तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे आपल्याला संवाद, संभाषणाचे अनेक पर्याय मिळाले आहेत. अलीकडच्या धावपळीच्या आणि व्यस्त दिनक्रमात ई-मेल, व्हॉट्सअॅप, एसएमएस, फेसबुक, ट्विटर अशा अनेक माध्यमांतून आपण एकमेकांशी संवाद साधत असतो. त्यातही कार्यालयीन व्यवहार आणि संदेशाच्या देवाणघेवाणीसाठी ई-मेलचा वापर अधिकाधिक वाढत चालला आहे. याशिवाय व्यक्तिगत पातळीवरही ‘ई-मेल’ अतिशय खात्रीशीर आणि गोपनीय संवाद माध्यम आहे. त्यामुळे ई-मेलची देवाणघेवाण मोठय़ा प्रमाणात होत असते. अर्थात प्रत्येक वेळी आपल्याला येणाऱ्या ई-मेलला उत्तर देणे शक्य होत नाही. फुटकळ ई-मेल असणे, आपल्या लेखी कमी महत्त्व असणे, उत्तर देण्यास वेळ न मिळणे किंवा नेटवर्कची अनुपलब्धता अशी अनेक कारणे यामागे असू शकतात, तर दुसरीकडे आपल्याला येणाऱ्या प्रत्येक ई-मेलला उत्तर देणे वेळखाऊ ठरते. या दोन्ही परिस्थितींमध्ये महत्त्वाच्या मेलची ‘पोच’ देणे राहू नये, यासाठी आता गुगलनेच नवीन सुविधा सुरू केली आहे. त्याचे नाव आहे ‘स्मार्ट रिप्लाय’. या सुविधेअंतर्गत आपल्याला येणाऱ्या ई-मेलला आपल्या वतीने गुगलच ‘पोच’ किंवा ‘प्रत्युत्तर’ पाठवते. गेल्याच आठवडय़ात गुगलने आपल्या ‘जीमेल’साठी अँड्रॉइड आणि ‘आयओएस’ प्लॅटफॉर्मवर आधारित स्मार्टफोनसाठी ही सुविधा सुरू केली.

Untitled-2
या सुविधेअंतर्गत तुम्हाला येणाऱ्या ‘ई-मेल’चे उत्तर कोणत्या प्रकारे देता येईल, याचे पर्याय ‘स्मार्ट रिप्लाय’ दाखवतो. त्यातील एका पर्यायावर क्लिक करताच तुम्हाला मेल पाठवणाऱ्याला पोच मिळते. सहज सोपी आणि वेळ वाचवणारी ही यंत्रणा अतिशय हुशारीने काम करते. ई-मेलमधील मजकुराचा अर्थ काढून यांत्रिक पद्धतीनेच त्याच्या उत्तरांचे पर्याय ही यंत्रणा तयार करते. अशा प्रकारे पर्यायी उत्तरांच्या २० हजार शक्यता या यंत्रणेत आधीच ‘लोड’ करून देण्यात आल्या आहेत. याशिवाय वापरकर्त्यांच्या उत्तर देण्याच्या सवयीचा अभ्यास करून ही यंत्रणा आणखी पर्याय निर्माण करते, असा ‘जीमेल’चा दावा आहे. ‘प्रवासादरम्यान येणाऱ्या ई-मेलला उत्तर देणे गोंधळ उडवणारे असते. अशा वेळी ‘स्मार्ट रिप्लाय’ ही सुविधा उपयुक्त ठरेल, असे जाणकारांचे मत आहे.
गुगलच्या अभियंत्यांनी एखाद्या प्रश्नाला वेगवेगळय़ा भाषेतून मिळणाऱ्या उत्तरांचे ‘मॅपिंग’ करणारी यंत्रणा विकसित केली आहे. ही यंत्रणा ‘स्मार्ट रिप्लाय’च्या एकूण कार्यपद्धतीचा कणा आहे. सुरुवातीला ही सुविधा मर्यादित वाटू शकते. मात्र, जसजसा तिचा वापर वाढत जाईल तसतसे त्यामध्ये अधिकाधिक पर्याय समाविष्ट होतील, असा गुगलचा दावा आहे.

‘स्मार्ट रिप्लाय’ काम कसे करते?
‘स्मार्ट रिप्लाय’ या यंत्रणेत दोन तांत्रिक नेटवर्क कार्यान्वित असतात. यापैकी एक नेटवर्क येणारे ई-मेलचे कूटलेखन (एन्कोड) करते, तर दुसरे नेटवर्क त्या ई-मेलचे पृथक्करण करून त्याची पर्यायी उत्तरे तयार करते.
पहिल्या नेटवर्कमध्ये आलेल्या ई-मेलमधील प्रत्येक शब्द तपासला जातो. त्यानुसार त्या मेलचा हेतू किंवा मूळ आशय स्पष्ट करणारी अंकांची मालिका तयार केली जाते. सारख्याच पद्धतीचा आशय असलेल्या ई-मेलना सारख्याच प्रकारची अंकमालिका तयार केली जाते.
दुसरे नेटवर्क ही अंकमालिका उलगडून त्यानुसार पर्यायी उत्तरे तयार करते. ही उत्तरे अतिशय छोटी आणि स्पष्ट असतात.

खरंच कितपत फायदा?
गुगलची ही सुविधा नावीन्यपूर्ण असली तरी तिच्या उपयुक्ततेबाबत शंका आहेत. मुळात प्रत्येक ई-मेलचे उत्तर देण्याची गरज असतेच असे नाही. शिवाय प्रत्येक ई-मेलचे उत्तर ठरावीकच असेल, असेही नाही. याशिवाय ज्या ई-मेलना आपल्याला विस्तृत उत्तरे पाठवायची असतात तेथे ही सुविधा परिणामकारक सिद्ध होणार नाही.

गोपनीयता मात्र कायम
गुगलच्या ‘स्मार्ट रिप्लाय’ यंत्रणेअंतर्गत वापरकर्त्यांला येणारे प्रत्येक ई-मेल तपासले जाणार असल्याने त्यामुळे वापरकर्त्यांची गोपनीयता नष्ट होण्याची तसेच खासगी माहिती उघड होण्याची भीती व्यक्त होत आहे. मात्र, ही संपूर्ण यंत्रणा तांत्रिक पद्धतीने काम करत असल्याने त्यामध्ये मानवी सहभाग वा हस्तक्षेप नाही. त्यामुळे वापरकर्त्यांची गोपनीयता कायम राहील, असे गुगलचे म्हणणे आहे.