५ जूनपर्यंत काम पूर्ण करण्याचा महापालिकेचा दावा; साडेपाच कोटी रुपयांची तरतूद

वसई-विरार महापालिका क्षेत्रात नालेसफाईच्या कामाला सुरुवात झाली आहे. पालिकेच्या नऊ प्रभाग समितीच्या हद्दीत एकाच वेळी नालेसफाईच्या कामास सुरुवात करण्यात आली असून ५ जूनपर्यंत हे काम पूर्ण करण्यात येणार असल्याचे पालिकेतर्फे सांगण्यात आले.

वसई-विरार महापालिका क्षेत्रातील पावसाळ्यापूर्वी नालेसफाई करण्याच्या कामासाठी २०१७-१८ या वित्तीय वर्षांकरिता ५५० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या प्रस्तावाची मंजुरी सभेत घेण्यात आली. नालेसफाईच्या ठेकेदारास पावसाळ्यापूर्वी नाल्याचे खोदकाम करणे, गाळ काढणे, साफसफाई करणे आणि गाळ वाहून नेणे या कामांसाठी करारबद्ध केले जाते. मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत नालेसफाईचे काम करण्यासाठी आलेल्या निविदांना मंजुरी देण्यात आली. त्यानंतर लगेचच ठेकेदारांना कामाचे आदेश देण्यात आले. पालिकेच्या नऊ  प्रभाग समितीच्या हद्दीत एकाच वेळी नालेसफाईच्या कामास सुरुवात करण्यात आली आहे. पालिका क्षेत्रात एकूण १५० नाले असून त्यांची लांबी १८० किमी आहे. एकूण ३० ते ४० जेसीबी व पोकलेन ही यंत्रे या कामासाठी लावण्यात आली असल्याचे पालिकेचे कार्यकारी अभियंता राजेंद्र लाड यांनी सांगितले.

नागरिकांकडून नाल्यात मोठय़ा प्रमाणात कचरा टाकण्यात येतो. त्यामुळे नाल्यात बांधकामाचे साहित्य, प्लास्टिक कचरा हा मोठय़ा प्रमाणावर आढळून आला आहे. अनेकदा ठेकेदार गाळ सुकवण्याच्या नावाखाली तो काठावरच ठेवतो. पावसाने मात्र तो गाळ पुन्हा नाल्यात वाहून जातो.

स्थानिकांनी आणि विरोधी पक्षांनी याबाबत पालिकेकडे अनेकदा तक्रारीही केल्या आहेत. मात्र यंदा हा गाळ वाहून नेला जाईल किंवा सखल भागात टाकला जाईल, असे लाड यांनी सांगितले.