अरुंद रस्त्यांवरील तरुणांच्या शर्यतीमुळे पादचाऱ्यांना त्रास; अपघाताच्या घटनांतही वाढ
आधीच सिग्नल यंत्रणा आणि झेब्रा क्रॉसिंग नसल्याने कल्याण-डोंबिवलीतील रस्त्यांवरून ये-जा करणाऱ्या पादचाऱ्यांची धांदल उडत असतानाच भरधाव दुचाकी चालवणाऱ्या तरुणांच्या टोळक्यांनी नागरिकांना अक्षरश: जेरीस आणले आहे. शहरातील अरुंद रस्त्यांवरूनही सुसाट बाइक पळवत, जोरजोरात हॉर्न वाजवत शर्यती लावणारे हे तरुण स्वत:चा जीव धोक्यात घालत आहेतच; पण त्याचबरोबर अशा बाइकची धडक लागून पादचारी जखमी होण्याच्या घटनाही वाढत चालल्या आहेत. विशेष म्हणजे, बेफामपणे बाइक चालवण्याच्या घटनांत वाढ झाली असली तरी त्या तुलनेत वाहतूक पोलिसांकडून होणारी कारवाई नाममात्र आहे.
ज्येष्ठ कवी दत्तात्रय भा. धामणस्कर यांना सोमवारी सावरकर रस्त्यावर मद्यधुंद दुचाकीस्वारांनी जोरदार धडक दिल्याच्या घटनेनंतर शहरातील रस्त्यांवरून भरधाव बाइक चालवण्याच्या प्रकाराचे गांभिर्य वाढले आहे. गेल्या पाच-सहा महिन्यांत दुचाकीस्वारांनी पादचाऱ्यांना ठोकरल्याच्या १५-२० घटना घडल्या आहेत. यापैकी काही गंभीर प्रकरणांत पोलिसांकडे गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत. मात्र, यापलिकडे अशा बेफाम बाइकस्वारांवर कडक कारवाई होत नाही.
अनेक महाविद्यालयीन विद्यार्थी स्कूटरची दोन आसनी क्षमता असताना, तीनजण बसून हातवारे करीत प्रवास करीत असतात. कोपर उड्डाण पूल, एमआयडीसीतील महाविद्यालयांच्या बाहेर हे चित्र दररोजचे असते. पोलीस या तरुणांच्या कारवायांकडे न बघितल्यासारखे करुन त्यांना सोडून देतात.
एखाद्या पादचाऱ्याने अशा दुचाकी स्वाराविरुध्द
तक्रार केली की, तेवढय़ावेळे पुरते पोलीस त्या
दुचाकी स्वाराला फैलावर घेतात. दंडाची पावती फाडतात आणि सोडून देतात, असा अनेकांचा अनुभव आहे.

कवी धामणस्कर अत्यवस्थ
ज्येष्ठ कवी दत्तात्रय भा. धामणस्कर यांना सावरकर रस्त्यावर सोमवारी दुचाकी स्वारांनी जोरदार धडक दिली आहे. धामणस्कर यांच्या डोक्याला व डोळ्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्यावर डॉ. दिलीप ठाकूर यांच्या लक्ष्मी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अपघातानंतर धामणस्कर यांच्या डोक्यातून खूप रक्तस्त्राव झाला आहे. त्यामुळे त्यांना अशक्तपणा आला आहे. डोक्याला टाके पडले आहेत. ते बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत, अशी माहिती धामणस्कर यांच्या नातेवाईक अनिहा धामणस्कर यांनी दिली.

या रस्त्यांवर उच्छाद
* डोंबिवली पूर्व भागातील सावरकर रस्ता हा मंजुनाथ शाळा ते फडके रस्ता असा सलग एक किलोमीटरचा रस्ता आहे. या रस्त्यात कोठेही वळण नाही. त्यामुळे या रस्त्यावर दुचाकी स्वार बेफाम होऊन दुचाकी चालवित असतात.
* जोशी हायस्कूल ते रामचंद्र पाण्याची टाकी या दरम्यानच्या व्ही. पी. रस्त्यावर तरुणांचा असाच उच्छाद असतो.
* एमआयडीसीतील सर्व आखीव रेखीव रस्त्यांवर संध्याकाळी सहा नंतर वेगाने गाडय़ा पळवण्याचे उद्योग सुरू होतात.
* डोंबिवली पश्चिमेतील रेतीबंदर ते खाडीकिनारा भागातील दुचाकींच्या शर्यती लावल्या जातात.
* पत्रीपूल ते ठाकुर्ली या नवीन रस्त्यावरही आता जोरात वाहन चालवण्याचे प्रकार सुरू आहेत.