बैलगाडय़ांच्या शर्यतींवर वा चिखलगट्टा शर्यतींवर बंदी आणि जलिकट्टसाठी अध्यादेश, ही विषमताच. महाराष्ट्रातील शेतकरी खलनायक नाहीत, हे आधी समजून घेतले पाहिजे..

गेल्या काही महिन्यांमध्ये दोन घटनांमुळे तामिळनाडू हे राज्य देशभर चच्रेत राहिले. शशिकला यांनी जयललिता यांचा वारसदार घोषित करून मुख्यमंत्रिपदाची धुरा सांभाळण्याचा केलेला प्रयत्न, त्याच काळात अवैध संपत्तीप्रकरणी सुप्रीम कोर्टाने त्यांना दिलेली शिक्षा व त्याच काळात मुख्यमंत्री पनिरसेल्वम यांनी घेतलेला बंडाचा पवित्रा या राजकीय घडामोडी होत असताना तामिळनाडूतील ग्रामीण तमिळ लोक जलिकट्ट या बलांच्या खेळावरील बंदी उठवावी या मागणीसाठी प्रचंड प्रमाणावर रस्त्यावर उतरले होते. उत्स्फूर्तपणे सुरू झालेल्या खेडय़ापाडय़ातील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला मोठय़ा प्रमाणात प्रतिसाद मिळतो व हळूहळू या आंदोलनाचे लोण शहरापर्यंत पोहोचू लागले हे पाहून या आंदोलनात घुसून ते आंदोलन आपणच करतो आहोत हे दाखविण्यासाठी राजकीय नेत्यांमध्ये चढाओढ सुरू झाली. आंदोलनाची तीव्रता एवढी मोठी होती की केंद्र सरकारला त्याची दखल घेत तातडीने अध्यादेश काढावा लागला.

तामिळनाडूतील जलिकट्ट असेल किंवा महाराष्ट्रातील बलगाडी शर्यत व सह्य़ाद्रीच्या पायथ्याला व तळकोकणात होत असलेल्या चिखलगुट्टा स्पर्धा असतील ही खेडय़ातील शेतकऱ्यांची विरंगुळ्याची व करमुणकीची साधने आहेत. अलीकडे करमणुकीची जागा जीवघेण्या स्पध्रेने घेतली आणि त्यामुळे काही अनिष्ट गोष्टी घडू लागल्या हे नाकारता येत नाही, परंतु प्राणिमित्र आणि पेटा या संस्थेने शेतकऱ्यांनी बलांचा प्रचंड छळ सुरू केलेला आहे अशा आविर्भावात या स्पर्धाच्या विरोधात भूमिका घेतली व चिकाटीने प्रयत्न करून सर्वोच्च न्यायालयातून बंदी घालण्याचा निर्णय करून आणला. शेतकऱ्यांची बाजू कोर्टासमोर फारशी आलीच नाही.

ज्या वन्यजीव अत्याचार प्रतिबंध अधिनियम १९६०चे कलम २२ अन्वये या स्पर्धावर बंदी घालून शेतकऱ्यांवर अन्याय केलेला आहे. ते कलम खरोखरच लागू होते का की, काद्यातील काही त्रुटी व एखाद्या गोष्टीचे आकलन करण्यात कायद्याची झालेली चूक याचा गरफायदा घेत अडाणी शेतकऱ्यांवर तथाकथित मानवतावादी पर्यावरणवाद्यांनी केलेली दडपशाही आहे हे समजून घेणे आवश्यक आहे. बलगाडीच्या शर्यतीसाठी खिलार या बलाची प्रजाती उपयुक्त असते. खिलार ही प्रामुख्याने महाराष्ट्रातील पर्जन्यछायेच्या प्रदेशातील म्हणजेच दुष्काळी पट्टय़ामध्ये पदास केली जाते. लांबसडक पाय, सडसडीत बांधा, कमी वजन, पांढराशुभ्र रंग, टोकदार िशगे, लांब शरीरयष्टी, रुबाबदार विशड आणि हरणालाही लाजवेल अशी चपळता ही खिलार या जातीच्या बलाची वैशिष्टय़े असतात. कमी खाणे व काटकपणे कष्टाची कामे करणे या वैशिष्टय़ामुळे हा बल शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय आहे. खिलार ही गाय प्रामुख्याने बलाच्या उत्पादनासाठीच पाळली जाते. तिला फारसे दूध नसते. या गायीने चांगला रुबाबदार खोंड जन्माला घातला तर शेतकऱ्याला तीन ते चार वर्षांत किमान १ ते २ लाखाचे उत्पन्न मिळवून देते. दुष्काळी पट्टय़ातील शेतकरी खिलार गायीच्या कळपाचे संगोपन करून आपल्या चरितार्थासाठी खिलार बलांची पदास करून अवर्षणप्रवण भागात कसाबसा जगण्याचा प्रयत्न करत असतो. चांगल्या जातिवंत बलाची पदास हेच त्याच्या जगण्याचे व उत्पन्नाचे साधन असते. हल्लीच्या काळात तर चांगला जातिवंत पळणारा बल निपजला तर एका बलाची किंमत जवळपास १० लाखांपर्यंत मिळते, पण त्यासाठी त्याच्यावर फार मेहनत घ्यावी लागते. काही काही लोक तर बलाला पीठ, बदाम, शेळीचे दूध, अंडी, शेंगदाणे, तूप, उडीद असा दैनंदिन खुराक घालतात. बलाला दिवसातून थंड पाण्याने धुणे, शर्यतीहून आल्यानंतर त्याला शेक देणे व मसाज करणे अशी त्याची सेवा करावी लागते. आपल्या मुलाबाळांपेक्षाही जास्त प्रेम शेतकरी आपल्या बलावर करत असतो. बलही तितकेच शेतकऱ्याशी प्रामाणिक असतात. एखाद्या शेतकऱ्याच्या घरात काही दु:खद घटना घडल्यास त्या शेतकऱ्याच्या गोठय़ातील बल पाणीसुद्धा पीत नाहीत, अशा घटना अनेक वेळा अनुभवायला मिळतात. शेतकरीही बलामध्ये भावनिकदृष्टय़ा गुंतलेला असतो. बल म्हातारा झाला म्हणून त्याला बाजारात अजिबात विकत नाही कारण त्याला माहिती असते, बाजारात म्हातारा बल खरेदी करणारा माणूस त्या बलाला कत्तलखान्याला नेऊन विकणार असतो. त्याची अशी श्रद्धा असते की ज्या बलाने आयुष्यभर आपल्या कुटुंबाची सेवा केली त्या बलाची म्हातारपणी आपण सेवा करून किमान थोडीफार उपकाराची परतफेड करावी. म्हातारा बल मेल्यानंतर आपल्याच शेतामध्ये त्याच्यावर विधिवत अंत्यसंस्कार केले जातात व ज्या ठिकाणी त्याचे दफन केलेले असते त्या ठिकाणी त्या बलाच्या आठवणीखातर आंबा, पेरू, नारळ असे एखादे फळझाड लावले जाते. कठीण आíथक परिस्थितीमुळे शेतकऱ्यावर बल विकण्याची जर दुर्दैवी वेळ आलीच तर तो शक्यतो ओळखीच्या माणसाला बल विकण्याचा प्रयत्न करतो. बाजारात जाण्याचा प्रसंग आलाच तर आलेल्या गिऱ्हाईकाबरोबर किमतीची चर्चा करता करता त्यांच्या स्वभावाचाही अंदाज घेत असतो. बोलता बोलता मध्येच कमरेचा बटवा काढून गिऱ्हाईकाला पान-तंबाखू देऊ करतो. बल खरेदी करण्यास आलेले गिऱ्हाईक पानाच्या शिरा काढून चुना लावून सुपारी कात्रून कातासहित पानाचा तोबरा भरतो व वर तंबाखूची गुणी सोडतो त्या वेळी बल विकणारा खूश होतो. कारण बल मालकाच्या लक्षात येते की, आपण योग्य शेतकऱ्याला बल विकतो आहोत. त्याला माहिती असते की समोरचा शेतकरी जेव्हा बल घेऊन शेतात औताला जाईल तेव्हा अधूनमधून त्याला पान-तंबाखू खाण्याची तलफ येईल. त्यासाठी तो औत थांबवेल व पान-तंबाखू खाईल. तेवढय़ा वेळेत माझ्या बलाला विश्रांती मिळेल. इतका विचार शेतकरी करत असतो, तो बलाचा छळ कसा बरे करेल?

पण प्राणिमित्रांच्या मते शेतकरी हा अतिशय दुष्ट असतो आणि तो बलाचा छळ करतो. वास्तविक कुस्ती हा मर्दानी खेळ आहे तसाच बलगाडय़ांची शर्यत हाही शेतकऱ्यांचा एक खेळ आहे. त्याला बंदी घालणे म्हणजे शेतकऱ्यांच्या ग्रामसंस्कृतीवर अतिक्रमण करण्यासारखे होईल. वास्तविक पाहता वन्यजीव अधिनियम १९६० मध्ये वाघ, अस्वल, माकड, चित्ता, सिंह या प्राण्यांच्या प्रदर्शन, प्रशिक्षण याच्यावर बंदी घातली आहे. पण काही अतिशहाण्यांनी बल या पाळीव प्राण्याचा त्यात समावेश केला आहे. या तांत्रिक मुद्दय़ाचा आधार घेत हे तथाकथित प्राणिमित्र व पर्यावरणवादी आमच्या ग्रामसंस्कृतीवर अतिक्रमण करीत आहेत. बलाप्रमाणेच घोडय़ाच्याही शर्यती होतात. त्यांच्यावर करोडो रुपयांचा सट्टा खेळला जातो. रेसकोर्सवरील पळणारा घोडा जखमी झाला, शर्यतीसाठी निकामी झाला तर त्याला क्रूरपणे गोळी घातली जाते. या विरोधात प्राणिमित्रांनी आवाज उठविलेला कधीच ऐकला नाही. माणसाने कशा प्रकारचे अन्न खावे हा ज्याच्या त्याच्या मूलभूत स्वातंत्र्याचा भाग आहे. हे जरी खरे असले तरी ज्या प्राणिमित्रांना शेतकऱ्यांनी बलाचा छळ केल्यामुळे त्या गरीब बिचाऱ्या बलाची दया येते. प्राणिमित्र जर चिकन खात असतील तर गळ्यावरून सुरी फिरत असताना त्या कोंबडीच्या भावना काय असतील, ते जर अंडी खात असतील तर हे जगही न बघितलेल्या जीवाला तव्यावर करपताना काय वाटले असेल. ते जर मासे खात असतील तर पाण्यातून बाहेर काढल्यानंतर माशाची तडफड कशी झाली असेल याचाही विचार करावा आणि मग स्वत:च्या मुलाबाळांपेक्षाही बलावर अतोनात प्रेम करणाऱ्या शेतकऱ्याला खुशाल खलनायक ठरवावे.

चिखलगुट्टा हासुद्धा असाच एक शेतकऱ्यांचा करमणुकीचा खेळ. पाऊस पडल्यानंतर बल व गुरा-ढोरांच्या साह्य़ाने खाचरामध्ये चिखलणी करून भाताच्या रोपांची लागवण केल्यानंतर पावसाचा थोडा जोर ओसरला तर शेतकऱ्यालाही उसंत मिळते. अशा काळात कोकणातला शेतकरी चिखलगुट्टय़ाचा खेळ खेळतो. २०० मीटर लांबीच्या खाचरात चिखल केला जातो. वरून पाऊस पडत असतो. अशा पडणाऱ्या पावसात औतासहित चिखलामध्ये शेतकरी बल पळवितात. अर्थात बलाबरोबर त्यालाही त्या चिखलात पळावे लागते. सगळ्यात कमी वेळात जो अंतर कापेल तो जिंकतो. यात शेतकरीसुद्धा चिखलात माखून जातो. अनेक गमतीजमती घडतात. ही शर्यत बघायला संपूर्ण पंचक्रोशी जमलेली असते. आजही या स्पर्धा होतात पण त्यासाठी पोलिसांना लाच द्यावी लागते का तर त्यांनी वन्यजीव अत्याचार प्रतिबंधक कायद्याचा भंग केला म्हणून गुन्हा नोंदवू नये यासाठी. तामिळनाडूत लोकांनी आक्रमकपणे रस्त्यावर येऊन आपल्याला आवश्यक असणारा अध्यादेश काढण्यास भाग पाडले, पण आमच्या मराठमोळ्या शेतकऱ्यांना मात्र बलगाडीच्या शर्यतीसाठी सरकारचे उंबरठे झिजवावे लागतात ही दुर्दैवाची गोष्ट. तरीही याबद्दल कुणी काही बोलायला तयार नाही. बलगाडय़ांची शर्यत हे खेडय़ापाडय़ातल्या सर्वसामान्य लोकांच्या करमणुकीचे; तसेच दुष्काळी भागातील लोकांच्या जगण्याचे साधन आहे. आम्ही कैक कोटी रुपयांचा सिंचन घोटाळा करून दुष्काळी भागातील जनतेला सिंचनापासून वंचित ठेवले. पाण्याऐवजी पसा अडवून पसा जिरवला. निसर्गाचे संतुलन बिघडले व नसर्गिक आपत्ती आणि अवर्षणाचा तडाखा वारंवार दुष्काळी भागातील जनतेला बसू लागला. सततची नापिकी त्यांच्या नशिबी आली. बँका त्यांना दारातही उभे राहू देत नाहीत, अशा परिस्थितीत ज्या खिलार गायींची पदास करून त्यातून रुबाबदार व पळणाऱ्या बलाची निर्मिती करणे हेच दुष्काळी भागातील जनतेचे उदरनिर्वाहाचे साधन असताना, आज केवळ काही लोकांच्या मर्जीखातर कायद्यातील त्रुटीचा आधार घेत या दुष्काळी भागातील जनतेच्या अर्थकारणावर घाला घालणाऱ्या बलगाडी शर्यतबंदीचा फायदा नेमका कोणाला होणार, यावर चर्चा होणे आवश्यक आहे.

मुक्या प्राण्याचा छळ किंवा त्यांच्यावरील अत्याचार याचे मी अजिबात समर्थन करणार नाही; परंतु काही कडक नियम करून बलांना शारीरिक हानी व इजा होणार नाही याची दक्षता घेत, बलगाडय़ांच्या शर्यतीला परवानगी देत ग्रामीण संस्कृती जिवंत ठेवली पाहिजे असे आवर्जून सांगावेसे वाटते. आयपीएलचा तमाशा, त्यासाठी पाण्याचा होणारा वारेमाप खर्च, विजेची उधळपट्टी, सट्टेबाजी त्यात गुन्हेगारांचा होणार शिरकाव त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेवर पडणारा ताण याचा विचार करता आमच्या गावाकडच्या बलगाडीच्या शर्यती म्हणजे खेडय़ापाडय़ातील सर्वसामान्यांचे करमणुकीचे साधन व दुष्काळी भागातील शेतकऱ्यांचे कोणाच्याही मदतीशिवाय स्वतंत्रपणाने उभे केलेले चरितार्थाचे साधन आहे. म्हणून मायबाप सरकारने एका निर्णयाद्वारे तिजोरीवर बोजा न टाकता दुष्काळी जनतेला दिलासा द्यावा ही माफक अपेक्षा.

लेखक स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक आणि विद्यमान खासदार आहेत. ईमेल : rajushetti@gmail.com