शौचालय योजनेतील लाभार्थ्यांची व्यथा; मंजूर शौचालयावरच हातोडा

मीरा-भाईंदर शहर शंभर टक्के हागणदारीमुक्त करण्यासाठी शासनाने वैयक्तिक शौचालयाची योजना आणली आहे. शौचालयांचे दिलेले लक्ष्य पूर्ण करण्यासाठी महापालिकेच्या अधिकाऱ्यांची एकीकडे धावपळ सुरू असताना दुसरीकडे महापालिकेने मंजुरी दिलेल्या लाभार्थ्यांचे बांधून तयार असलेले शौचालय पालिकेने स्वत:च तोडल्याची अजब घटना चेणा येथे घडली आहे.

ज्याच्या घरात शौचालय नाही, त्याला शौचालय बांधण्यासाठी अनुदान देण्याची योजना शासनाने सुरू केली आहे. महापालिकेच्या माध्यमातून ही योजना राबवली जात आहे. ज्यांच्याकडे शौचालय नाही, परंतु आसपास मोकळी जागा आहे, अशा गरजूंकडून महापालिकेने अर्ज मागवले. त्यांच्या कागदपत्रांची व जागेची अधिकाऱ्यांनी पाहणी केल्यानंतर पात्र असलेल्यांना शौचालय बांधण्यासाठी महापालिकेने २२ हजार रुपये अनुदान मंजूर केले. चेणा येथील राकेश वर्मा यांनाही या योजनेतून शौचालय बांधणीसाठी अनुदान मंजूर करण्यात आले. अनुदानाचा पहिला सहा हजारांचा हप्ता मिळाल्यानंतर वर्मा यांनी आपल्या घराच्या परिसरातील मोकळ्या जागेत शौचालयाचे काम सुरू केले व ते बांधून पूर्णही केले. त्यानंतर या जागेवरून वाद उद्भवला. याविरोधात महापालिकेकडे तक्रार करण्यात आली. त्यानंतर एका राजकीय व्यक्तीच्या दबावानंतर पालिकेने हे शौचालय तोडून टाकले.

वास्तविक पाहता शौचालय मंजूर करताना अधिकाऱ्यांनी केलेल्या पाहणीत शौचालयाची जागा पर्याप्त व योग्य असेल तरच शौचालय बांधण्यासाठी अनुदान मंजूर करण्यात येईल़, अशी अट पालिकेकडून घालण्यात आली आहे. वर्मा यांना पालिकेने शौचालय मंजूर केले याचा अर्थ वर्मा यांनी शौचालय बांधण्यासाठी दाखवलेली जागा योग्य आहे याची खातरजमा पालिका अधिकाऱ्यांकडून करण्यात आली होती. असे असताना तक्रार प्राप्त झाल्यानंतर जागेबाबतची शाहनिशा न करताच पालिकेने वर्मा यांनी बांधून पूर्ण केलेले शौचालय तोडून टाकले. त्यामुळे जागेची पाहणी केलेल्या अधिकाऱ्यांच्या कार्यक्षमतेसमोर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

एकीकडे पालिकेने मंजूर केलेली सगळी शौचालये बांधून पूर्ण करण्यात आली असल्याचा अहवाल शासनाकडे पाठवायचा आहे. त्यामुळे ज्यांनी शौचालये अद्याप बांधलेली नाहीत, त्यांच्या मागे लागून ती पूर्ण करवून घेण्यासाठी महापालिकेचे अधिकारी अक्षरश: धावपळ करत आहेत. अशा वेळी वर्मा यांनी बांधलेले शौचालय पालिकेनेच तोडून टाकल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. याप्रकरणी वर्मा यांनी महापालिकेचे उपायुक्त संभाजी पानपट्टे यांची भेट घेऊन त्यांच्या कानावर ही घटना घातली. त्यानंतर पानपट्टे यांनी जागेबाबत तोडगा काढून शौचालयाचे बांधकाम पुन्हा सुरू करण्यास वर्मा यांना सांगितले आहे.