उन्हाच्या झळा जाणवू लागल्या की ओढ लागते ती गारेगार पेयांची. बाजारात एरवी विविध शीतपेये, सरबते असतातच.. पण खरी मौज असते ती फळांच्या रसात. एकवेळ कुणास फळांच्या फोडी आवडणार नाहीत.. पण ताज्या फळांचा रस मिळत असेल, तर त्याला कोण नाही म्हणेल? खवय्यांच्या याच पसंतीची दखल घेत डोंबिवलीतील ‘मनपसंत’ने विविध फळांच्या रसाचे पर्याय उपलब्ध करुन दिले आहेत..

चैत्र अद्याप दूर असला तरी वैशाख वणवा जाणवू लागला आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच ऊन ‘मी’ म्हणू लागले आहे. त्यामुळे या वाढत्या उष्णतेवर गारव्याचा उतारा शोधला जाऊ लागला आहे. एरवी गरमागरम पदार्थाचा सोस असणारे थंड पर्यायांचा शोध घेऊ लागले आहेत. त्या गारेगार पदार्थामध्ये आइसक्रीम, सरबतांबरोबरच निरनिराळ्या फळांच्या रसांचा समावेश असतो. त्यामुळे फळांनी सजविलेल्या स्टॉल्सभोवती खवैयांची गर्दी दिसून येते. काहींना फळे आवडत नसली तरी फळांचा रस आवडतो. डोंबिवलीतील पी.अ‍ॅण्ड टी. कॉलनीमधील मनपसंद ज्यूस सेंटर खवैयांच्या आवडीचे आहे.

कलिंगड, संत्रे, मोसंबी ही फळे तहान भागविणारी फळे म्हणून ओळखली जातात. त्यामुळे उन्हाळ्यात या फळांच्या रसाला विशेष मागणी असते. इथे मिळणाऱ्या मिल्कशेकमध्ये दूध आणि ताज्या फळांचा रस एकत्र केला जातो. इथे मिळणारी सर्व फळे ही वाशी बाजारातून आणली जात असल्याचे दुकान चालक इमरान यांनी सांगितले. त्यामुळे अर्थातच ही फळे ताजी आणि चांगल्या दर्जाची असतात. आजकाल फलाहारावर अधिक भर दिला जात आहे. हल्ली अनेक तरुण डाएट करतात. अशा वेळी दिवसातील बराच काळ ही मंडळी फक्त फलाहारावरच असतात. त्यामुळे साहजिकच ‘मनपसंद’भोवती या तरुणाईचा घोळका दिसतो. एरवी सर्वसाधारणपणे संध्याकाळी फलाहार घेतला जातो. मात्र सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने सकाळीसुद्धा इथे खवैये असतात. याच परिसरात जवळच अभिनव महाविद्यालय तसेच अनेक खाजगी शिकवणी वर्ग आहेत. त्यामुळे तेथील विद्यार्थीही जाता-येता इथे रेंगाळून फळांचा रस घेतात. नियमित येणाऱ्या विद्यार्थ्यांकडे एखाद्या दिवशी पैसे नसले तरीही त्यांना उधारीने फळांचा रस दिला जातो.

फळांच्या रसात वापरले जाणारे पाणी शुद्ध असते. फळांचा रस पोषक असल्याने आरोग्य राखण्यासाठी तो लाभदायक ठरतो. विशेषत:  किवी फळाचा रस हा शरीरातील पांढऱ्या पेशी वाढविण्यासाठी उपयुक्त ठरतो. फळांच्या या रसासाठी महिन्याला पाच ते सात किलो पिठीसाखर लागत असल्याचेही त्यांनी सांगितले. डाळिंबाचा रस देताना त्यातील बिया रसामध्ये येऊ नयेत यासाठी डाळिंबाचे दाणे वस्त्रगाळ काढून दिले जातात. इथे मिळणारे रोजचे मिल्कशेक पिताना अस्सल गुलाबाच्या पाकळीची चव लागली नाही तरच नवल. इथे मिळणाऱ्या बटर स्कॉच मिल्कशेकमध्ये सुकामेवा टाकला जातो. त्यामुळे जाडसर लागणारे हे मिल्कशेक पौष्टिकही आहे. इथे डिसेंबर ते एप्रिल स्ट्रॉबेरी, एप्रिल ते मे आंबा, मे ते डिसेंबर सीताफळाला मागणी अधिक असल्याचेही ते सांगतात. इथे मिळणारा नारळरस आणि नारळ मिल्कशेक अधिक प्रसिद्ध आहे. नारळरस करताना खोबरे आणि पिठीसाखरेचा वापर न करता नारळाचे पाणी वापरले जाते. मिल्कशेक करताना दूध, नारळ आणि नारळाच्या पाण्याचा वापर केला जातो. अस्सल खोबऱ्याची चव आणि पाण्यातील गोडसरपणा असा हा नारळरस पिताना कोकणाची आठवण झाली नाही तरच नवल. इथे मिळणाऱ्या मिक्स फ्रुट ज्यूसमध्येही फळांचे एकसारखे गर टाकले जातात. त्यामुळे अफलातून चव लागते. इथे मिळणाऱ्या मिल्कशेकमध्ये काजू-बदामची भुकटी टाकल्याने जाडसरपणा तर येतोच, शिवाय हे मिल्कशेक अधिक चविष्ट लागते. जे सुकामेवा खात नाहीत, त्यांच्यासाठी हे मिल्कशेक अतिशय उपयुक्त आहे. गेल्या एक वर्षांपासून इथे ताज्या फळांचा रस मिळतो. विशेष म्हणजे हे दुकान दिवसभर तसेच रात्री उशिरापर्यंत सुरू असते. त्यामुळे सध्या बाहेर उकाडा वाढल्याने रात्री जेवण झाल्यानंतरही अनेकजण ताज्या फळांचा रस पिण्यासाठी येथे येतात. इथे फक्त फळेही कापून मिळतात. त्यामुळे हमखास तहान भागविली जाते.

मनपसंद

  • कुठे- मनपसंद, गांधीनगर, डोंबिवली (पू.)
  • वेळ- सकाळी १०.३० ते रात्री ११