दूध कंपन्यांच्या विरोधात विक्रेत्यांनी सुरू केलेला संप कल्याण शहरात गुरुवारी मोडीत निघाला, मात्र ठाण्यात विक्रेत्यांनी विक्रीवरील बहिष्काराचे शस्त्र खाली ठेवण्यास नकार दिल्याने शहरातील दूधकोंडी अद्याप कायम आहे. दरम्यान, कल्याणमध्ये दूधकोंडीचा फटका ग्राहकांना बसला. अनेक विक्रेत्यांनी प्रती लिटरमागे १० रुपये जादा दराने विक्री केली. कल्याणातील दूध नाका परिसरात विक्रेत्यांनी ग्राहकांची गरज लक्षात घेत दुधाच्या किमतीत एका दिवसात तब्बल दहा रुपयांनी वाढ केली. इतर वेळेस अंदाजे ५८ रुपये लिटरने मिळणारे दूध बुधवारी सायंकाळी ६७ रुपये लिटरने विकले जात होते.
कल्याणमध्ये ‘गोकुळ’ आणि ‘अमूल’ या आघाडीच्या कंपन्यांच्या दुधाची विक्री सुरू झाली होती. तरीही दूधनाक्यावरील विक्री गेले दोन दिवस वाढल्याचे चित्र दिसले. मोठय़ा कंपन्यांची दूध विक्री बंद झाल्याने ठाणेकरांना गुरुवारी दुय्यम कंपन्यांच्या दुधावर समाधान मानावे लागले.
कल्याण पश्चिमेतील विक्रेत्यांनी बुधवारी कोणत्याच कंपनीच्या दुधाची विक्री केली नाही. दूध विक्रेत्या मध्यवर्ती संघटनेच्या सूचनेनुसार पुढील निर्णय होत नाही तोवर ३० मेपर्यंत बहिष्कार मागे घेण्याचा निर्णय बुधवारी रात्री उशिरा झालेल्या बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे गुरुवारी सकाळपासून दूध विक्रेत्यांचा संप मोडीत निघाल्याचे चित्र दिसून आले.      यानंतर पुन्हा संपाबाबत काय तो निर्णय घेण्यात येईल, असेही सांगण्यात आले.
कल्याणात दूध विक्रेत्यांमध्ये फूट पडल्याचे चित्र होते. यासंदर्भात विक्रेत्या संघाचा कोणताही पदाधिकारी बोलण्यास तयार नव्हता. संघटनेचे पदाधिकारी दिनेश पाटील यांनी संपातून माघार घेतल्याचे कारण माहीत नाही. वरिष्ठांनी घेतलेल्या निर्णयाचे पालन करावे लागेल, असे ‘ठाणे लोकसत्ता’ला सांगितले. मध्यवर्ती संघटनेच्या सुचनेनुसार ३० मे पर्यंत आंदोलन स्थगित करण्यात येईल. त्यामुळे गुरुवारी सर्वत्र दूध उपलब्ध झाले. ठाण्यात कंपन्यांचे प्रतिनिधी चर्चेसाठी पुढे येणार असल्याचे सूतोवाच दूध विक्रेता संघटनेचे सचिव पांडुरंग चोडणकर केले.