डोंबिवलीत मोक्याच्या ठिकाणी जाहिरात फलक
वर्दळीच्या मार्गावर प्रवाशांची कोंडी
गणेशोत्सव मंडळांनी मोक्याच्या जागा अडवून वाहतूक व्यवस्थेत ‘विघ्न’ आणण्याची तयारी आतापासूनच सुरू केली आहे. रस्ते अडवून मंडप उभारणे, डीजेचा दणदणाट करून वातावरण प्रदूषित करणे आदी प्रकार तर गणेशोत्सव मंडळे करतातच, पण आता जाहिरातींचे फलक लावून प्रवाशांची कोंडी करण्यास या मंडळांनी सुरुवात केली आहे. डोंबिवली पश्चिमेतील अतिशय वर्दळ असलेल्या महात्मा गांधी रस्त्यावर गणेशोत्सव मंडळांनी जाहिरातींचे फलक लावण्यासाठी मोक्याच्या जागा अडविल्या आहेत. त्यासाठी रस्ते खोदून बांबूंच्या परांची उभ्या केल्या आहेत. पण त्यामुळे या मार्गावर वाहतूक कोंडीला सुरुवात झाली असून स्थानिक रहिवासी व प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
रेल्वे स्थानक परिसरातील या मार्गावर नेहमीच वर्दळ असते. मात्र परिसरातील दोन गणेशोत्सव मंडळांनी जाहिरात फलक लावण्यासाठी आतापासूनच जागा अडविण्यास सुरुवात केली आहे. खरे म्हणजे या गणेशोत्सव मंडळांना मंडप व जाहिरात फलक उभारण्यासाठी परवानगी देऊ नये, असे रहिवाशांचे म्हणणे आहे. ‘‘पालिका अधिकाऱ्यांनी महात्मा गांधी रस्त्यांवरील गर्दी, रिक्षा वाहनतळ, दुचाकींचे वाहनतळ याचा विचार करून या भागात यावेळी उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे परवानगी देणे आवश्यक नव्हते,’’ असा सूर या भागातील रहिवाशांकडून लावला जात आहे.
आठ बाय आठ फुटांत मंडप उभारण्यासाठी पालिकेकडून परवानगी घेण्यात येत असली तरी, प्रत्यक्षात पालिकेच्या अटींचे उल्लंघन करून मंडपाची जागा वाढविण्यात येत असल्याच्या तक्रारी रहिवाशांकडून करण्यात येत आहेत. रस्त्यावर मंडप उभारणीस परवानगी नाही, असे आदेश उच्च न्यायालयाने दिल्यानंतर या भागातील गणेशोत्सव अन्यत्र साजरे केले जातील किंवा पालिकेकडून त्यांना परवानगी देण्यात येणार नाही, असे येथील रहिवाशांना वाटत होते. परंतु आता मंडळांनी या भागात मंडप, जाहिरातींचे फलक लावण्यासाठी परांची उभारण्यास सुरुवात केल्याने लोकांमध्ये नाराजीचे सूर उमटू लागले आहेत.
महात्मा गांधी रस्त्यावर मंडप उभारणीसाठी मंडळांनी परवानगी घेतली आहे. त्यानुसार त्यांचे काम सुरू आहे. आपण स्वत: याबाबत खात्री केली आहे. नागरिकांना त्रास होऊ नये अशा पद्धतीने मंडप उभारावा, कायद्याचा कोणताही प्रश्न निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी, असे आपण आपल्या भागातील गणेशोत्सव मंडळांना सांगितले आहे.

– दिलीप भोईर, स्थानिक नगरसेवक

कर्मचारी व्यस्त : गणपतीच्या मंडपांना परवानगी देणाऱ्या पालिका कर्मचाऱ्यांना पालिका निवडणुकीसाठी मतदारांची यादी विभाजनाचे कामही देण्यात आले आहे. त्यामुळे बहुतेक पालिका कर्मचारी दोन्ही कामे सांभाळून ही कामे करीत आहेत. परवानगी देण्यापूर्वी रस्ते, गल्ली याची पाहणी करावी लागते. ही कामे करण्यासाठी पालिकेकडे पुरेसे मनुष्यबळ नाही. त्यामुळे गणेश मंडळांचे म्हणणे ऐकून परवानग्या देत असल्याचे समजते. यामुळे पालिका अधिकारी अडचणीत येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.