ऐतिहासिक वास्तूचे नुकसान; स्थानिक प्रशासन, पुरातत्त्व विभागाचे दुर्लक्ष
चिमाजी आप्पाची शौर्यगाथा सांगणारा ऐतिहासिक वसईचा किल्ला सध्या मद्यपींचा अड्डा बनला आहे. निवांत जागा असल्याने मद्यपींनी किल्ल्यावर अतिक्रमण केले असून सकाळ-संध्याकाळ येथे त्यांचे बिनदिक्कत मद्यप्राशन सुरू असते. त्यामुळे किल्ल्याचेही नुकसान होत असून स्थानिक प्रशासनाचे आणि पुरातत्त्व खात्याचे याकडे दुर्लक्ष झालेले आहे. विशेष म्हणजे काही तरुण दररोज किल्ल्यात क्रिकेट खेळतात, त्यामुळेही या ऐतिहासिक वास्तूचे नुकसान होत आहे.
वसई पश्चिमेकडील वसईचा किल्ला ऐतिहासिक आणि पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. या किल्लय़ाला तब्बल ३०० वर्षांचा इतिहास आहे. मात्र आज हा किल्ला मानवी अतिक्रमणाच्या विळख्यात सापडला आहे. या ठिकाणी असलेल्या फ्रान्सिस्कन चर्चमध्ये मद्यपी कोणाची तमा न बाळगता मद्यप्राशन करतात. या चर्चमध्ये १०० हून अधिक शिलालेख आहेत. त्या ठिकाणी असलेल्या मुख्य कमानीची भिंत शेवटच्या घटका मोजत आहे. त्या ठिकाणी दगड कोसळून जीवितहानी होऊ शकते. त्यामुळे त्याच्या डागडुजीकडे पुरातत्त्व खात्याने लक्ष देणे गरजेचे आहे. या ठिकाणी असलेल्या जेट्टीवर सायंकाळी ७ ते रात्री १० दरम्यान या ठिकाणी तळीराम तळ ठोकून बसलेले असतात. सुरक्षारक्षक नसल्याने या ठिकाणी महापालिकेने नागरिकांसाठी तयार केलेल्या आसनव्यवस्थेवर तळीरामांनी अतिक्रमण केले आहे. किल्ल्यातील वज्रेश्वरी मंदिराच्या मागच्या बाजूला असलेल्या तलावाजवळीही मोठय़ा प्रमाणात मद्यपी बसलेले आढळतात. या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांपुढे या ऐतिहासिक वास्तूची वाईट प्रतिमा तयार होते.
मात्र याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झालेले आहे.

क्रिकेटचे सामने
किल्ल्यातील संत गोन्सालो गार्सिया चर्चमध्ये चक्क क्रिकेटचे सामने भरवले जातात. या वास्तूंचा अभ्यास करण्यासाठी अनेक जण महाराष्ट्रासह विविध भागातून येथे दाखल होतात. या वास्तूचे नुकसान झाल्यास इतिहासाच्या अनेक पाऊलखुणा नष्ट होऊ शकतात. हे प्रकार वेळीच थांबवले पाहिजेत, असे स्थानिकांचे मत आहे. पोलीस, पुरातत्त्व खाते, सीमाशुल्क विभागाने यावर त्वरित कारवाई करणे गरजेचे आहे, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.