समाजाच्या सर्व क्षेत्रांना बाजारीकरणाचे रूप आले आहे. अशा परिस्थितीत मराठी भाषा समृद्ध व्हावी यासाठी प्राध्यापक, विचारवंत, शिक्षण संस्थांकडून ठोस प्रयत्न होतील, अशी सुतराम शक्यता नाही. अशा परिस्थितीत अडगळीत चाललेल्या मराठी भाषेला समृद्ध करण्याचे खरे काम ग्रंथालयांकडून होणे अपेक्षित आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांनी रविवारी येथे केले.
कल्याणमधील सार्वजनिक वाचनालयाच्या नूतनीकरणाचा लोकार्पण सोहळा वाचनालयाच्या सभागृहात आयोजित केला होता. या वेळी आमदार जगन्नाथ शिंदे, शिल्पकार भाऊ साठे, समाजसेवक काका हरदास, वाचनालयाचे अध्यक्ष राजीव जोशी, सरचिटणीस भिकू बारसकर, मिलिंद कुळकर्णी उपस्थित होते. या कार्यक्रमात बदलापूरच्या ‘ग्रंथसखा’चे श्याम जोशी, पै फ्रेन्ड्स लायब्ररीचे पुंडलिक पै यांचा सत्कार करण्यात आला. अवतीभोवती काय सुरू आहे याचे, तसेच एखाद्या परिस्थितीचे, विषयाचे भान येण्यासाठी आपली मातृभाषा आपल्याला सहकार्य करत असते. मातृभाषेतून विषय समजणे सोपे असते. अलीकडे इंग्रजी शाळांमधून आपल्या मुलांना शिक्षण मिळावे यासाठी पालकांचा ओढा वाढला आहे. विज्ञान, गणितांमधील सूत्रे समजण्यासाठी मराठी भाषा उत्तम आहे. हे कोणी समजून घेत नाही. येत्या काळात विद्यार्थी खूप गुणवान, खूप गुण मिळवणारे असतील. परंतु, मातृभाषेच्या अज्ञानामुळे हा वर्ग अनेक बाबतीत अडाणी असेल. यामधून जे सामाजिक प्रश्न निर्माण होतील त्याला संपूर्ण समाज जबाबदार असेल, असे पठारे यांनी सांगितले.मराठी भाषेची ही त्रेधातिरपिट थांबवावी म्हणून कोणी प्राध्यापक, शिक्षक, संस्था प्रयत्न करण्याची शक्यता नाही. हे महत्त्वाचे काम सार्वजनिक वाचनालयासारखी ज्ञानगंगेने वाहत असलेली समृद्ध ग्रंथालये करणार आहेत. शेवटी ज्ञानगंगेचा मार्ग वाचनालयांमधून जातो. हे ओळखणे महत्त्वाचे आहे, असे रंगनाथ पठारे यांनी सांगितले. या वेळी राजीव जोशी यांनी नियोजन व नियंत्रणाच्या अभावामुळे वाचनालयातून सुमारे १५ हजार पुस्तके गायब असल्याची धक्कादायक माहिती दिली. वाचनालयाचे अ‍ॅप उपलब्ध होणार आहे. यामुळे घरबसल्या वाचनालयातील उपलब्ध पुस्तके, त्यांची उपलब्धता याविषयीची माहिती वाचकांना मिळणार आहे, असे सांगितले.