इंटरनेटचा जन्म झाल्यानंतर त्यामध्ये विविध प्रकारचे संशोधन होत गेले. सुरुवातीला केवळ वायरवर अवलंबून असलेले इंटरनेट कालांतराने मोबाइलवर आणि वायफायच्या माध्यमातून वायररहित उपलब्ध होऊ लागले. सध्या वाय-फाय तंत्रज्ञानाचा चांगलाच बोलबाला आहे. यामुळे एकाच इंटरनेट जोडणीतून विविध उपकरणांवर इंटरनेटचा वापर करणे शक्य झाले. आता याच्याही पुढचे पाऊल ठरणारे ‘लायफाय’ तंत्रज्ञान समोर आले आहे.
वायफायपेक्षा शंभरपटीने जास्त वेगवान असलेले ‘लाइट फिडेलिटी’ (लायफाय) तंत्रज्ञान येत्या चार ते पाच वर्षांत आपल्यापर्यंत पोहोचू शकणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रयोगाची व्यावसायिक चाचणी नुकतीच करण्यात आली. ती यशस्वी झाली असून यामुळे भविष्यात इंटरनेटचा अनुभव आणखी चांगला जलद होणे शक्य होणार आहे. या तंत्रज्ञानात प्रकाशाच्या माध्यमातून इंटरनेट पुरविले जाणार आहे. यामुळे हा प्रवास तेजाकडून इंटरनेटकडे जाणारा आहे.

काय आहे लायफाय
हे तंत्रज्ञान म्हणजे वायफायसारखेच द्विदिशा इंटरनेट उपलब्ध करून देणारे आहे. हे तंत्रज्ञान वायफाय आणि रेडिओ लहरी संवादमाध्यमांचे संयुक्तिक रूपही संबोधले गेले आहे. या तंत्रज्ञानात प्रकाशाच्या माध्यमातून इंटरनेट उपलब्ध करून दिले जाणार आहे. एडिनबर्ग विद्यापीठातील प्राध्यापक हेरॅल्ड हॅस यांनी हे तंत्रज्ञान विकसित केले आहे. विद्यापीठातील ‘डिजिटल कम्युनिकेशन’ संस्थेतील ‘डी-लाइट’ या प्रकल्पात त्यांनी हा प्रयोग यशस्वी केला. यामध्ये एलईडी दिव्याच्या माध्यमातून इंटरनेट पुरविले जाणार आहे. यामुळे याला ‘दृश्य प्रकाश दळणवळण’ असे संबोधले गेले आहे. हा दिवा आपण सुरू केला, की त्या क्षणी आपल्याला इंटरनेट उपलब्ध होणार आहे. तसेच हा दिवा बंद केल्यावर त्या क्षणी इंटरनेट बंद होणार आहे. ही सुविधा पुरविण्यासाठी खास लायफाय बल्ब विकसित करण्यात आले आहे. यातून इंटरनेट सुविधा पुरविली जाते. ही सुविधा प्रकाशावर अवलंबून असल्यामुळे ज्या भागात त्या दिव्याचा प्रकाश पडणार नाही त्या भागात इंटरनेट मिळणार नाही. म्हणजे आपण लायफाय बल्ब लावलेल्या खोलीच्या बाहेर पडल्यावर इंटरनेट बंद होणार. म्हणजेच लायफाय भिंतीच्या पलीकडे जाऊ शकणार नाही. यामुळे ते सर्वात सुरक्षित मानले गेले आहे. यामुळे हॅकिंगचा धोकाही कमी होऊ शकणार आहे.
हे तंत्रज्ञान विद्युतचुंबकप्रवण क्षेत्रातही वापरता येणे शक्य होणार आहे. जसे की, आपण विमानात बसल्यावर आपल्याला मोबाइल बंद करण्यास सांगितले जाते, कारण तेथे येणाऱ्या लहरी या विमानाच्या दळवळणच्या लहरींवर आघात करण्याची शक्यता असते. वायफाय आणि लायफाय दोन्ही तंत्रज्ञानांत विद्युत चुंबकीय लहरींचा वापर होतो. मात्र वायफायमध्य या लहरी रेडिओ लहरींच्या माध्यमातून प्रवास करतात, तर लायफायमध्ये या लहरी दृश्य प्रकाशाच्या माध्यमातून प्रवास करत असतात. यामुळे हे तंत्रज्ञान विमानचालकाचे दालन, रुग्णालये, अणुऊर्जा केंद्र अशा ठिकाणी वापरणे शक्य होणार आहे. अमेरिकेत वायफाय सुविधा पुरविण्यासाठी आवश्यक त्या स्पेक्ट्रमच्या तुटवडय़ांची चर्चा आत्तापासूनच होऊ लागली आहे. ही अडचण लायफाय प्रकल्पात येऊ शकणार नाही. कारण दृश्य प्रकाशाचे स्पेक्ट्रम हे रेडिओ लहरींच्या स्पेक्ट्रमच्या तुलनेत १० हजार पट जास्त उपलब्ध आहेत. या लायफायच्या माध्यमातून आपल्याला प्रत्येक सेकंदाला १० गिगाबाइट इतक्या वेगानं इंटरनेट उपलब्ध होऊ शकणार असल्याचे संशोधकांनी २०१३ मध्ये सादर केलेल्या संशोधनात नमूद केले आहे. हा वेग सध्या उपलब्ध असलेल्या कोणत्याही इंटरनेट सेवेपेक्षा खूप जलद असणार आहे. यामुळे लायफाय तंत्रज्ञान हे वायफायपेक्षा जलद आणि स्वस्तही मानले गेले आहे; पण हे तंत्रज्ञान मर्यादित ठिकाणीच उपलब्ध असणे, ते बसविण्यासाठीचा खर्च, तुलनेत कमी विश्वासार्ह या लायफाय तंत्रज्ञानातील त्रुटी म्हणता येऊ शकतील.

असा झाला लायफायचा प्रवास
एडिनबर्ग विद्यापीठातर्फे २०१० ते २०१२ या कालावधीसाठी डिजिटल दळणवळण प्रयोगासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. यातूनच या प्रयोगाची निर्मिती झाली. प्राध्यापक हॅस यांनी २०११ मध्ये प्रथमच या प्रयोगाबाबत टेडच्या जागतिक व्याख्यानमालेत सादरीकरण केले. यानंतर काही कंपन्यांनी हे तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी पुढाकार घेतला. यामध्ये प्युअर लायफाय या कंपनीने प्रथम याचे उत्पादन केले. या प्रकाराला ‘दृश्य प्रकाश दळणवळण’ (व्हीएलसी) असे नाव देण्यात आले. हे तंत्रज्ञान लायफायच्या साहय़ाने सर्वप्रथम २०१० मध्ये सादर करण्यात आले. यानंतर याचा प्रयोग ‘जागतिक मोबाइल परिषदेत’ही करण्यात आले. यानंतर अनेक कंपन्यांनी हे तंत्रज्ञान आत्मसात करून उत्पादने तयार करण्यास सुरुवात केली. ‘वेल्मेन्नी’ या उदयोन्मुख कंपनीने हे तंत्रज्ञान विकसित करून नुकतीच त्याची व्यावसायिक चाचणी यशस्वी करून दाखविली.

कसे काम करते
हे तंत्रज्ञान वापरण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला सिग्नल प्रोसेसिंग तंत्रज्ञान असलेले एलईडी दिवे जेथे इंटरनेट पाहिजे तेथे बसवावे लागतात. याच्या इलेक्ट्रिकल सिग्नल प्रणालीत काहीसे बदल करून त्या माध्यमातून इंटरनेट पुरविले जाते. या प्रक्रियेची सुरुवात इंटरनेट सेवा असलेल्या सव्‍‌र्हरपासून होते. यानंतर आपण बटन सुरू केल्यावर हे इंटरनेट लँप ड्रायव्हरमध्ये जाते. तेथून ते दिव्यापर्यंत येते. या दिव्यालगत एक फोटो डिटेक्टर आणि रिसिव्हर डोंगल असतो, ज्याच्या माध्यमातून उपकरणापर्यंत इंटरनेट आवश्यक असलेल्या उपकरणापर्यंत पोहोचते. या सेवेच्या माध्यमातून सर्वाधिक इंटरनेटचा वेग हा एका एलईडी दिव्यातून सेकंदाला १.६ जीबीपर्यंत नोंदविला गेला आहे; पण या तंत्रज्ञानाच्या सिद्धांतामध्ये मांडण्यात आलेल्या सर्वच गोष्टींची पूर्तता झाल्यास वेग प्रत्येक सेकंदाला २२४ जीबीपर्यंत पोहोचू शकणार आहे. हे तंत्रज्ञान अद्याप बाल्यावस्थेत असून ते सामान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी किमान चार ते पाच वर्षांची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

– नीरज पंडित
niraj.pandit@expressindia.com