आठ महिन्यांत काम पूर्ण करण्याचा रेल्वे प्रशासनाचा दावा
ठाणे रेल्वे स्थानकातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या दुचाकी पार्किंगसाठी उभारण्यात येणाऱ्या वाहनतळाच्या कामाला अखेर सुरुवात झाली आहे. भूमी पूजनानंतर पाच महिने उलटूनही वाहनतळाचे काम सुरू झाले नव्हते. यासंबंधीचे वृत्त ‘ठाणे लोकसत्ता’ने प्रसिद्ध करताच खासदार राजन विचारे आणि ठाण्याचे आमदार संजय केळकर यांनी रेल्वेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन यासंबंधी नाराजी व्यक्त केली होती. या पाश्र्वभूमीवर शनिवारपासून वाहनतळ उभारणीसाठी आवश्यक कामांना सुरुवात झाली असून येत्या आठ ते दहा महिन्यांत हे काम पूर्ण केले जाईल, असा दावा रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आला आहे.
ठाणे स्थानकात सुमारे अडीच हजारांहून अधिक दुचाकी वाहने दाखल होत असतात. स्थानक परिसरामध्ये पुरेशी पार्किंग व्यवस्था नसल्याने प्रवासी गोखले रोड, बी केबीन परिसरात रस्त्यावर वाहने उभी करतात. यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होतोच, शिवाय पादचाऱ्यांनाही त्रास सहन करावा लागतो. हे लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने ठाणे रेल्वे स्थानक परिसरात सुमारे अडीच हजार वाहन क्षमतेचे वाहनतळ उभारण्याचा निर्णय घेतला आहे. पाच महिन्यांपूर्वी केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते या भागात वाहनतळाचे भूमीपूजन करण्यात आले होते. १५०० चौरस मीटरच्या जागेमध्ये २५०० हजार दुचाकी पार्किंग क्षमता असलेले दुचाकी वाहनतळ रेल्वेकडून बांधण्यास येणार होते. मात्र पाच महिन्यांनंतरही अनेक तांत्रिक अडचणींमुळे हे वाहनतळ रखडून पडले होते. ‘लोकसत्ता ठाणे’मध्ये या प्रकरणी वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर या प्रकरणी लोकप्रतिनिधींनी रेल्वे प्रशासनाकडे जाब विचारण्यास सुरुवात केली होती. खासदार राजन विचारे यांनी महाव्यवस्थापकांकडे जाब विचारला. तर आमदार संजय केळकर यांनी मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक अमित ओझा यांची भेट घेऊन हा प्रकल्प मार्गी लावण्याची विनंती केली होती. अखेर या वाहनतळाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली असून जागा सपाट करण्यासाठी ठेकेदाराने सुरुवात केली आहे. तर हे काम पुढील आठ महिन्यांमध्ये पूर्ण होऊ शकणार आहे, अशी माहिती विभागीय व्यवस्थापक अमित ओझा यांनी दिली.