अन्य एक चायनीज कंपनी भारतातील स्मार्टफोनच्या बाजारात उतरण्यास सज्ज झाली आहे. ‘कूलपॅड ग्रुप लिमिटेड’ आपला डॅझेन हा सर्वसामान्यांना परवडणारा ब्रॅण्ड भारतीय स्मार्टफोन बाजारात उतरविणार आहे. कंपनीचा भारतातील कारभार पाहाण्यासाठी वरुण शर्मा यांची ‘मुख्य कार्यकारी अधिकारी’ म्हणून नियुक्ती करण्यात अल्याची घोषणादेखील कंपनीकडून करण्यात आली आहे.
स्मार्टफोनच्या ऑनलाईन विक्रीच्या बाजारपेठेत भारत ही जगभरातील जलदगतीने वाढणारी बाजारपेठ असून, या बाजारपेठेतील आम्हाला प्रमुख कंपनी बनायचे आहे. उत्तम सेवा पुरविणारी कंपनी हा नावलौकीक कायम राखत आमच्या नाविन्यपूर्ण उत्पादनांच्या माध्यमातून भारतीय ग्राहकांना चांगल्या स्मार्टफोनचा अनुभव त्यांना अपेक्षित असलेल्या किंमतीत देण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. पेटंट मिळालेल्या आमच्या नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानामुळे कूलपॅड डॅझेन स्मार्टफोनची ऑनलाईन विक्री करणाऱ्या भारतातील अन्य कंपन्यांमध्ये पहिले स्थान पटकावेल, याची खात्री कूलपॅडचे ग्लोबल चीफ ऑपरेटिंग ऑफिसर ली वॅंग यांनी व्यक्त केली.
शेनझेनस्थित या कंपनीने मोबाईल तंत्रज्ञानातील सहा हजारांपेक्षा जास्त पेटंट मिळवली असून, भारतात लवकरच ‘आर अॅण्ड डी’ केंद्राच्या स्थापनेबरोबर स्मार्टफोनची निर्मिती करण्याच्या विचारात आहे. वस्तुंची ऑनलाईन खरेदी-विक्री करणाऱ्या संकेतस्थळांच्या माध्यमातूनच स्मार्टफोनची विक्री करण्याचा कंपनीचा मानस आहे. कूलपॅड डॅझेनमध्ये येण्या अगोदर शर्मा फ्लिपकार्टमध्ये संचालक म्हणून काम पाहात होते. फ्लिपकार्टच्या ‘स्ट्रॅटजिक ग्लोबल पार्टनरशीप’ची जबाबदारी त्यांच्याकडे होती.
भारतातील स्मार्टफोन ग्राहकांना अनेक पर्याय उपलब्ध असले तरी अनेकवेळा भारतीय ग्राहक कमी पैशात उत्तम फोनच्या शोधात असलेला दिसून येतो. स्मार्टफोनच्या ऑनलाईल विक्री क्षेत्रात भारतात एक नवी लाट आणण्यासाठी आम्ही सज्ज झालो असल्याचे नुकतेच नियुक्त झालेले कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी वरुण शर्मा यांनी सांगितले.