बदलापूर पश्चिमेकडील बेलवली भागात रेल्वे रुळाखाली बांधलेल्या भुयारी मार्गाला दोन वर्षे पुरी झाली असून या दोन वर्षांत या मार्गात पाणीच तुंबले असून अद्यापही रेल्वेने यावर तोडगा काढलेला नाही. यामुळे शहरात पश्चिमेकडून पूर्वेकडे जाण्यासाठी चार किलोमीटरचा वळसा घालून जावा लागत आहे. मात्र, आता शहरात सिमेंट काँक्रीटीकरणाची कामे सुरू असून पश्चिमेकडून पूर्वेकडे जाण्यासाठीच्या मार्गावर पालिकेचे सिमेंट काँक्रीटीकरणाचे काम चालू असल्याने या रस्त्याची एक मार्गिका बंद करण्यात आली आहे. त्यामुळे पश्चिमेकडून पूर्वेकडे जाण्यासाठी एकमेव मार्ग ठप्प असून त्याला पर्याय असलेला बेलवली भागातील भुयारी मार्ग मात्र बंद आहे.
भुयारी मार्गाच्या पूर्व व पश्चिम भागांपर्यंत भुयारी गटार योजनेचे काम झालेले आहे. हे भुयारी गटार योजनेचे पाइप आता रेल्वे हद्दीतून पूर्वेकडून पश्चिमेकडे जोडायचे आहेत. यासाठी पालिकेने रेल्वेकडे परवानगी मागितली असता, रेल्वेने त्यांच्या हद्दीत काम करण्यासाठी साडे आठ कोटी रुपयांची रक्कम भरण्यास पालिकेला सांगितले आहे. अशी माहिती पालिकेचे मुख्याधिकारी देविदास पवार यांनी दिली. हे भुयारी गटाराचे काम झाल्यास नैसर्गिक नाल्याचे पाणी भुयारी मार्गात शिरण्याचे प्रमाण कमी होणार आहे. जेणेकरून रेल्वेला भुयारी मार्गाच्या दुरुस्तीचे काम सोपे जाऊ शकेल. त्यामुळे यासाठी व भुयारी मार्गाखालील जमीन शासनाची असल्याने पैसे का भरावे याबाबत रेल्वेला पत्र पाठवून विचारल्याचे पवार यांनी नमूद केले आहे. दरम्यान, याबाबत रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी याबद्दल माहिती घेऊन बोलतो असे सांगितले.