कल्याण-डोंबिवली पालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी, मंगळवारी, सर्व पक्षांमधील एकूण सुमारे ११०० उमेदवारांनी अर्ज भरले. पालिका निवडणुकीसाठी १२२ प्रभाग आहेत. उमेदवारांची पळवापळव, पक्षांतर्गत बंडखोरी टाळण्यासाठी सर्वच पक्षांनी आपली उमेदवारी यादी जाहीर केली नाही.

२७ गावांचा पालिका निवडणुकीवरील बहिष्कार यशस्वी करणार असल्याची भाषा करणाऱ्या संघर्ष समितीचा बार फुसका ठरल्याचे चित्र दिसले. शिवसेना उमेदवारांनी २७ गावांमधील २१ प्रभागांमध्ये उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू करताच, अस्वस्थ झालेल्या संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी धावपळ करून उमेदवारांची शोधाशोध केली. बहिष्काराला मूठमाती देऊन भाजपच्या सहकार्याने उमेदवारी अर्ज दाखल केले. मनसेनेही संघर्ष समितीच्या सल्ल्याने १९ प्रभागांमध्ये उमेदवारी अर्ज दाखल केले. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी शिवसेनेने २७ गावांमधील प्रभागांमधून उमेदवारी अर्ज मागे घेतले नाही तर, संघर्ष समिती, भाजप आणि अपक्ष अशी युती करून शिवसेनेविरुद्ध निवडणूक लढविण्याची व्यूहरचना भाजपकडून आखण्यात आली आहे. २७ गावच्या १९ प्रभागांमध्ये १०७ उमेदवारी अर्ज दाखल झाले. प्र. क्र. ११४ (भोपर संदप), प्र. क्र. ११९ (माणेरे वसार) प्रभागांमधून एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही.

शिवसेनेने पालिकेतील सत्ता काबीज करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. कोणत्याही प्रभागात बंडखोरीमुळे दगाफटका नको म्हणून जुन्या बहुतांशी चेहऱ्यांना उमेदवाऱ्या बहाल केल्या आहेत. पती-पत्नीच्या जोडय़ांना, त्यांच्या मुलांना उमेदवारीमध्ये समावेश आहे. सेना १२२ प्रभागात निवडणूक लढवीत आहे.

भाजप व रिपाइं १२२, मनसे ८५, काँग्रेस ५६, राष्ट्रवादी ४५ प्रभागांमध्ये निवडणूक लढवीत आहेत. मनसेने जुन्याजाणत्या नगरसेवकांचे पत्ते कापून नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे. १२१ प्रभागांमधून मनसेने निवडणूक लढविण्याची तयारी केली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवारांनी आज अर्ज भरले. या पक्षांनी आपल्या प्रस्थापित नगरसेवक, काही ठिकाणी नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. ओवेसी यांच्या ‘एमआयएम’ पक्षाने सात प्रभाग, बसपच्या २८ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. १६ ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज घेण्याची मागे घेण्याची मुदत आहे.