सारीपाटाचा खेळ आठवतो का? चार चौकोन, चार दिशा असलेला तो पट, चार वेगवेगळ्या रंगांच्या सोंगटय़ा.. आताच्या भाषेत नेमके सांगायचे तर चार रस्ते एकत्र येतात आणि त्यामध्ये चौकोन किंवा चौक- तशा आकाराचा हा कापडी पट असतो. प्रत्येक दिशेला तीन उभ्या रांगा व प्रत्येक रांगेत आठ चौकोन- म्हणजे २४ घरे असतात. चारही कापडी पट्टय़ांवर मिळून २४ गुणिले ४ अशी ९६ घरे असतात. खेळणाऱ्या प्रत्येकाला सर्व घरे फिरणाऱ्या लाल, पिवळ्या, हिरव्या, काळ्या या चार रंगांतल्या सोंगटय़ा मिळतात. प्रारंभी या सोंगटय़ा बाहेर असतात. फासे टाकून दान आले की सोंगटय़ा घरात लागतात. हा खेळ चारजण खेळू शकतात. किंवा दोघेजण चारजणांचा खेळ खेळू शकतात. हा बैठा खेळ आहे. यात श्रम नाहीत, पण कौशल्य निश्चित आहे. हातातलं दान कसे पडते त्यानुसार खेळ पुढे सरकतो. खेळात बारकाईने लक्ष हवे. नजर हवी. अन्यथा चिडचीड होऊ शकते. ज्या भिडूच्या जास्त सोंगटय़ा मधल्या घरातून मधल्या चौकोनात ओणव्या किंवा आडव्या आल्या, तो जिंकला. या सगळ्याला नियमांचा आधार आहे. उडतपगडी, दुड्डी, सखरेसात असे प्रांताप्रांतानुसार बदलणारे शब्दही यात आहेत. एकत्र कुटुंबांत हा खेळ पूर्वी खेळला जात असे.

हे सर्व आठवण्याचे कारण म्हणजे गीतकार राजा बढे यांनी लिहिलेले व गायक-संगीतकार गजानन वाटवे या जोडीचे ‘ऑल टाइम हिट्’ असे भावगीत.. ‘मोहुनिया तुजसंगे नयन खेळले जुगार.’ राजा बढे यांनी सोंगटय़ांच्या रूपकाचा वापर या भावगीतात केला आहे. यात प्रीतीतील हार-जीत सारीपाटातल्या शब्दांतून खुलविली आहे. म्हणूनच या गीतात अनवट शब्द दिसतात. आता हा प्रेमगीतातला खेळ दोन नयनांनी खेळला आहे, की दोन नयनांनी, पण एकाच नयनाचा अधिकाधिक उपयोग करून खेळला आहे, हे ‘समझनेवालों को’ या कक्षेतले आहे.

mugdha godbole shared angry post after kshitee jog receiving negative comments
“मंगळसूत्र घालावं की नाही?”, क्षिजी जोगच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या गलिच्छ कमेंट्स, प्रसिद्ध अभिनेत्री संतापून म्हणाली…
Jaya Bachchan Birth Day
Jaya Bachchan: रेखा नावाचं वादळ, राज ठाकरे नावाचा झंझावात परतवणारी चतुरस्र नायिका
amruta khanvilkar
‘नवनव्या भूमिकांचे आव्हान स्वीकारण्यात आनंद’
Aarti Singh To Marry Boyfriend Deepak Chauhan
प्रसिद्ध अभिनेत्री ३९ व्या वर्षी करतेय अरेंज मॅरेज, नवी मुंबईचा आहे होणारा पती; म्हणाली, “माझ्या आयुष्यात…”

‘मोहुनिया तुजसंगे नयन खेळले जुगार ।

ओठावरले हासे फेकियले रे फासे

खेळाचा होय निकर, हो जिवलग जादूगार ।

सहज पडे तुजसि दान, लागले पणास प्राण

मी पणात मन हरले, येई ये गळ्यात हार।

सारिलेस मोहरे सहज अडविलेस चिरे

बंद जाहली घरे, खेळ संपणार काय।

पळभर जरी जुग जुळले कटिवरूनी वरि सरले

एकुलती एक नरद, पोटघरी होय ठार ।

पटावरूनि लाजरे पळे घरात मोहरे

बाजू बिनतोड मला, देई चतुर हा खिलार।’

या प्रीतीच्या जुगारात ओठावरले हसू हे जणू खेळातले फासे आहेत. दोन्ही भिडूंची पराकाष्ठा चालली आहे. तुला सहजपणे हवे तसे दान पडते आहे. मी मात्र ‘मी’पणात हरतोय असे वाटते. ‘येई ये गळ्यात हार..’मध्ये हा फुलांचा हार नसून हार-जीतमधली हार आहे. सर्व घरे बंद होणार, मग खेळ संपणार की काय अशी शंका येते. काही क्षणांकरिता दोन सोंगटय़ा एकाच वेळी एका घरात येतात तेव्हा जुग जुळले अशी स्थिती असते. अशी स्थिती असली की एका सोंगटीने त्या मारता येत नाहीत. एकुलती एक नरद.. म्हणजे सोंगटी.. पोटघरी ठार होते. ‘बाजू बिनतोड’ मिळते अशी स्थिती येते. असा चतुराईने खेळलेला हा जुगार आहे. म्हणूनच हा खेळ कौशल्याचा आहे.

पाच अंतरे असलेले हे भावगीत आहे. त्यातील प्रत्येक अंतरा महत्त्वाचा आहे. कारण प्रत्येक अंतरा ही वेगळी चाल (खेळातली) आहे. ही चाल संगीतकार गजानन वाटवेंच्या चाणाक्ष नजरेतून सुटली नाही. म्हणूनच संगीतरचना करताना या भावगीताला त्यांनी वेगळ्या चालीत गुंफले आहे.

हे भावगीत ‘शिवरंजनी’ रागात बांधले आहे. या रागात स्वर सगळे ‘भूप’ रागाचे, पण गंधार व धैवत कोमल आहेत. शिवरंजनी रागात ‘कोमल गंधार’ हा श्रुतिविभाजनानुसार जितका अतिकोमल; तितकी भावना उत्कट होताना दिसते. मराठी-हिंदीतील अनेक गीतांमध्ये या रागाचा वापर आढळतो.

प्रेमगीतातील या खेळाला संगीतकार गजानन वाटवे यांनी उत्तम स्वरांत बांधले आहे. सर्व अंतरे पूर्ण होताना प्रत्येक शब्दात खास अवरोही जागा आहेत. गाण्याची चाल योग्य प्रकारे आत्मसात केल्याशिवाय हे गाणे म्हणता येत नाही. हे गाणे पूर्ण गाता आले तर तो आनंद काही वेगळाच आहे. काही वर्षांपूर्वी हे गीत एका कॅसेटमध्ये गायक रवींद्र साठे यांच्या स्वरात ऐकायला मिळाले. चांगल्या कविता व अनुरूप स्वररचना नव्या पिढीला ऐकायला मिळाव्यात, हा त्यामागचा उद्देश होता. हेच गाणे डिजिटल पद्धतीच्या स्टिरिओ रेकॉर्डिग स्वरूपातही समोर आले. नव्या ध्वनिमुद्रणामुळे संगीत संयोजनात काही बदल करता आले. रवींद्र साठेंच्या गायनास व अप्पा वढावकर यांच्या संगीत संयोजनाला खुद्द वाटवे यांनीही दाद दिली.

गायक रवींद्र साठे हे वाटवेअण्णांबद्दल सांगतात, ‘अण्णांनी कोणाचाही हेवा केला नाही. प्रामाणिकपणे, एकनिष्ठेने भावगीताच्या क्षेत्रात ते काम करत राहिले. पाश्र्वगायक होणे, हिंदी व मराठीत सिनेसंगीतकार होणे यासारखी प्रलोभने टाळून भावगीत गायनाला जन्म देणाऱ्या दिग्गजांमध्ये अण्णांचे काम मला जास्त मोलाचे वाटते. त्यादृष्टीने ते खरंच ‘युगनिर्माते’ आहेत.’

‘मोहुनिया..’सह गायिका रंजना जोगळेकर यांनी अण्णांची आठ गीते ‘रानात सांग कानात’ या कॅसेटसाठी गायली आहेत. यातून एक गोष्ट सिद्ध होते, की गजानन वाटवेंची गाणी पुढल्या पिढीलाही प्रेरणादायी ठरली. वाटवेंचा काळ १९४२ ते १९६०. हा भावगीत गायनाच्या भरभराटीचा काळ होता. पुण्यामध्ये त्यावेळी अनेक गायक भावगीतांचे जाहीर कार्यक्रम करीत. पुण्यात मंडई गणपतीसमोर- गजानन वाटवे, जाईचा गणपती- विश्वास काळे, नगरकर तालीम- अशोक जोगळेकर, लोखंडे तालीम- बबनराव नावडीकर, खालकर तालीम- दत्ता वाळवेकर, उंबऱ्या गणपती- राम पेठे.. असे सगळे कार्यक्रम भावगीत गायकांनी व्यापलेले असत. त्याकाळी आठ-दहा दिवसांत काव्यगायनाचे ३०- ४० कार्यक्रम होत. वाटवेंचे कार्यक्रम म्हणजे गर्दीचा उच्चांक- हे ठरलेलेच.

त्या काळात सुशिक्षित मध्यमवर्ग हा या कार्यक्रमांचा मुख्य श्रोतृवर्ग असे. हे श्रोते जाणकार व बुद्धिमान होते. ज्या विद्यार्थ्यांना संगीत व काव्यात रुची होती असे श्रोतेही येत. भावगीत ऐकण्यात मनरंजन होत असे. कदाचित अपुरी राहिलेली स्वप्ने भावगीतात सापडतात असेही श्रोत्यांना वाटत असावे. रस्त्यांवरील चौक व उत्सवांचे मंडप हे भावगीत कार्यक्रमांचे व्यासपीठ असे. लोकप्रिय गायक होण्याआधी गजानन वाटवेंचे जीवन कमालीच्या हालअपेष्टांनी व्यापले होते. पण उत्तम गायन शिकायचे हा त्यांचा ध्यास होता. संगीत विशारद व्हायचे व उत्तम काव्य स्वरबद्ध करायचे, ही त्यांच्या मनीची प्रबळ इच्छा होती. त्यासाठी ते घराबाहेर पडले. माधुकरी मागून पोट भरले. गाणे शिकण्यासाठी खूप वणवण व भ्रमंती केली. दरम्यान साथीच्या रोगांनीही सतावले. अशा अनेक कठीण प्रसंगांना वाटवेंनी तोंड दिले. अर्थात या प्रवासात त्यांना मनातली भावना जाणणारे मित्रही भेटले. उत्तम गुरू भेटले. पं. विनायकबुवा पटवर्धन, गोविंदराव देसाई, विष्णुबुवा उत्तुरकर यांच्याकडे गायनाचे धडे त्यांना मिळाले. सुरेशबाबू माने, मा. कृष्णराव, हिराबाई बडोदेकर यांच्या मैफिलींतील भारदस्तपणा त्यांना आवडे. कीर्तनकार काशीकरबुवा, कऱ्हाडकरबुवा, कोपरकरबुवा आणि मिरजेचे मुश्रीफबुवा यांचे संस्कार ते मानत. १९३८ ते १९७० पर्यंत भावगीत-युग नांदतं राहिलं याचं श्रेय गजानन वाटवेंकडे जातं.

‘आज जिंकिला गौरीशंकर’ हे वाटवेंचे गाणे राजाभाऊंनी बसप्रवासात अत्यल्प वेळात लिहिले. राजा बढे यांनी त्या काळात स्वत:वरही कविता केली होती..

‘टोपी किंचित उंच, नीट कलती बाजूस डोकावित

खासे धोतर पायघोळ अगदी टाचेवरी लोळत ।

ओठांनी रसरंग फेकत सदा या मंगलाचे सडे

आहे कोण म्हणूनी काय पुसता? हा तोच राजा बढे।’

चित्रगीते, लावण्या, पोवाडे, संगीतिका-गीते, भावगीते, वीणागीते असे अनेक प्रयोग राजा बढे यांच्या काव्यात आढळतात.

प्रेमाच्या जुगाराचे मनोहारी दर्शन घडवणारे कवी राजा बढे आणि गायक-संगीतकार गजानन वाटवे असा संगम असलेले ‘मोहुनिया तुजसंगे’ हे गीत पिढय़ान ्पिढय़ा गायले जाईल. राजाभाऊंची असंख्य प्रीतीगीते लोकप्रिय आहेत. ‘मोहुनिया तुजसंगे’मधला प्रियकर हा सारीपाटाचा खेळ जिंकला आहे. खेळातली चाल आणि गाण्याची चाल एकाच वेळी यशस्वी झाली आहे. राजाभाऊ बढे एका वेगळ्या प्रेमगीताच्या खेळात वेगळीच चाल खेळतात. ते म्हणतात..

‘प्रेम केलें काय हा झाला गुन्हा?

अंतरीची भावना सांगू कुणा?’

आता ‘मोहुनिया तुजसंगे’ या गीतातील प्रियकर हा सारीपाटात जिंकला की त्याने तसे भासवले, हे तुम्हीच ठरवा. पण दोघांनी आपल्याला खेळात गुंतवले, हे नक्की!

 विनायक जोशी vinayakpjoshi@yahoo.com