विशालसारखा जोडीदार भेटल्यामुळे स्वतंत्र व्यवसायाचा मार्ग अधिक सुकर झाल्याचं आदिती सांगते. तर तिच्यात मोठी झेप घेण्याची क्षमता आहे आणि तिने ती घेतली पाहिजे, असं विशालचं आदितीविषयी म्हणणं. ते दोघं म्हणजे आदिती लिमये आणि विशाल कामत. दोघांनाही हॉटेल व्यवसायाची आवड वारशानेच मिळाली. हा वारसा जपत त्याच्या नावाला धक्का न लावता, आपल्या पद्धतीनं काम करत त्यांनी आपलं सहजीवनही तितकंच ‘चविष्ट’ केलं आहे.

मुंबईतल्या दादरसारख्या मराठमोळ्या भागामध्ये वाढलेली आणि वडिलांच्या ‘जिप्सी’मध्ये रमणारी आदिती हॉटेल व्यवसायातच जाणार हे जणू ठरलेलंच होतं. ‘‘लहानपणापासून मी स्वत:समोर दोनच पर्याय ठेवले होते, एकतर वडिलांसारखं हॉटेल व्यवसायात जम बसवायचा किंवा आई आणि आजीचा वारसा जपत मूक-बधिर मुलांच्या शाळेत शिक्षिका म्हणून झोकून देऊन काम करायचं. पण मोठी होत गेले तसतशी माझी खाण्यातली आवड वाढत गेली. त्यामुळे मग हॉटेल हेच क्षेत्र नक्की झालं.’’ आदिती स्वत:च्या प्रवासाची दिशा सांगते.

wildlife lovers, Tigers, forest, cages,
‘वाघ जंगलात नको, पिंजऱ्यात हवेत का?’ वन्यजीवप्रेमींचा सवाल; प्रकरण काय? जाणून घ्या…
port at vadhvan, vadhvan,
वाढवण येथील पर्यावरणस्नेही बंदराचा मार्ग मोकळा
Emphsises on right to be free from the adverse effects of climate change
“नागरिकांना हवामान बदलाच्या प्रतिकूल परिणामांपासून मुक्त होण्याचा अधिकार”; सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या निर्णयात महत्त्वपूर्ण काय आहे?
High class houses out of MHADA lottery Thinking of stopping construction of expensive houses from now on
म्हाडा सोडतीतून उच्च गटातील घरे बाद? यापुढे महागड्या घरांची निर्मिती थांबवण्याचा विचार

हा प्रवास सुरू केल्यानंतर काही काळानंतर विशालसारखा जोडिदार भेटल्यामुळे मार्ग अधिक सुकर झाल्याचं आदितीच्या बोलण्यातून जाणवतं. विशाल मात्र त्याचं श्रेय आदितीच्या गुणांना देतो, ‘‘आदिती खूप कल्पक आहे, ती खूप उत्तम शेफ आहे आणि तिला सतत वेगवेगळं करायचं असतं. तिने केलेल्या पदार्थामुळे जीभ तृप्त होतेच पण मनही भरतं. मात्र, तिनं आता दादर-माहीमच्या बाहेर पडलं पाहिजे. तिच्यात मोठी झेप घेण्याची क्षमता आहे आणि तिने ती घेतली पाहिजे. त्या दिशेने प्रवास सुरू झाला आहे पण हे तिनं आधीच का केलं नाही, ही खंत मात्र मला वाटते.’’

‘‘आपल्या घरच्या व्यवसायात पुढे जायचं असेल तर बाहेर काम करून अनुभव घेतला पाहिजे. बाहेर जितकं शिकू तितका आपल्या स्वत:च्या विकासासाठी उपयोग होतो. मी सुरुवातीपासूनच, म्हणजे अगदी लहानपणापासून म्हटलं तरी चालेल, घरी वडिलांच्याच व्यवसायाशी संबंधित राहिलो. त्यांच्याकडेच शिकलो. मात्र, कामाचा अनुभव मी आमच्या सिंगापूरच्या हॉटेलमध्ये घेतला. तिथे मला मालकांचा मुलगा म्हणून विशेष वागणूक मिळत नव्हती, जे इथं व्हायचं. त्यामुळे तिथे मला शिकता आलं. अर्थात मला बाहेर इतरांबरोबर काम करून शिकायची संधी मिळाली नाही. आदितीला ती संधी मिळाली आणि तिने त्याचा पुरेपूर वापर करून घेतलाय.’’ विशाल, अभिमानाने बायकोबद्दल बोलतो. आदितीने २००२ मध्ये सोफिया पॉलिटेक्निकमधून केटिरगचा कोर्स पूर्ण केल्यानंतर तीन-साडेतीन र्वष नोकरी करून बाहेर काम करण्याचा अनुभव घेतला होता.

आदिती आणि विशाल या दोघांनाही हॉटेल व्यवसायाची आवड वारशानेच मिळाली.

राहुल लिमये यांच्या ‘जिप्सी’नं दादरकरांना नव्या चवी शिकवल्या, तर विठ्ठल कामत या नावाचा हॉटेल व्यवसायात काय दबदबा आहे ते वेगळं सांगायला नको. केटिरगच्या कोर्सनंतर आदितीने बाहेर कामाला सुरुवात केली. अशाच एका ठिकाणी तिची विशालशी ओळख झाली. विशाल तेव्हा मित्राबरोबर हॉटेलमध्ये ग्राहक म्हणून आला होता, आदिती तिथेच काम करत होती. ‘‘तसे आम्ही लहानपणापासून एकमेकांना ओळखायचो, कामत आणि लिमये कुटुंब ३५ वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते. आई-वडिलांमध्ये चांगली मैत्री होती. आमचा मात्र नंतर संपर्क तुटला होता, तो त्या दिवशी पुन्हा जुळला’’, आदितीनं सांगितलं. यथावकाश २००८ मध्ये अगदी पारंपरिक पद्धतीनं त्यांचं लग्न झालं.

विशाल भेटला तेव्हा आदिती काम करत होती आणि तिला स्वत:चं काहीतरी सुरू करायचं होतं. विशाल आधीपासूनच वडिलांसोबत काम करत होता आणि सतत फिरतीवर असायचा. मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं तरी एकमेकांसाठी फार वेळ देणं शक्य व्हायचं नाही. तेव्हा महिन्यातून एकदा भेट झाली तरी खूप वाटायचं. विशालशी लग्न झाल्यानंतर आदितीनं स्वत:च्या व्यवसायाकडे झेप घेतली. तिनं घरातूनच केक बनवणं आणि त्यांच्या होम डिलिव्हरी घेणं अशी ‘होम शेफ’ची कल्पना होती. हा आदितीचा पहिला ब्रँड होता. पुढे तिने तो वाढवला. आता ती कोणत्याही वयोगटातील लोकांसाठी हक्काची जागा झाली आहे. ‘‘आदितीने त्यानंतर सुरू केलेलं ‘ओपन हाऊस’ खऱ्या अर्थानं टर्निग पॉइंट होता. तिच्यासाठी आणि दादरसाठीही. मराठमोळ्या भागामध्ये पब कल्चर आणलं म्हणून सुरुवातीला काही प्रमाणात टीकाही झाली. पण सर्वात महत्त्वाचं हे होतं की ते आदितीनं, एका मुलीनं सुरू केलं होतं. आणि तिला ‘ओपन हाऊस’बद्दल पुरेपूर खात्री होती. तिनं ते उत्तमरीत्या अमलात आणलं. त्यामुळेच आज दादर आणि बाहेरच्याही तरुण मुला-मुलींसाठी एकमेकांना निवांत भेटण्यासाठी ती एक हक्काची जागा झाली आहे.’’ विशालचा मुद्दा पुढे नेताना आदिती सांगते की, ‘‘मी दादरचीच आहे, आणि मला दादरला काहीतरी वेगळं, सगळ्यांना आवडेल असं काहीतरी द्यायचं होतं. आज दुपारी आजीबाई येऊन माझ्या ‘ओपन हाऊस’मध्ये सहजपणे वाईनची मजा लुटतात आणि तरुण मुली घरी बिनधास्त सांगून निघतात की आदितीच्या पबमध्ये जात आहे. माझ्यासाठी ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. हा माझ्यावर टाकलेला विश्वास मला खूप महत्त्वाचा वाटतो.’’

‘ओपन हाऊस’नंतर माहीममध्ये ‘क्वार्टर हाऊस’ सुरू केलं आणि आता ४ महिन्यांपूर्वी सुरू केलेल्या ‘सिझलर्स हाऊस’लाही चांगलाच प्रतिसाद मिळतोय. ‘‘हॉटेल व्यवसायात मोठं होण्यासाठी एकनिष्ठ ग्राहक मिळवणं फार आवश्यक असतं आणि आदितीनं ते मिळवलेत. अनेक जण तर आठवडय़ातून दोन-तीन वेळाही येतात. आणि तिच्या डिशेस लोकप्रिय असल्या तरी प्रत्येकाची एखादी खास डिश आवडीची असतेच. असे आवडीचे पदार्थ हक्कानं खाण्यासाठी लोक येतात. त्यामुळे त्या पदार्थाची लज्जत कायम राखण्याकडेही तिचा कटाक्ष असतो,’’

विशाल हलकेच काही गोष्टी उलगडून सांगतो. ‘‘मी स्वत: रोज बटाटय़ाची भाजी आणि पोळी खाऊनही राहू शकतो. आदितीचं तसं नाही. तिला रोजच जेवणात व्हरायटी आवडते आणि तिला नवनवीन पदार्थ खाऊन बघायची देखील आवड आहे. अनेकदा एखाद्या दूरच्या हॉटेलमध्ये फक्त एखाद्या पदार्थाबद्दल ऐकलं म्हणूनही आम्ही तिथे जातो आणि तो खाऊन बघतो. त्यानंतर मग तो पदार्थ कसा केलेला असेल याची चर्चा पुढे काही दिवस सुरू राहते.’’ ऑथेंटिक फूडपेक्षाही आदितीला फ्युजन करायला आवडतं. खास भारतीय पदार्थाना थोडा वेस्टर्न टच द्यायचा किंवा वेस्टर्न डिश करताना त्यामध्ये थोडे भारतीय बदल करायचे. ‘‘अनेकदा त्यांचे काही पदार्थ आपल्याकडे करताना विनाकारण खूप महाग पडतात, त्यामध्ये थोडा बदल केला तर ते सर्वसामान्यांच्या बजेटमध्येही येऊ  शकतात आणि सतत काहीतरी नवनवीन बदल करत राहणंही मला आवडतं. फक्त पदार्थच नाही तर कोणतीही नवीन गोष्ट करायची असेल तर मी विशालशी खूप चर्चा करते. घरी आल्यानंतर आम्ही सतत बोलत असतो. माझ्या प्रत्येक गोष्टीचा तो सर्वात पहिला समीक्षक असतो. त्यामुळे चुका सुधारणं मला सोपं जातं,’’ आदिती सांगते.

‘‘आदिती जे काही करते आहे, ते पूर्णपणे तिला हवं आहे म्हणून करते. तू अमुकच कर किंवा तमुकच करू नको, अशा पद्धतीने कर, तसं करू नको असं मी सांगत नाही. मुळात आपण काम का करतो? आपली ती पॅशन असते म्हणून. काही जणांना त्यांच्या पॅशनचं रूपांतर कामामध्ये करायची संधी मिळते तर काही जण कामालाच पॅशन मानतात. सुदैवानं आमच्या आधीच्या पिढीने पुरेशी तरतूद करून ठेवली आहे, त्यामुळे फक्त पैसे मिळवणं हा आमच्या कामाचा उद्देश नाही. दोघांच्याही वडिलांनी आपापलं नाव केलं आहे. त्या नावाला धक्का न लावता, आपल्या पद्धतीनं काम करत पुढे जायचं हे खरं आव्हान आहे आणि त्यात मजाही आहे,’’ विशाल सांगतो.

नवनवीन प्रयोगांमुळे आणि खवय्यांना सुखावणाऱ्या चवीमुळे आदितीचं नाव झालंय. वडिलांचा व्यवसाय आणखी वाढवणारा विशाल आदितीच्याही कामाची व्यावसायिक बाजू बघतो. त्याची मदत आदितीसाठी मोठा आधार आहे. आदितीचं नाव होतं, आपलं मात्र नाही असा विचार मनात येत नाही का, असा प्रश्न विचारल्यावर, विशालही तितकंच थेट उत्तर देतो. ‘‘माझं नाव कशाला? उगाच सगळीकडे नाव यायची गरज नाही. हे म्हणजे राजकीय पोस्टरबाजीसारखं झालं. याचं नाव आहे म्हणून त्याचं नाव. त्याची गरज नसते.’’ कदाचित आदिती आणि विशाल यांच्या चविष्ट जीवनाचं हेच गमक असावं.

एकदा आपल्याला काय हवं आहे हे माहिती असण्याबरोबरच आपल्याला कशाची गरज नाही याचीही जाणीव असली की समस्या कमी होतात. वेगळं काही करू पाहणाऱ्या जोडप्यांसाठी तर विशालची ही बाब अधिकच महत्त्वाची ठरते ती याचमुळे!

निमा पाटील nima_patil@hotmail.com