लहान आस्थापनांना कारवाईतून वगळण्याचा प्रस्ताव

ठाणे, कळवा आणि मुंब्रा परिसरातील ज्या हॉटेल व्यावसायिकांकडे अग्निशमन विभागाचा परवाना नाही, अशा आस्थापनांवर तातडीने कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिले असले, तरी शहरातील ५०० चौरस फुटांपेक्षा कमी आकाराच्या अस्थापनांना या कारवाईतून वगळण्याचा विचार प्रशासकीय स्तरावर केला जात आहे. आयुक्तांच्या या आदेशामुळे बेकायदा इमारतींमध्ये सुरू असलेल्या शेकडो हॉटेलांवर कारवाई होऊ शकते. त्यामुळे सुरुवातीच्या टप्प्यात लहान हॉटेलांना वगळून बडय़ांवर कारवाईचा बडगा उगारावा, असा प्रस्ताव तयार केला जात आहे. महापालिकेतील वरिष्ठ सूत्रांनी ‘लोकसत्ता ठाणे’शी बोलताना या वृत्तास दुजोरा दिला.

ठाण्यातील ग्लॅडी अल्वारीस मार्गालगत असलेल्या कोठारी कंपाऊंड परिसरात महापालिकेचे सर्व नियम धाब्यावर बसवून राजरोसपणे पब आणि हुक्का पार्लर सुरू असल्याचे प्रकरण मध्यंतरी उघडकीस आले होते. येथे शेकडो युवक, युवतींचा वावर असतो. तरीही अग्निशमन विभागाचे नियमही पब मालक पायदळी तुडवत असल्याचे सर्वपक्षीय नगरसेवकांनी सर्वसाधारण सभेत निदर्शनास आणले होते. महापौर मीनाक्षी शिंदे यांनी या बेकायदा पब तसेच हॉटेलांवर कारवाईचे आदेश आठवडाभरापूर्वी दिले होते. मात्र, हे आदेश पाळले गेले नसल्याने बुधवारची सर्वसाधारण सभा महापौरांनी तहकूब केली. तसेच प्रशासनावर तोंडसुख घेतले. कोठारी कंपाऊंडमधील अनधिकृत हॉटेलांचा मुद्दा तापला असतानाच आयुक्त संजीव जयस्वाल यांनी कोठारी कंपाऊंडसह शहरातील सर्वच हॉटेलांचे अग्निशमन परवाने तपासा आणि ज्यांच्याकडे अशी परवानगी नसेल त्यावर तातडीने कारवाई करा, असे आदेश दिले आहेत.

शहरातील ज्या हॉटेल आस्थापनांकडे परवाने नाहीत अशांना सात दिवसांची नोटीस पाठवून परवानगीबाबत योग्य कागदपत्रे सादर करण्याच्या सूचना देण्यात याव्यात, असे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. दरम्यान, कोठारी कंपाऊंडविषयी आक्रमक झालेले लोकप्रतिनिधी आयुक्तांच्या गुगलीमुळे गोंधळून गेले असून, ही कारवाई टाळावी यासाठी दबाव वाढवू लागल्याचे वृत्त आहे. लोकप्रतिनिधींचा वाढता दबाव तसेच शहरातील काही लहान व्यावसायिकांना बसणारा फटका लक्षात घेता प्रशासनाने या मुद्दय़ावर मध्यम मार्ग शोधण्याची तयारी सुरू केली आहे. त्यानुसार ५०० चौरस फुटांपेक्षा कमी आकाराच्या हॉटेलांना पहिल्या टप्प्यात अग्निशमन परवान्यांचे बंधन लागू करायचे नाही, असा प्रस्ताव तयार केला जात आहे. शहरातील अनेक इमारती जुन्या आणि बेकायदा असून त्या ठिकाणी सुरू असलेल्या लहान हॉटेलांसंबंधी स्वतंत्र धोरण आखता येईल का यावर विचार सुरू आहे, असे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. मात्र, ५०० चौरस फुटांपेक्षा अधिक आकाराच्या बार, पब, लेडीज बार यांच्यावर मात्र येत्या काही दिवसात कठोर कारवाई सुरू केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

९० टक्के उपाहारगृहे अग्निशमन परवान्याविना

ठाणे शहरात बेकायदा इमारतींची संख्या मोठी असून या ठिकाणी तळ तसेच पहिल्या मजल्यावर मोठय़ा संख्येने बार तसेच रेस्टॉरंट आहेत. अग्निशमन विभागाचा कोणताही परवाना न घेता शहरात जवळपास ९० टक्के हॉटेल सुरू असल्याचे मध्यंतरी केलेल्या सर्वेक्षणात स्पष्ट झाले होते. पोटमाळे, बांधकामांमध्ये केलेले बदल, दाटीवाटीने केल्या जाणाऱ्या व्यवसायामुळे या आस्थापनांना अग्निशमन विभागाचे परवाने देणे कायद्याने शक्यही नाही. या सर्व प्रकारांकडे इतके दिवस प्रशासनाकडून दुर्लक्ष होत होते,  मात्र कोठारी कंपाऊंडच्या मुद्दय़ावरून महापौर मीनाक्षी शिंदे यांनी आयुक्तांना धारेवर धरताच या नियमानुसार हॉटेलांवरही कारवाई करायची, असे प्रशासनाने ठरविले आहे.