सोनिया गांधी यांची जीवनकहाणी ‘नाटय़मय’ प्रसंगांतून सांगणारं हे पुस्तक प्रसिद्धी-काळादरम्यान ‘वादग्रस्त’ का ठरवलं गेलं असावं, असा प्रश्न पडतो. गांधी घराण्यात लेखक गुंतला आहे की काय, असं वाचताना वाटत राहतं आणि अखेरही तीच शंका घट्ट होते..

पुस्तक वादग्रस्त आहे, असं आपल्याला बातम्या सांगतात. म्हणून का होईना, कुतूहलानं आपण पुस्तक विकत घेतो, वाचतो. वाचताना शंका येतच असते- ‘हे पुस्तक खरोखरच वादग्रस्त आहे का? वादग्रस्त ठरण्यासारखं काय आहे या पुस्तकात?’ अशा त्या शंकेचं उत्तर ‘काही नाही. वादग्रस्त काही नाही’ असं मिळत असलं, तरीही आपण ते पुस्तक वाचून संपवतो. प्रत्येक पुस्तक आपल्याला काही ना काही देतंच, तसं याही पुस्तकानं द्यावं.. पण ‘वादग्रस्त’ म्हणून झालेली प्रसिद्धी खोटी होती का? – हा प्रश्न छळत राहतो.
..हीच गत ज्यांनी ‘द रेड सारी’ हे पुस्तक वाचलं, त्यांची झाली असेल.  वास्तवातल्या घटनांचा आधार sam09असलेलं, पण ‘हेच वास्तव’ असं न सांगता ‘हेही खरं असू शकेल’ असा पवित्रा घेणारं हे पुस्तक आहे. त्यात अश्रू आवरणं, गळाठून जाणं, प्रफुल्लित होणं, बेचैनी न संपणं.. अशा भावभावनाही लेखक जेविएर मोरो (मूळ स्पॅनिश उच्चार अनपेक्षित आणि कठीण- खाविआ मोरो) यांनी या पुस्तकात आणल्या आहेत. इंदिरा आणि सोनिया या सास्वासुनांचे सुसंवाद त्यात आहेत, मनेका आणि सोनिया या जावा-जावांतला विसंवाद आहे आणि धाकटी जाऊ गरोदर असताना सहसा थोरली तिच्याशी प्रेमानंच वागते, हेही आहे. सोनिया यांचं एकटेपण या पुस्तकात ठायीठायी दिसतं.. या सर्वातून हे पुस्तक निर्विवादपणे ‘नाटय़मय’ ठरतं. पण याच मूळ स्पॅनिश पुस्तकाच्या कुठल्यातरी आवृत्तीला ‘कादंबरी’ म्हटलं गेलं असलं, तरी ‘सोनिया गांधी यांचं नाटय़मय चरित्र’ या उपशीर्षकानिशी लेखक व प्रकाशकांनी भारतीय वाचकांच्या हाती हे पुस्तक ठेवलं आहे. पुस्तकं दीर्घकाळ टिकत असली तरी हल्ली कोणत्याही पुस्तकाचा प्रसिद्धीकाळ अल्पच असतो, त्या अल्पकाळात हे पुस्तक काँग्रेस पक्षाला नकोसं आहे आणि म्हणून ते वादग्रस्त आहे, असा गवगवा झाला. ते नको आहे की हवं आहे, याबद्दल संबंधित पक्षाचा अधिकृत खुलासा आलेला नाही. पण या पुस्तकाबाबतची प्रसिद्धी अशा खुबीनं केली गेली की, ‘वादग्रस्त’ म्हणजे ‘सोनिया गांधी यांनाच वादात ओढणारं पुस्तक’ असा अर्थ कुणीही काढावा.
असा अर्थ काढणाऱ्यांपैकी कुणाला- ‘सोनिया यांच्या चारित्र्याबद्दलचा वादग्रस्त तपशील (जो काही बदनामीखोरांनी निनावीपणे इंटरनेटवर आधीच पेरलेला आहे, तो) कसा खराच आहे, यावर हे पुस्तक शिक्कामोर्तब करील’ – अशी काही भलतीच अपेक्षा ज्यांची असेल, त्यांना हे पुस्तक हताशेच्या गर्तेतच लोटेल. ‘सोनिया गांधींबद्दल आमचे लोक एवढा अपप्रचार करत असूनसुद्धा पुस्तकात काहीच नाही?’ असं या कर्मठांना वाटू शकेल.
हे पुस्तक या सर्व अपेक्षांच्या अगदी विरुद्ध प्रकारे लिहिलं गेलं आहे.
सोनिया ही साधी मुलगी होती, तिचे वडील स्टेफानो मायनो हे कष्टाळू आणि साधे होते, ते मुलींना धाकात ठेवत आणि मुलींचं शिक्षण उत्तमच व्हावं असं त्यांना वाटे म्हणून सोनिया ब्रिटनमध्ये केम्ब्रिजच्या लेनॉ कूक लँग्वेज स्कूलमध्ये दाखल होऊ शकली (प्रकरण ३), एरवी कुणाही मुलासोबत न फिरणारी सोनिया राजीव गांधी यांच्याकडे आकृष्ट झाली तेव्हा तिने प्रेमाचा विचार झटकून टाकण्याचा अयशस्वी प्रयत्न केला, (प्र. ४) राजीवही किती साधा, लाजाळूच होता आणि एकमेकांच्या व्यक्तिमत्त्वांतील साधेपणाच आवडू लागलेल्या या दोघांनाही, प्रेमात पडणे म्हणजेच जीवनसाथी होणे असे वाटत होते (प्र. ४-५) ; सोनियाच्या कुटुंबाने हा मुलगा परधर्मीय, परंतु ‘चांगल्या घरचा’ असल्याने त्यांच्या प्रेमाला- पर्यायाने लग्नालाच- अनुमती दिली, तरीही सोनियाला राजीवपासून सुरक्षित अंतर राखावेसे वाटत होते (प्र. ५), या सर्व काळात राजीव वैमानिक होण्यासाठी मेहनत घेत होता, अखेर राजीवच्या आईनेही लंडन-भेटीदरम्यान सोनियाला पसंती दिली, तेव्हा सोनियाला ‘जणू आईच भेटली’ असे वाटले (प्र. ६), सोनियाने भारतात यावे व एकटीने अन्य जागी राहून देश पाहावा या राजीवच्या विनंतीवर ‘२१ वर्षांची होईस्तो मी माझ्या मुलीला कुठेही नाही पाठवणार’ असे उत्तर स्टेफानो यांनी दिले (प्र. ७), असं कथानक गुंफून, सोनिया गांधी यांची सुशीलता लेखकानं अधोरेखित केली आहे. सोनियाला ब्रिटन-मुक्कामात कोठेही नोकरी करावी लागल्याचा उल्लेख पुस्तकात नाही.
पुढल्या प्रकरणांत सोनियांच्या भारत-भेटीचं, लग्नाचं वर्णन आहे. प्रेमकहाणी ‘नाटय़मय’ वगैरे असू शकते, पण तिथून पुढे, भारतात सोनिया येतात या टप्प्यानंतर पुस्तकातल्या तपशिलांकडे भारतीय वाचक बारकाईनं पाहू शकतात. सासूबाई इंदिरा यांनी सोनियाची राहण्याची व्यवस्था हरिवंशराय आणि तेजी बच्चन यांच्या घरी केली, त्या घराचं वर्णन ‘अमिताभचं घर’ असं लेखक मोरो करतात. ‘लाल साडी’ अर्थातच, लग्नासाठी इंदिरा यांनी  सुनेसाठी घेतली होती आणि ती फिकट लाल रंगाची होती. हे साल होतं १९६८. म्हणजे राजीव-सोनियाच्या ओळखीला तीन र्वष झाली होती. लग्नसोहळा निधर्मीच पद्धतीनं व्हावा, असा इंदिरा यांचा आग्रह होता, हे सांगताना लेखक ‘नेहरूंनी मात्र इंदिरा यांना सात फेरे घेण्यास भाग पाडलं’ हाही उल्लेख येतो आणि फिरोज व इंदिरा यांच्याही लग्नाबद्दलचे परिच्छेद येतात. इथून पुढे, इंदिरा यांची सद्दी या पुस्तकावर सुरू होते! २५ फेब्रुवारी १९६८ रोजी झालेल्या लग्नानंतर आठवडय़ाभरात आपले आईवडील व बहीण अनुष्का यांसह एकंदर सहाच कुटुंबीयांना विमानतळावर पोहोचवून आलेल्या सोनियांसाठी ‘आम्हा साऱ्यांना तू आवडतेस’ अशी चिठ्ठी इंदिरा यांनी ठेवली होती, इंदिराजींचं करारी व्यक्तिमत्त्व प्रेमळही होतं, त्यांना एकटं वाटत असे, हे या पुस्तकातून फार वेळा कळणार असतं.
संजय गांधी यांच्या कारवाया इंदिरा गांधी यांच्यासाठी डोईजड झाल्या, तरीही संजयला अभय मिळत राहिलं.. संजयचे आरके धवनसारखे ‘पित्ते’ (इंग्रजी अनुवादकाचा शब्द : हेन्चमेन) महत्त्व मिळवत राहिले, धीरेंद्र ब्रह्मचारी हे योग-गुरू इंदिरा गांधी यांना ‘घरच्या मंडळींपेक्षा अधिक’ भेटत, सिद्धार्थशंकर राय यांच्या सल्ल्याने आणीबाणी लादली गेली,  राजीव गांधी हे संजयच्या अपघाती मृत्यूनंतर राजकारणात येण्यास अत्यंत नाखूश होते, असे तपशील लेखक पुरवतो. हे सारं आज पंचेचाळिशीत अथवा पुढे असलेल्या भारतीय वाचकांना माहीतच असणार, पण इतरांसाठी ही काहीतरी नवी आणि वादग्रस्त वगैरे माहिती ठरेल. हे उल्लेख होत असतानाच, सोनिया गांधींचा सोशिकपणा, सोनियांना ‘मुलांच्या सुरक्षेसाठी तरी इटलीत जावं’ असं वाटल्याने राजीव-सोनियांनी तो विषय काढल्यावर इंदिरा यांनी ‘लोक चुकीचा अर्थ घेतील’ असं म्हणताच राजीव यांच्याआधी सोनियानंच ‘ठीक आहे, नाही जाणार आम्ही’ असं म्हणणं, मनेकाची बेमुर्वतखोरी सोनियानं सहन करणं, सोनियानं सर्वाशी शालीनपणेच वागणं, इंदिरा यांची सत्ता गेल्यावर ‘१२ विलिंग्डन क्रीसेंट’ या घरात सोनियानं केलेली इटालियन भाज्यांची (झुकिनी, ब्रोकोली, इ.) लागवड, सोनियाला लग्नानंतर १० वर्षांत केवळ इटालियनच नव्हे तर भारतीय स्वयंपाकही येई त्यामुळे घरात होणारे लज्जतदार पालक पनीरसारखे पदार्थ.. अशी वर्णनं आहेत. लेखक अशी माहिती देतो की, विलिंग्डन क्रीसेंटच्या घरात आल्यावर विश्वासू आचाऱ्याचं निधन झाल्यानंतर, इंदिरा यांनी आचारीच ठेवला नव्हता. स्वयंपाकाचा हा उल्लेख अगदी प्रकरण ४९ मध्येही येतो- आघाडी सरकार चालवताना ‘उत्तम स्वयंपाक्याप्रमाणेच काम करावे लागेल’ असं सोनियांना म्हणे वाटून जातं.
राजीवच्या राजकारण-प्रवेशाला सोनियांचाही विरोधच होता, असे लेखक नाटय़मय वर्णनांतून सांगतो. पंतप्रधान झाल्यावर सोनियांनी केलेले दौरे, आलेले अनुभव यांचा उल्लेख त्रोटकच येतो. अगदी बोफोर्स प्रकरणसुद्धा फक्त दीड पानांत आटोपते. तेही, राजीव आणि सोनिया या दोघांना प्रामाणिक आणि ‘स्वच्छ’पणाचे प्रमाणपत्र देऊन. हे प्रमाणपत्र देण्यासाठी सोनियाच्या मनातली आंदोलनं लेखक सांगतो.. त्याचा भावार्थ असा की, स्वीडनचे तत्कालीन पंतप्रधान ओलॉफ पामे दिल्ली-भेटीस आले असता राजीव गांधींच्या निवासस्थानी झालेल्या चर्चेस यजमानपत्नी या नात्यानं सोनियाही हजर होत्या आणि पामे यांना राजीवने दिलेला देकार कमीतकमी – स्वीडनला हवी होती, त्याहीपेक्षा कमी- किमतीचाच होता, हे सोनियांनी स्वत: ऐकले आहे! इतके सांगून न थांबता, बोफोर्सबाबत आरोप करत सुटलेल्या एकाही प्रसारमाध्यमाला / पत्राला एकही ठोस पुरावा मिळू शकलेलाच नाही, याचीही आठवण लेखक देतो. राजीव प्रामाणिकपणे संसदेतही या प्रकरणाचा इन्कारच करत असताना, ‘अपप्रचार इतका पराकोटीला पोहोचला होता की, काही वर्षांपूर्वी ज्यांचे सारेच जनतेला चांगले वाटत होते त्याच राजीव यांचे सारेच बोलणे चुकीचे, खोटे वाटू लागले होते’ असा उल्लेख लेखक करतो. विन छड्डा यांचा नामोल्लेख यासंदर्भात कुठेच नाही. संजय गांधींच्या कारवायांना थोरला भाऊ-भावजय विटून गेले आणि संध्याकाळचे जेवण घराऐवजी अनेकदा मित्रमंडळींसह घेऊ लागले, त्या काळात ओटावियो क्वात्रोची व त्यांची पत्नी मारिया हे सोनिया व राजीवच्या मित्रमंडळात आले होते.. परंतु बोफोर्सच्या बातम्यांनी क्वात्रोचींना गांधींचे घर बंदच झाले, असे लेखक नमूद करतो. राजीव गांधी यांच्या सत्ताकाळात आणि ते सत्तेवर नसतानाही, सोनिया कधीच प्रसिद्धीच्या मागे नसल्याचे दाखले पुस्तकात पेरलेले आहेत.
पुस्तकाचा काळ अगदी १९६३ पासून ते २००४ पर्यंतचा असला, तरी आठवणींत तो कितीही मागे जातो. अगदी जवाहरलाल आणि कमला नेहरूंपर्यंत मागे. कमला नेहरूंनी इंदिरेला दिलेल्या रिंगा, भांडताना रागारागाने मनेका जमिनीवर फेकते! मग सोनिया रिंगा उचलते नि म्हणते की, मी या जपेन प्रियांकासाठी.. या ‘नाटय़ा’नंतर खरोखरच ‘प्रियांकाच्या कानांत कमला नेहरूंच्या रिंगा असतात’ याची आठवण लेखक देतो! लेखकाची कल्पनाशक्ती लक्षणीय आहेच; पण ती बहुतेकदा ‘नायिके’ला शुभ्र-धवल रंगांत रंगवण्यासाठीच वापरली जाते. बेलची (बिहार) येथे दलित हत्याकांड झाल्यानंतर, पराभूत इंदिरा तेथे जातात, त्यांना भर पावसात प्रतिभा (पाटील) यांच्यासह कसा हत्तीवरून ओढा ओलांडावा लागला, याचे वर्णन इंदिरा-सोनिया यांच्या संवादातून येते. हत्तीवर आम्ही दोघी नुसत्याच बसलो, बसायला हौदासुद्धा नव्हता, असे सांगतानाच सुनेला इंदिरा विचारतात, ‘हौदा माहितेय का गं तुला?’ – यावर तातडीने सोनिया हौदा म्हणजे काय, हे सांगते, हा प्रसंग तर फारच ‘नाटय़मय’. बेलचीला सासूने जयप्रकाश नारायण यांची भेट घेतली, ५० मिनिटांच्या चर्चेत कमला नेहरूंचाही विषय निघाला, हेही या संवादातून सोनियाला समजते आणि पुढे कधीतरी, २००४ च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारकाळात सोनियांना हाच संवाद आठवून उमेद येते, असे प्रसंग लेखक विणतो. विजयानंतरही ‘आतला आवाज’ ऐकून सोनिया सत्तापद स्वीकारत नाहीत, इथे पुस्तक संपतं.
जे जे संदर्भ उपलब्ध आहेत त्यांच्या आधारे प्रसंग साकारायचे, अशी पद्धत वापणाऱ्या या लिखाणाला इतिहासलेखनाचा बाज अजिबातच नाही.. आहे, तो कथेसारखा- किंवा पटकथेसारखाच- रंजकपणा. तपशील आहेत, त्यांपैकी अनेक ‘उगाच’ आहेत.. एकंदर लिखाण गंभीर न वाटता, गोष्ट सांगताना मध्येच बातम्या दिल्यासारखं वाटेल. लेखक त्रयस्थ आहे, त्याला भारताशी नव्हे तर जगाशी बोलायचं आहे, त्यामुळे त्याचे प्राधान्यक्रम निराळे असूही शकतात. भारतीय राजकारणात फार खळबळ वगैरे माजवणाऱ्या घटनांकडे जग विश्वनागरिक म्हणून कसं पाहावं, याची चुणूक यातून मिळते. पण गांधी घराण्याची गोष्ट सांगताना लेखकाने, मोरारजी देसाई, मनेका गांधी या काल/ आजच्या विरोधकांची पात्रं काळ्या रंगात रंगवली आहेत आणि अनेक काँग्रेसजनांनाही अत्यंत तिऱ्हाईतपणे बिनमहत्त्वाचं मानलं आहे, त्यातून लेखकाची लघुदृष्टीच दिसते.
अखेर, सत्तेपासून दूर असताना गांधी घराणं कसं वागतं हाच लेखकाच्या कुतूहलाचा विषय असावा असा निष्कर्ष या लिखाणातून काढता येतो. इंग्रजी-भारतीय आवृत्तीसाठी खास उपोद्घात लिहिण्यात आला आहे. मे २०१४ नंतरही काँग्रेस भवितव्य नाहीच असे नव्हे, अशी एक उमेद त्यातून दिसते. परंतु हे भवितव्य राहुल घडवणार की प्रियांका, हा प्रश्न लेखकाने अचूकपणे मांडला आहे. गांधी घराण्याला भवितव्य असलं पाहिजे, हाच जणू या पुस्तकाचा ‘आतला आवाज’ होता की काय, अशी शंका पुस्तक वाचून झाल्यावर येते.
twitter@abhitamhane

द रेड सारी : अ ड्रामॅटाइज्ड बायोग्राफी ऑफ सोनिया गांधी.
– जेविएर मोरो  (मूळ स्पॅनिश लेखक)
इंग्रजी आवृत्तीचे प्रकाशक- रोली बुक्स
पृष्ठे : ४३० ; किंमत : ३९५ रु.