सध्याचा जमाना इंटरनेट, स्मार्टफोन, टॅबचा. आजकाल प्रत्येक गोष्ट वा माहिती स्मार्टफोन किंवा टॅबवर मिळविण्याचा प्रत्येकाचाच प्रयत्न असतो. अनेक प्रगत देशांत तर विद्यार्थी शाळेतही टॅब नेत असतात. आता प्रगत देशातील हेच चित्र ठाणे महापालिकेच्या शाळांमध्येही दिसणार आहे. ठाणे महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांच्या दफ्तराचे ओझे कमी व्हावे म्हणून या शाळांमध्ये शिकणाऱ्या पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना मोफत टॅब देण्याचा प्रस्ताव सत्ताधारी शिवसेनेने पुढे आणला आहे. या प्रस्तावाचा फायदा सुमारे १३ हजार विद्यार्थ्यांना होणार आहे. आगामी सर्वसाधारण सभेत यासंबंधीचा सविस्तर प्रस्ताव महापालिका प्रशासनाने अंतिम मंजुरीसाठी आणावा, याकरिता शिवसेनेने हालचाली सुरू केल्या असून, यासंबंधी सोमवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत प्रस्तावाची सूचना मांडली आहे.
चाचपणी सुरू
२०१४च्या विधानसभा निवडणुकीत विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे ओझे कमी करण्यासाठी शिवसेनेने टॅबचा प्रचार केला होता. राज्यात पूर्ण सत्ता येऊ शकली नाही. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांसाठी टॅब तयार करण्याचा शिवसेनेचा प्रस्ताव सध्या मागे पडला आहे. असे असले तरी ज्या महापालिकांमध्ये पक्षाची सत्ता आहे तेथे ही योजना राबविता येईल का, याची चाचपणी पक्षाच्या नेत्यांनी सुरू केली आहे. ठाणे महापालिकेत यासंबंधीचा प्रस्ताव पुढे आणण्यात आला असून, सुमारे १३ हजार विद्यार्थ्यांना पहिल्या टप्प्यात मोफत टॅब देण्यात यावा, अशा स्वरूपाच्या प्रस्तावाची सूचना येत्या सर्वसाधारण सभेत सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी मांडली आहे.