‘मार्ग यशाचा’ उपक्रमाला दुसऱ्या दिवशीही भरघोस प्रतिसाद

दहावी, बारावी परीक्षांच्या निकालानंतर करिअरचा कोणता मार्ग निवडावा, याविषयी अनेकांच्या मनात बरेच प्रश्न घोंगावत असतात. आजूबाजूच्या वातावरणामुळे शिक्षणाच्या ठरावीक दिशांकडे आपण ओढले जातोय का, असेही अनेकदा वाटून जाते. आपला खरा कल नेमका आहे तरी कुठे याचे भानही मग या अभासी अशा वातावरण निर्मितीमुळे सुटू लागते. मनातील हा गुंता आणि करिअरविषयक शंकांचे निरसन अगदी सोप्या शब्दात आणि हलक्या-फुलक्या वातावरणात करण्याचा प्रयत्न लोकसत्ता आयोजित ‘मार्ग यशाचा’ या कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशीच्या सत्रात विविध मान्यवरांनी केला. पहिल्या दिवशीपेक्षाही या कार्यक्रमास विद्यार्थी, पालकांची मोठी उपस्थिती लाभली होती.

आवाक्याबाहेरचा अभ्यास करताना तणावरहित व्यक्तिमत्त्व जोपासण्यासाठी मनाची मशागत नेमकी कशी करावी आणि व्हॉट्सअ‍ॅप, सोशल मीडियाच्या महाजालापासून स्वत:ला काहीसे लांब ठेवत अभ्यासाकडे लक्ष कसे केंद्रित करावे यासारख्या प्रश्नांची उत्तरेही या वेळी देण्याचा प्रयत्न मान्यवांनी केला.

‘लोकसत्ता’ मार्ग यशाचा या उपक्रमाच्या दुसऱ्या दिवशी करिअरविषयीच्या नव्या संधी, व्यक्तिमत्त्व विकास या विषयावरील तज्ज्ञांचे मार्गदर्शन पालक आणि विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरले. मानसोपचारतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी आणि डॉ. हरीश शेट्टी यांच्या उत्स्फूर्त मार्गदर्शनामुळे हा कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला. करिअर आणि स्वप्नरंजन यामधील पुसटशी रेषा समजून घेताना पालक आणि विद्यार्थ्यांनीही या संवादाचा पुरेपूर लाभ घेतला. चाकोरीबद्ध अभ्यासक्रमात अडकून न राहता विद्यार्थ्यांना करिअरच्या नव्या माध्यमांची माहिती व्हावी यासाठी ‘लोकसत्ता’तर्फे मार्ग यशाचा हा उपक्रम दोन दिवस ठाण्यात आयोजित करण्यात आला होता. यशाकडे वाटचाल करताना व्यक्तिमत्त्व विकास, ताणतणाव यांचा समतोल कसा साधावा यावर मानसोपचारतज्ज्ञांचे मार्गदर्शन ऐकण्यासाठी विद्यार्थी आणि पालक टिप टॉप प्लाझा सभागृहात मोठय़ा प्रमाणात उपस्थित होते. डॉ. आनंद नाडकर्णी यांनी उदाहरणाच्या माध्यमातून केलेले मार्गदर्शन आणि डॉ. हरीश शेट्टी यांनी प्रश्नोत्तराच्या स्वरूपात विद्यार्थ्यांसोबत साधलेला संवाद खूपच रंजक पातळीवर पोहोचला आणि साध्या सोप्या शब्दात करिअरच्या वाटा निवडण्यासाठी नेमके करायचे तरी काय, या एरवी कठीण वाटणाऱ्या प्रश्नाचा उलगडा चुटकीसारखा होत गेला. दिवसभर तज्ज्ञांच्या मार्गदर्शनातून विविध प्रश्नांची उकल झाल्याने विद्यार्थी पालकांनी समाधान व्यक्त केले.

‘अ‍ॅमिटी युनिव्हर्सिटी’ प्रस्तुत ‘लोकसत्ता’ मार्ग यशाचा हा कार्यक्रम विद्यालंकार क्लासेसच्या सहकार्याने पार पडला. सपोर्टेड बाय ‘युक्ती’, पॉवर्ड बाय ‘गरवारे इन्स्टिटय़ूट ऑफ करिअर एज्युकेशन’, ‘अरेना अ‍ॅनिमेशन’, ‘पारुल युनिव्हर्सिटी’, ‘गणपत युनिव्हर्सिटी’, ‘रोबोमेट’, ‘एलटीए’ आणि ‘सास्मिरा’ आदींच्या विद्यमाने होत असलेल्या ‘लोकसत्ता’ मार्ग यशाचा उपक्रमाचे नॉलेज पार्टनर ‘आयटीएम’ आहेत.