ठाणे शहरात कचरा डेपोची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असतानाच, ठाणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी व्यापाऱ्याच्या दुकानासमोर कचरा टाकल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. पालिका कर्मचाऱ्यांच्या या कृतीमुळे संतापलेल्या व्यापाऱ्यांनीही दुकानासमोरील कचरा उचलून नौपाडा येथील प्रभाग समितीच्या कार्यालयासमोर फेकून आंदोलन केले. कचरावाद पेटल्यानंतर ठाण्याच्या महापौर मीनाक्षी शिंदे आणि सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर नौपाडा पोलीस ठाण्यात पालिकेविरोधात तक्रार दाखल केली आहे.

ठाण्यातील नौपाडा परिसरातील दुकानांसमोर आज सकाळी पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी कचरा टाकला होता. नौपाडा, रेल्वे स्थानक रस्ता आणि टेंभी नाका परिसरातील दुकानांसमोर हा कचरा टाकण्यात आला होता. या प्रकारानंतर व्यापाऱ्यांनी पालिकेविरोधात रोष व्यक्त केला. पालिकेच्या घनकचरा विभागाच्या वतीने करापोटी पाठवण्यात आलेली देयके व्यापाऱ्यांनी भरली नाहीत. त्यामुळे पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी कचरा उचलला नव्हता. हा साचलेला कचरा पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी आज सकाळी दुकानांसमोर टाकला. त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये संतापाची भावना आहे. संबंधित व्यापारी आणि भाजपचे स्थानिक नगरसेवक संजय वाघुले यांनी हा कचरा उचलून नौपाडा प्रभाग समितीच्या कार्यालयासमोर टाकून पालिका कर्मचाऱ्यांच्या कृतीचा निषेध केला.

पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी कचरा टाकल्यामुळे आम्ही पालिकेचा निषेध केला आहे. पालिकेच्या सर्वसाधारण सभेत घनकचरा विभागाकडून आकारण्यात येणारा कर रद्द करणार असल्याचे महापौर मीनाक्षी शिंदे यांनी सांगितले आहे. एकीकडे ठाण्यातील कचऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. दुसरीकडे पालिकेने लादलेल्या कराला विरोध करत व्यापाऱ्यांनी आंदोलन केले आहे. त्यामुळे महापालिका आणि व्यापाऱ्यांनी घेतलेली भूमिका यामुळे ठाण्यातील ‘कचरा’वाद पेटण्याची चिन्हे आहेत.