मीरा-भाईंदर महापालिकेवर ठपका; उपायुक्तांसह ६ जणांवर गुन्हा

नालेसफाईसाठी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तिवरांची छाटणी करणे मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या अंगाशी आले आहे. तिवरांची छाटणी न करता त्यांची कापणी केल्याचा ठपका ठेवत महसूल विभागाने महापालिकेच्या उपायुक्तांसह सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. महापालिका प्रशासनाने मात्र या आरोपाचा इन्कार केला. तिवरांची झाडे मुळापासून तोडली नसून उच्च न्यायालयाच्या आदेशांचे पालन केले  असतानाही चुकीच्या पद्धतीने गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.

मीरा-भाईंदर शहरातील पाणी खाडीला वाहून नेणाऱ्या १२ मुख्य नाल्यांमध्ये तिवरांची झाडे मोठय़ा प्रमाणात वाढली आहेत. या झाडांमुळे नाल्यात मोठय़ा प्रमाणात गाळ साचून पाण्याच्या प्रवाहात अडथळा निर्माण होत आहे. ही तिवरांची झाडे कापण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती महानगरपालिकेने उच्च न्यायालयाला केली होती. त्यावर न्यायालयाने तिवरांची झाडे न कापता त्यांची केवळ छाटणी करण्याची परवानगी महापालिकेला दिली. तिवरांची झाडे कापणे आवश्यकच आहे, अशी ठिकाणे ‘मुंबई पर्यावरण संरक्षण संस्थे’ला दाखवावी आणि मग कारवाई करावी, असे निर्देश न्यायालयाने दिले. त्यानुसार महापालिकेने वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नाल्यांची पाहणी केली, परंतु छाटणी करण्याआधी तिवरांचे सर्वेक्षण करणे आवश्यक असल्याचा अहवाल प्रशासनाने न्यायालयात सादर केला. त्यावर न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली. आदेश दिल्यानंतरही प्रशासन नालेसफाईचे काम सुरू करत नाही याचा अर्थ त्यांना नालेसफाई करण्याची इच्छा नाही, असे ताशेरे न्यायालयाने ओढले. नालेसफाई तातडीने करून त्याचा अहवाल १९ जूनला न्यायालयात सादर करण्याचे आदेश महापालिकेला देण्यात आले. त्यानुसार महापालिकेने तिवरांची छाटणी करण्याचे काम सुरू केले आणि छायाचित्रांसह त्याचा अहवाल १९ जूनला न्यायालयाला सादर केला, परंतु या छाटणीच्या वेळी तिवरांची अनेक झाडे कापण्यात आली असल्याची तक्रार महसूल विभागाकडे करण्यात आली. त्यानुसार महसूल विभागाने पाहणी करून महापालिकेचे उपायुक्त डॉ संभाजी पानपट्टे, सहाय्यक आरोग्य अधिकारी राजकुमार कांबळे, स्वच्छता निरीक्षक अरविंद चाळके आणि कंत्राटदार यांच्यावर पर्यावरण संरक्षण कायद्याखाली गुन्हा दाखल केला.

महापालिकेकडून आरोपाचे खंडन

महापालिका प्रशासनाने मात्र या आरोपांचे खंडन केले आहे. छाटणीदरम्यान तिवराचे एकही झाड मुळापासून कापलेले नाही. काही ठिकाणी कचरा काढण्यासाठी पोकलेन यंत्र जाणे शक्य झाले नाही, अशा ठिकाणी तिवरांची थोडी जास्त छाटणी करण्यात आली आहे. याचा अर्थ तिवरे कापण्यात आली, असा होत नाही. मात्र न्यायालयाच्या आदेशाचे वाचन न करताच चुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली जाईल, असा खुलासा उपायुक्त डॉ संभाजी पानपट्टे यांनी केला आहे.