तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी म्हणून ओळख असलेल्या ‘अॅपल’च्या ‘आयफोन’ने संपूर्ण जगाला भुरळ घातली आहे. अद्ययावत प्रणाली, आकर्षक डिझाईन आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाने समृद्ध असलेल्या आयफोनचं तंत्रप्रेमींमध्ये वेगळंच अप्रूप असतं. सध्याच्या धावत्या जगाच्या बरोबरीनं आपल्यालाही त्याचप्रमाणे समांतर अद्ययावत राहता यावं यासाठी आपल्याकडेही आयफोन असावा, असं प्रत्येकाला वाटत असतं. मग तुम्हीही सध्या आयफोन घेण्याचा विचार करीत असाल तर जरा थांबा कारण, लवकरच अॅपलचा अद्ययावत आणि बहुचर्चित ‘आयफोन ६ एस प्लस’ दाखल होण्याची शक्यता आहे. येत्या ९ सप्टेंबरला अॅपल कंपनीने एका कार्यक्रमाचे आयोजन केले असून यात ‘आयफोन ६ एस’सोबतच अॅपलचा नवा टेलिव्हिजन सेट-टॉप बॉक्स, आयपॅड तसेच अॅपलची ‘आयओएस ९’ या अद्ययावत प्रणालीची घोषणा होणार असल्याचे सांगितले जात आहे. सॅन फ्रान्सिस्कोमधील बिल ग्राहम सिव्हिक सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे. भारतीय वेळेनुसार हा कार्यक्रम रात्री साडेदहा वाजता सुरु होईल. विशेष म्हणजे, माध्यमांना अॅपल कंपनीतर्फे पाठविण्यात आलेल्या या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत अॅपलच्या नव्या आकर्षक बोधचिन्हासह “Hey Siri, give us a hint”  हे घोषवाक्य देखील छापण्यात आले आहे. ‘सिरी’ अॅपलचा लोकप्रिय डिजिटल व्हॉइस असिस्टन्ट आयओएस प्रणालीवर काम करतो. या कार्यक्रमात आणखी काही महत्त्वपूर्ण घोषणा होणार का? याकडे संपूर्ण जगातील तंत्रप्रेमींचे लक्ष लागून राहिले आहे. अर्थात त्यासाठी ९ सप्टेंबर पर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

apple