गणेशोत्सवानंतर काही दिवसांतच येऊन ठेपणाऱ्या नवरात्रोत्सवाची अनेक मंडळी आतुरतेने वाट बघतात. नऊ दिवस साजरा होणारा महाराष्ट्रातील नवरात्रीचा उत्सव म्हणजे गुजरातचा गरबा आणि पश्चिम बंगालची दुर्गापूजा यांचा संगम असतो. वेगळ्या प्रांतातील ही धार्मिक पूजा असली तरी मिश्र संस्कृती असलेल्या ठाण्यात उत्साहात आणि जल्लोषात नऊ दिवस हा उत्सव साजरा केला जातो. मात्र तरुण वर्ग वाट पाहत असतो तो नवरात्रीचे नऊ दिवस खेळायला मिळणाऱ्या गरबा रासाची.. रंगीलो मारो घागरो किंवा कुकडा तारा ढोल.. या आणि अशा सळसळत्या उत्साहात गाण्यांच्या तालावर नाचत, गरबा, दांडिया खेळत नवरात्रीचे नऊ दिवस उत्साहाला उधाण आलेले असते. नऊ दिवस विविध रंगांची उधळण असते. मग ते रंग घागरा-चोळीचे असोत वा त्यावर घालणाऱ्या दागिन्यांचे. उत्साहाचा एक वेगळा माहोल या दिवसात पाहायला तर मिळतोच शिवाय आगळ्यावेगळ्या फॅशनची नजाकतही यानिमित्ताने अनुभवायला मिळते.

मुलांमध्ये कुर्ता आणि बांधणी दुपट्टय़ाला पसंती
पुरुषांसाठीच्या ‘गरबा केडिया ड्रेस’च्या किंमती ८०० रुपयांपासून ते १५०० रुपयांपर्यंत आहेत. लहान मुलांसाठीदेखील आकर्षक रंगसंगतीतले लहानसे ड्रेस लक्ष वेधून घेत आहेत. सध्या मुलांमध्ये कुर्त्यांना अधिक मागणी असल्यामुळे ‘गरबा स्पेशल’ कुर्त्यांनी दुकानांमध्ये मोक्याची जागा पकडली आहे. हल्ली गरबाप्रेमी कुर्त्यांवर पंचरंगी बांधणीची ओढणी घेणे अधिक पंसत करू लागले आहेत. ३०० रुपयांपासून ते एक हजार रुपयांपर्यंत किंमत असलेल्या या डिझायनर कुर्त्यांना तरुण विशेष पसंती देत आहेत. गरब्याचा पारंपरिक केडिया ड्रेस एखाद्या दिवशीच बरा वाटतो आणि नंतर पडून राहतो. त्यापेक्षा असे कुर्ते घातले तर दांडियाही साजरा होतो आणि ते नंतरही कार्यक्रमांमध्ये वापरता येतात.

तरुणांना गमठी जॅकेटचे वेध
पारंपरिक वेशभूषेसोबत भरतकाम केलेले गमठी जॅकेट्स हल्ली गरबा स्पेशल कपडय़ांच्या यादीत मोडू लागले आहेत. तरुणींसाठी खास कुर्त्यांना जोडलेले किंवा वेगळे असे जॅकेट्स बाजारात उपलब्ध आहेत. शरिरसौष्ठव असलेले तरुण स्लिव्हलेस जॅकेटस् आणि जिन्स असा पेहराव घालणे पसंत करतात. त्याप्रमाणे मुलीही गडद रंगाचा प्लेन टि-शर्ट आणि त्यावर उलट रंगाचा गमठी जॅकेट आणि जिन्स अशा पेहरावाला प्रधान्य देतात. तसेच तरुणांसाठी काठेवाडी, लॉकेट, टोपा आणि डोक्याला गुजराथी स्टाइलचा फेटा अशा पारंपरिक पेहरावाचीही सध्या चलती आहे.
चनिया-चोलीेसोबत पारंपरिक दागिन्यांचा साज
सध्या चादींचा मुलामा दिलेल्या दागिन्यांची फॅशन आहे. भरगच्च घागऱ्यावर चंदेरी दागिन्यातील हार तसेच लाल, पांढऱ्या बांगडय़ा दंडापर्यंत घालण्याची फॅशन आहे. सिल्व्हर धातूचा कंबरपट्टा, राजस्थानी कडे, मोठे कानातले, कपाळावर बिंदी व जाडे पैंजण असा घागरा-चोली व चनिया-चोलीला शोभेल असा सगळा सेट बाजारात मिळतो. घागरा-चोली, जीन्स-चोली किंवा जीन्स-कुर्त्यांवर शोभेल असा सेट. अशा आभूषणाच्या वापराने तुमच्या पारंपरिकतेत आणखी भर पडेल.

भाडय़ाचे पोशाख उपलब्ध
गेल्या काही वर्षांत सणाला व्यावसायिक स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यामुळे बाजारात गरब्याच्या पोशाखापासून ते दागिन्यांपर्यंत सर्व वस्तूंची चलती आहे. पण महागाईमुळे गरबा पोशाखांच्या किमतीतही वाढ झाली आहे. शिवाय वर्षांतून एकदाच तो पेहराव घालायचा असल्याने विकत घेण्यापेक्षा तो भाडय़ाने घेऊ , असा विचार करणारे अनेक जण आहेत. त्यामुळे हे सर्व साहित्य विकत घेण्यापेक्षा ते भाडेतत्त्वावर देण्याचे प्रमाण वाढले आहे.
घागरा-चोली, बॅकलेस चोलीचा साज
तरुणींचा दांडियासाठीचा पेहराव म्हणजे मस्त घेरदार घागरा-चोली आणि त्यावर पल्लेदार चुनरी. या घागरा-चोलीवर बांधणी प्रिंट, अबला वर्कचे, कशिदा कलाकुसरीचे भरगच्च भरतकाम केलेले असते. त्यामुळे घागरा-चोलीचा हा साज तरुणींमध्ये जास्त लोकप्रिय आहे. गरबा खेळताना आता बॅकलेस चोलीची फॅशन जोरात आहे. बॅकलेस चोलीमध्ये घागऱ्याच्या नाडय़ा खूप चांगल्या प्रकारे सजवलेल्या असतात. ज्यांना बॅकलेस चोली घालण्याचे धाडस होत नसेल तर त्यांच्यासाठी स्लिव्ह्जलेस, डीप यू नेक व त्यावर केलेले वर्क अशा चोली पण बाजारात आहेत. घागऱ्यामध्ये बांधणी, राजस्थानी, लेहरीया प्रिंटचा वापर होतो. राजस्थानी प्रिंटचा जास्त वापर असेल तर ते जास्त पारंपरिक वाटते. घागऱ्यांना कवडय़ा, कच्छी वर्क, आरसे, मोती लावून सजवलेले असते. त्यामुळे रात्रीच्या गरब्याच्या मैदानात चमकणारे घागरे व घागरा घातलेल्या तरुणीं उठून दिसतात.

राजस्थानी चपला, मोजडी आणि बरंच काही..
चपलांची निवड करताना जरी बॉर्डर, एम्ब्रॉयडरी, राजस्थानी चपलांची निवड करू शकता. तसेच बॅक ऑफ मोजडीही बाजारात उपलब्ध आहे. ही मोजडी साधरण स्लिपरसारखी असते. केवळ पुढची बाजूही बुटाप्रमाणे असून मागील बाजू मोकळी असते. मुलांसाठी चामडय़ाच्या विविध रंगांमधील मोजडी बाजारात उपलब्ध आहेत.