मतदान टक्केवारीत नेहमीच पिछाडीवर असलेल्या उल्हासनगर शहरात यंदा मतदारांमधील उत्साह वाढावा यासाठी महापालिका प्रशासनाने कंबर कसली आहे. यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. वसाहतींमध्ये मतदान केंद्र सुरू करता येतील का, याचीही चाचपणी केली जात आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी पत्रकारांना दिली.

विधानसभा, लोकसभा आणि महापालिका निवडणुकीत उल्हासनगर शहरात मतदानाची टक्केवारी फारशी वाढत नाही, असा अनुभव आहे. नरेंद्र मोदी यांच्या लाटेतही येथील मतदानाच्या टक्केवारीने फार मोठा टप्पा गाठला नव्हता. पाच वर्षांपूर्वी झालेल्या महापालिका निवडणुकीत उल्हासनगर शहरात जेमतेम ४२ टक्के मतदान झाले होते. त्यापूर्वीही मतदानाचा आकडा फारसा चांगला नव्हता. ही बाब लक्षात घेऊन यंदा मतदानाची टक्केवारी सत्तरीपलीकडे जावी यासाठी प्रयत्न करत आहोत, असे निंबाळकर यांनी सांगितले.

यंदा १ लाख ५० हजार मतदार मतदान यादीतून वगळले असले तरी मतदानाची आकडेवाडी वाढविण्यासाठी मोठय़ा प्रमाणात जनजागृती केली जाणार आहे. त्यासाठी विविध प्रचार साहित्याचा वापर केला जाणार आहे. समाजमाध्यमांचाही वापर करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या वेळी निवडणुकीसाठीच्या आदर्श आचारसंहितेचीही माहिती त्यांनी या वेळी दिली. गेल्या काही दिवसांत वाढलेले समाजमाध्यमाचे महत्त्व आणि त्याचा प्रचारासाठी केला जाणारा वापर यावर पालिका प्रशासन निवडणूक आयोगाच्या वतीने लक्ष ठेवणार असून त्यासाठी अधिक काही करता येईल का, यासंबंधीही प्रRि या सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. उल्हासनगर शहरात काही स्थानिक वृत्तवाहिन्या या राजकीय नेत्यांच्या मालकीच्या आहेत. त्यामुळे निवडणूक काळात त्याद्वारे संबंधित नेत्यांचा व त्यांच्या पक्षाचा प्रचार केला जाईल, ही शक्यता आहे. त्यामुळे अशा नियमबाह्य़ प्रचार करणाऱ्या वृत्तवाहिन्यांवर निवडणूक आयोगाचे लक्ष आहे, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.

मतदारसंख्या घटली

गेल्या निवडणुकीत उल्हासनगर महापालिका हद्दीत चार लाख ७९ हजार मतदार होते. मात्र गेल्या पाच वर्षांत जवळपास ७३ हजार मतदार कमी झाले असून त्यामुळे यंदा आकडेवारी चार लाख सहा हजार ७६७ अशी आहे. तसेच नव्याने २० हजार मतदारांची नोंदणी झाली असून ते यंदा पहिल्यांदा मतदान करणार आहेत. लवकरच हरकती आणि सूचनांनतर अंतिम मतदार यादी जाहीर केली जाणार आहे.

सहा ठिकाणी मतमोजणी

उल्हासनगर महापालिकेच्या निवडणुकीसाठी सहा अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली असून मतमोजणी सहा विविध ठिकाणी होणार असल्याची शक्यता महापालिका आयुक्त निंबाळकर यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे मजमोजणी सुरू असताना होणारा गोंधळ आणि गर्दी टाळता येणे शक्य आहे. अनेकदा एकाच ठिकाणी मतमोजणी होत असल्याने मतमोजणीच्या ठिकाणी वातावरणही तापत असते. त्यामुळे पोलिसांनाही यावर नियंत्रण मिळवण्यात कठीण जात असते. त्यामुळे हा निर्णय घेतला गेल्याची माहिती त्यांनी दिली.