‘‘आमच्या संघातील पंधराही खेळाडू विजयवीर आहेत,’’ हे वाक्य डॅरेन सॅमीने विश्वचषकाच्या पूर्वीच म्हटले होते आणि त्याचा प्रत्यय आता साऱ्यांना यायला लागला आहे. विश्वचषकापूर्वी वेस्ट इंडिजला कुणीही गंभीरपणे घेतले नव्हते. त्यांच्या कामगिरीपेक्षा मानधनाचा मुद्दा अधिक चघळला जात होता. पण सध्याच्या घडीला वेस्ट इंडिजची कामगिरी आणि त्यांच्याकडे असलेल्या एकापेक्षा एक अष्टपैलू खेळाडूंबाबत सारेच चर्चा करताना दिसत आहेत.
कर्णधार डॅरेन सॅमी हा एक गुणवान अष्टपैलू खेळाडू आहे. सध्याच्या घडीला तो जास्त गोलंदाजी करताना दिसत नाही, पण फलंदाजीच्या जोरावर कोणत्याही क्षणी तो सामन्याचा नूर बदलू शकतो. ख्रिस गेल झंझावाती फलंदाजीसाठी ओळखला जात असला तरी त्याने या विश्वचषकातही चांगली गोलंदाजी केली आहे. आंद्रे रसेल आणि ड्वेन ब्राव्हो हे वेस्ट इंडिजच्या संघातील महत्त्वाचे अष्टपैलू खेळाडू आहेत. किरॉन पोलार्डची उणीव संघाला भासू नये, यासाठी हे दोघेही प्रयत्नशील असतात. ब्राव्होच्या अष्टपैलुत्वाचा आविष्कार आपण बऱ्याचदा पाहिला आहे. आयपीएलमध्येही त्याने आपल्या अष्टपैलुत्वाची चमक दाखवून दिली आहे. ब्राव्होचे क्षेत्ररक्षणही दमदार आहे. त्याने टिपलेले काही झेल अजूनही चाहत्यांच्या लक्षात आहेत. अखेरच्या षटकांमध्ये चोख गोलंदाजी करणाऱ्यांपैकी ब्राव्हो हा एक खेळाडू आहे. सुरुवातीला चेन्नई सुपर किंग्जकडून खेळताना कर्णधार महेंद्रसिंग धोनी त्याला १३ किंवा १४व्या षटकाला गोलंदाजीला आणायचा आणि अखेपर्यंत गोलंदाजी करून घ्यायचा, तोच कित्ता सध्या सॅमीही गिरवताना दिसत आहे. मोठे फटके खेळण्यातही ब्राव्हो तरबेज आहे. त्यामुळे ब्राव्होसारख्या अष्टपैलूला तोडच नसल्याचे सध्या दिसत आहे.
रसेलला आतापर्यंत सातत्याने चांगली गोलंदाजी करताना पाहिले असले तरी त्याच्या फलंदाजीमध्ये सातत्य पाहायला मिळत नाही. त्याच्याकडे सीमारेषेबाहेर चेंडू भिरकावण्याची कुवत नक्कीच आहे आणि त्याने ते भारताविरुद्धच्या उपांत्य फेरीतील सामन्यात दाखवून दिले. जलदगतीने धावा जमवण्याचे त्याचे कसब अप्रतिम आहे. कालरेस ब्रेथवेटच्या रूपात एक चांगला अष्टपैलू वेस्ट इंडिजला मिळाला आहे. ब्रेथवेटला गोलंदाजीमध्ये फारशी चमक दाखवता आली नसली तरी त्याने फलंदाजीमध्ये मात्र छाप नक्कीच पाडली आहे. आंद्रे फ्लेचरच्या जागी संघात स्थान मिळवून संघाला उपांत्य फेरी एकहाती जिंकवून देणारा लेंडल सिमन्सही अष्टपैलू खेळाडू आहे. त्याची फलंदाजी तर साऱ्यांनीच पाहिली आहे. समयसुचकता हे त्याच्या फलंदाजीचे वैशिष्टय़ समजले जाते. पण संघाला गरज पडल्यास तो मध्यमगती गोलंदाजीही करू शकतो. ट्वेन्टी-२० हा क्रिकेटचा सर्वात जास्त अनिश्चित प्रकार. कारण कोणतीही एखादी चूक तुम्हाला कधीही महागात पडू शकते. त्यामुळे ट्वेन्टी-२० क्रिकेट खेळताना कर्णधाराकडे बरेच पर्याय उपलब्ध असायला हवेत आणि वेस्ट इंडिजकडे हे पर्याय सर्वाधिक आहेथ. सध्याच्या घडीला क्रिकेट जगतातील संघांवर नजर फिरवल्यास सर्वात जास्त अष्टपैलू हे वेस्ट इंडिजकडे आहेत आणि हीच गोष्ट त्यांना विश्वचषकाच्या अंतिम फेरीपर्यंत घेऊन आली आहे. आता कोणता अष्टपैलू खेळाडू संघाच्या पदरात विश्वविजयाचे दान टाकणार, हे पाहणे उत्सुकतेचे असेल.

– प्रसाद लाड