नाटय़ आणि चित्रपट क्षेत्रामध्ये उत्तुंग कामगिरी करण्यासाठी परिश्रम करणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्याबरोबरच त्यांच्या अभिनय गुणांना पैलू पाडणाऱ्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेच्या ठाणे विभागातील प्राथमिक फेरीचा पडदा मंगळवारी उघडणार आहे. ठाण्यातील ज्ञानसाधना विद्यानिकेतन इंग्लिश मीडियम स्कूलच्या सभागृहामध्ये मंगळवारी होणाऱ्या या स्पर्धेत जिल्ह्य़ातील १० महाविद्यालये आपल्या एकांकिका तालीम स्वरूपात सादर करणार आहेत. या स्पर्धेचे टॅलेण्ट पार्टनर असलेल्या ‘आयरिस प्रॉडक्शन’चे प्रतिनिधी या स्पर्धेच्या ठिकाणी उपस्थित राहून स्पर्धकांच्या कलागुणांची दखल घेणार आहेत.

महाविद्यालयातील एकांकिका स्पर्धामधून भविष्यातील लेखक, दिग्दर्शक, अभिनेते आणि तंत्रज्ञ यांची पायाभरणी केली जाते. त्यामुळे मनोरंजनाच्या क्षेत्रात जाण्यासाठीची पूर्वतयारी, म्हणून महाविद्यालयीन तरुण एकांकिका स्पर्धाकडे पाहत असतात. या विद्यार्थ्यांच्या कलेची दखल घेऊन त्यांना योग्य कोंदण देण्यासाठी ‘लोकसत्ता लोकांकिका’ हा उत्तम पर्याय उपलब्ध झाला आहे. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही या स्पर्धेला ठाण्यातून भरभरून प्रतिसाद मिळाला असून यंदा ठाण्यातील १० महाविद्यालये या विभागीय स्पर्धेत सहभागी होणार आहे. त्यातून निवडण्यात येणाऱ्या एकांकिका ठाणे विभागाच्या अंतिम फेरीमध्ये आपल्या एकांकिका सादर करतील.

‘सॉफ्ट कॉर्नर’ प्रस्तुत आणि ‘पृथ्वी एडिफिस’ यांच्या सहकार्याने होणाऱ्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ या स्पर्धेसाठी यंदा रेडिओ पार्टनर म्हणून ‘९३.५’ रेड एफएमचे आणि टेलिव्हिजन पार्टनर म्हणून ‘झी मराठी नक्षत्र’चे सहकार्य लाभणार आहे. ही स्पर्धा ‘अस्तित्व’ या संस्थेच्या मदतीने राज्यातील आठ केंद्रात होत असून ठाण्यातील विभागीय फेरीमध्ये मंगळवारी ठाण्यातील महाविद्यालयांच्या एकांकिकांचे सादरीकरण होणार आहे.

स्पर्धेतील प्रतिभावान कलाकारांची निवड करण्यासाठी ‘आयरिस प्रॉडक्शन’ हे टॅलेण्ट पार्टनर तर ‘स्टडी सर्कल’ हे नॉलेज पार्टनर म्हणून सहभागी होणार आहेत. ‘आयरिस प्रॉडक्शन’च्या वतीने अभिनेते मिलिंद सफाई आणि दिग्दर्शक सचिन गद्रे उपस्थित राहणार आहेत.