वैकुंठाला) तिथून विमान आले. आम्हाला सांगितले जाणारे असे कुठलेही चमत्कार खरे नव्हेत, हे आजच्या विज्ञान युगात, एकविसाव्या शतकात तरी, आपणाला कळायला हवे. एवढेच काय पण ‘संत कर्मसंन्यासवादी होते’ व त्यांनी लोकांना (फक्त) पारलौकिक सुखाचा मार्ग सांगितला, असे काही जण म्हणतात तेही खरे नव्हे. संतांचे स्वत:चे वर्तन कार्यशीलतेचे होते, कर्मसंन्यासाचे नव्हे आणि लोकांचे ‘ऐहिक जीवन’ सुखी, समाधानी, नीतिपूर्ण व उन्नत व्हावे यासाठीच ते प्रयत्नशील होते. अर्थात त्यांचे चमत्कार नाकारल्यामुळे किंवा त्यांच्या अशा ऐहिकतेमुळे, त्यांच्या थोरत्वात काहीही उणेपण येत नाही, असे मी मानतो. कारण त्यांच्या थोरत्वाचा खरा व मुख्य पैलू आहे तो माझ्या मते हा की ‘प्रस्थापित धर्मवाद्यांकडून होणारा छळ सोसून, अगदी प्रतिकूल परिस्थितीत, चुकीच्या धार्मिक मतांविरुद्ध, अयोग्य रूढीपरंपरांविरुद्ध, सतत बंडखोरी करून लढत राहणे’ आणि मला वाटते की, त्यांच्या थोरत्वाच्या याच पैलूला आपण दुर्लक्षित करतो.
भक्तिमार्गी संतांनी तथाकथित धार्मिक, कर्मठ आचारांची उपयुक्तता नाकारून, दैनंदिन जीवनातील निर्मळ आचरणाला व शुद्ध भावनेला महत्त्व दिले. धर्माच्या नावाने लादलेल्या दंडकांची, कर्मकांडांची अगदी व्रते, तीर्थयात्रा इत्यादींचीही दडपणे त्यांनी नाकारली व लोकांना मानसिक आधारासाठी हवा असलेला साधा-सोपा देव त्यांनी मिळवून दिला. त्या काळी ते ठीकच होते असे म्हणावे लागते. संतांनी धार्मिकतेच्या ‘दंभाचा’ धिक्कार केला. उपासनेच्या नावाने होत असलेल्या अध:पतनाला (उदा. वामाचारी तंत्रपंथाच्या प्रसाराला) त्यांनी बांध घातला. तसेच समाजातील निम्न स्तरांतील ‘तामस उपासना व परंपरांची व्यर्थता’ त्यांनी पटवून दिली. अग्नीत तीळतांदूळ जाळण्यापेक्षा (म्हणजे यज्ञ करण्यापेक्षा) मनातील कामक्रोध जाळून, मन सात्त्विक, निर्मळ करा असे त्यांनी सांगितले. तसेच ‘धनसंपत्तीचा देखावा करू नका’, ‘एकमेका साह्य़ करू, अवघे धरू सुपंथ’, ‘नवसे पोरे होती, तर का करणे लागे पती?’, ‘मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धींचे कारण’ असे कित्येक मौलिक उपदेश संतांनी आम्हाला केले. थोडक्यात असे की, सर्व संत आपापल्या काळात अंधश्रद्धा निर्मूलनातून समाजोद्धाराचे महान कार्य करीत होते.
उच्चवर्णीयांचे वेदांचे अर्थशून्य पाठांतर निरुपयोगी आहे असे संतांनी सांगितले. संस्कृतचे देवभाषा म्हणून असलेले अनाठायी महत्त्व नाकारून त्यांनी लोकांच्या बोली भाषेला प्रतिष्ठा मिळवून दिली. पण त्यांचे हे बंड केवळ भाषेपुरते मर्यादित नसून, ही त्यांची जीवनव्यापी बंडखोरी होती. संतांनी लोकभाषा हे माध्यम वापरून मुख्यत्वे दोन प्रकारचे कार्य केले. ते म्हणजे १) बहुजनांनी अंगीकारलेल्या क्षुद्र देवतांमुळे आलेल्या विकृत आचारांचा निषेध व २) तशा मानसिकतेत असलेल्या आणि उच्चवर्णीयांच्या तथाकथित ज्ञानप्रक्रियेपासून वंचित राहिलेल्या बहुजनांना उन्नयनाचा मार्ग दाखविणे. हेच थोडक्यात असे की, स्वत:ला धार्मिक म्हणविणाऱ्या भोंदूंचा पर्दाफाश आणि सामान्यांचा उद्धार ही दोन महत्कार्ये करून बंडखोर संतांनी आमच्यावर थोर उपकार केलेले आहेत.
मात्र प्रत्यक्ष लोकव्यवहारांतील वर्णधर्माची चौकट, जातिभेदांच्या भिंती, स्पृश्यास्पृश्यतेची दुष्ट चाल, स्त्रियांबाबतचे भेदभाव अशा अन्याय्य व्यवस्था संत मोडू शकले नाहीत, हे खरे. कारण बंडखोर असले तरी ती माणसेच होती व म्हणून त्यांनाही स्थल-काल-परिस्थितीच्या मर्यादा होत्याच. कदाचित् असे असू शकेल की, त्यांच्या काल-परिस्थितीत, ‘आत्मा, पुनर्जन्म, कर्मविपाक’ वगैरे ‘विषमतामूलक’ परंतु ‘मूलभूत’ असलेल्या संकल्पना ते झुगारून देऊ शकले नाहीत आणि नव्या समतावादी कल्पना त्यांना निर्माण करता आल्या नाहीत व म्हणून जातिवर्णभेदादि दोषांवर ‘मुळापासून घाव घालण्याचे कार्य’ ते हाती घेऊ शकले नाहीत.
आज संपूर्णत: बदललेले आपले जीवन व परिस्थितीतून पाहिले असता ‘संत विचारात’ आज अनेक ‘उणिवा’ दिसून येतात. १) त्यातील पहिली अर्थातच ही की, वर दिल्याप्रमाणे संतांनी जरी अध्यात्मात जातिवर्णभेद व स्पृश्यास्पृश्यता नाकारली तरी प्रत्यक्ष व्यवहारात समता आणण्याचा त्यांनी काही प्रयत्न केला नाही. २) समाजातील स्त्रियांच्या दुय्यम स्थानाबद्दलसुद्धा तेच घडले. अगदी विसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत आमचा स्त्री-शिक्षणाला विरोधच राहिला होता. ३) तिसरी उणीव ही की, संतविचारांतील धार्मिक चौकटीत यक्षयक्षिणी, राक्षसयोनी, स्वर्ग-नरक, कर्मसिद्धांत, पुनर्जन्म, आत्मा, ईश्वर, मोक्ष अशा अनेक निराधार गोष्टी पुराव्यावाचून मानाव्या लागतात व हे आपल्या ‘जीवन-प्रवासाचा आधार’ म्हणून स्वीकारणे आज अनिष्ट व अहितकारक आहे. ४) चौथी उणीव ही की, संतांनी जरी भुताखेतांची पूजा-उपासना नाकारली तरी त्यांचे अस्तित्व नाकारले नाही. त्यामुळे त्याविषयक अंधश्रद्धा चालूच राहिल्या. ५) संत जे सामान्य जनांना आत्मज्ञान व मुक्तीचा सोपा मार्ग सांगण्यासाठी एवढे प्रयत्नशील होते ते लोकांवर कोसळणाऱ्या परचक्रांविषयी काहीच बोलत नव्हते. ६) संतसाहित्यात देह, प्रपंच, विषयसुख, गर्भावस्था इत्यादींविषयी घृणास्पद व निंदाव्यंजक वर्णने आहेत. त्या विचारांना आपण आजही चिकटून बसायचे आहे का? ७) संतांनी लोकांना आत्मोन्नतीची शिकवण दिली हे खरे. पण त्याचे साधन म्हणून त्यांनी ईश्वरभक्तीच सांगितली. त्यांच्या शिकवणीतून हीच ईश्वरभक्ती, मोक्षप्राप्ती, पुनर्जन्माच्या फेऱ्यांतून सुटका वगैरे श्रद्धा जर काढून टाकल्या, तर संत विचारांत काय काय उरेल? ८) संतांबद्दल आम्हा विवेकवाद्यांचा मुख्य आक्षेप आहे तो हा की, संतांनी भारतीयांना श्रद्धावादी बनविले. खरे तर श्रद्धेमुळे ‘स्वतंत्र विचार करण्याच्या शक्तीचे खच्चीकरण’ होते. शिवाय संतांमुळे भारतातील लोक असे मानू लागले की देवदर्शनाने, नामस्मरणाने, भजनपूजनाने मनुष्यजीवन कृतकृत्य होते. या निर्थक, उपयोगशून्य व्यवहारात आजही आपण दिवसच्या दिवस, महिनेच्या महिने फुकट घालवतो. आपण श्रद्धांना मिठी मारून, बुद्धीला सोडचिठ्ठी दिलेली आहे असे वाटते.
आज एकविसाव्या शतकात, आपले जग व सर्व परिस्थिती पूर्णत: बदललेली आहे. जगाची लोकसंख्या सात अब्जांच्या पुढे गेलेली आहे. भारतात तुटपुंज्या जमिनीवर त्यांपैकी सव्वा अब्ज लोक राहत आहेत. त्यातील जवळजवळ अर्धे लोक शहरांमध्ये निमशहरांमध्ये, प्रदूषित व विषारी हवा, पाणी व अन्न खाऊन औषधे घेऊन, गर्दीगर्दीत कसेबसे जगत आहेत. जंगले, पाणी, वनस्पती, पशू-पक्षी कमी होऊन नैसर्गिक समतोल ढळत आहे. आपण माणसे भूमीला भार झालो आहोत आणि तरीही स्त्रियांनी प्रत्येकी चार मुलांना जन्म द्यावा, असे आपण मूर्ख म्हणत आहोत. ईश्वर अवतार घेऊन येईल व आम्हाला वाचवील, असे आम्हाला वाटत आहे.
आजचे आमचे शहरी, निमशहरी जीवन व जग, जर संतांनी इथे परत येऊन पाहिले, तर ते चक्रावून जातील. आमचे मोबाइल, टीव्ही, स्कूटर, चार चाकी वाहने, ट्रेन, बोटी, विमाने, भयानक अण्वस्त्रे, इंटरनेट संपर्क क्रांती, प्रवासाच्या साधनांची क्रांती, व्यापार, उदीम, व्यवसाय, जगातील नवीन राष्ट्रे, त्यांच्या संस्कृती, त्यांच्या राज्यपद्धती, सर्वाचे परस्परावलंबन, नवी वैश्विक संस्कृती, नव्या जगाच्या नव्या समस्या, हे सर्व काही संतांच्या स्वप्नातही आले असणे शक्य नाही. अशा या जगात भारत हे सव्वा अब्ज लोकसंख्येचे, राजकीय स्वातंत्र्य असलेले, लोकशाही राज्यव्यवस्थेचे, बहुप्रांतीय, बहुभाषिक, बहुधार्मिक व धर्मनिरपेक्ष असे प्रचंड गुंतागुंतीचे पण जगातील एक महत्त्वाचे राष्ट्र आहे. त्यामुळे आपले आजचे प्रश्न आजच्या ‘विज्ञान व मानवता’ या मार्गाने आपणालाच सोडवावे लागणार आहेत. आपल्या आजच्या समस्यांची उत्तरे आपल्याला आपल्या मायबाप संतांच्या विचारात मिळणे काही शक्य नाही. त्यामुळे संतांविषयी आदर बाळगूनही आपण त्यांना ‘निरोपाचा नमस्कार’ करणेच योग्य आहे असे मला वाटते.