कल्याण डोंबिवली महापालिकेचे मालमत्ता, पाणी देयक वसुलीचे लक्ष्यांक पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने जोरदार मोहीम उघडली असून कर थकविणाऱ्या जमीनमालक, विकासक यांच्या इमारतींवर मालमत्ता जप्तीचे फलक लावण्यात येत आहेत. गेल्या आठवडय़ात पालिका हद्दीतील ९० इमारती जप्त करण्यात आल्या आहेत, तर ८ इमारतींना सील ठोकण्यात आले आहे. या ९० इमारत मालकांनी पालिकेची सुमारे २३ कोटींची कर थकबाकी भरणा केलेली नाही. सर्व थकीत रक्कम भरणा केल्याशिवाय त्यांना कोणतीही सवलत न देण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला आहे. दिलेल्या मुदतीत कर भरणा केला नाही तर मालमत्तांचा लिलाव करून थकबाकी वसूल करण्याच्या हालचाली पुढील टप्प्यात करण्यात येणार आहेत, असे एका वरिष्ठ पालिका अधिकाऱ्याने सांगितले. विकासक, जमीनमालकांनी गेल्या अनेक वर्षांपासून पालिकेची सुमारे १८० कोटीची कराची थकबाकी थकवली आहे. त्यामुळेच पालिकेने करवसुलीसाठी प्रभाग अधिकाऱ्यांवर उपायुक्त दर्जाचे अधिकारी नेमले आहेत. ई प्रभागात कराची देयक तयार न करणाऱ्या लिपिक संवर्गातील कर्मचाऱ्यांना कारवाईच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

प्रभागनिहाय मालमत्ता जप्ती
अ १५
ब १८
क १४
ड ७
फ ९
ग ०
ह २७