वीज उपकेंद्रासाठीच्या खोदकामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचा नकार

विद्युत व्यवस्थेवरील ताणामुळे विजपुरवठा वारंवार खंडित होण्याचे प्रकार घडू लागले आहेत. त्यामुळे वीज पुरवठा सुरळीत राहावा यासाठी महावितरणच्या डोंबिवली पश्चिमेकडील गणेश मंदिर परिसरात वीज उपकेंद्राचे काम सुरू आहे. केंद्राचे ६० टक्के काम पूर्ण झाले आहे; मात्र  सार्वजनिक बांधकाम विभागाने येथे रस्ता खोदण्यास परवानगी नाकारल्याने हे काम रखडले आहे. त्यामुळे नागरिकांना आणखी काही महिने तरी वीजपुरवठा खंडित होण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागणार आहे.

डोंबिवली पश्चिमेला केवळ एक उपकेंद्र आहे. त्यामुळे दुसऱ्या उपकेंद्राचे उभारणीचा प्रकल्प हाती घेतला आहे. त्यासाठी गणेश नगर परिसरातील जागा महावितरणने पालिकेकडून खरेदी केली. उपकेंद्राच्या इमारतीचे बांधकाम येत्या काही दिवसांत पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. त्यानंतर मुख्य वीजवाहिनी टाकण्याचे काम महावितरण हाती घेणार आहे. या उच्च दाबाच्या वाहिन्या भूमिगत असल्याने त्यासाठी रस्ता खोदावा लागणार आहे. त्यासंबंधीची परवानगी महावितरणने सार्वजनिक बंधकाम विभागाकडे मागितली आहे; मात्र बांधकाम विभागाने महावितरणला तूर्तास ही परवानगी नाकारली आहे. रस्त्यालगतच्या १५ मीटर परिसरात खोदकाम करून वाहिन्या टाकण्यात आल्याचे आढळल्यास संबंधित खात्याच्या उपअभियंत्याला दोषी धरून कारवाई करण्यात येईल. त्यामुळे बांधकाम विभागाने ही परवानगी नाकारली असल्याचे विभागाने महावितरणला कळविले आहे. त्यामुळे हे काम गेले काही दिवस थंडावले आहे.

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र पाठवून रस्ता खोदण्यास परवानगी मागितली आहे.

महावितरण कंपनी रस्ता खोदून काम झाल्यानंतर रस्ता पूर्ववत करून देण्यास तयार असून तसे संमतीपत्र त्यांच्याकडून घेऊन विशेष बाब म्हणून परवानगी द्यावी, अशी विनंती आम्ही बांधकाम विभागाला केली असल्याचे शिंदे यांनी सांगितले. सार्वजनिक बांधकाम विभागाने दोन किलोमीटर परिसरातील रस्ता खोदकामास बंदी घातली आहे. हा रस्ता बांधकाम विभागाच्या हद्दीत असल्याने परवानगी मिळत नाही तोपर्यंत रस्ता खोदता येणार नाही. त्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रदीप वटमवार यांनी सांगितले.