ढोल-ताशांच्या मिरवणुकांमुळे वाहनांच्या रांगा
गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीमुळे होणारी गर्दी आणि त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी हा अनुभव नित्याचाच असला तरी, कल्याण-डोंबिवलीतील नागरिकांना गणेशाच्या आगमनापासूनच अशा कोंडीला सामोरे जावे लागत आहे. ढोलताशांच्या गजरात मंडळाचे शक्तिप्रदर्शन केल्याच्या थाटात काढण्यात येणाऱ्या आगमन मिरवणुकांमुळे गेल्या दोन दिवसांपासून कल्याण-डोंबिवलीतील रस्त्यांवर वाहतूक कोंडी होत आहे. गेले दोन दिवस तर शहरातील मुख्य रस्ते तसेच महत्त्वाच्या कोपर उड्डाणपुलावर जवळपास चार ते पाच तास वाहनांच्या रांगा लागल्याचे चित्र होते.
आपल्या गणेशोत्सव मंडळाला प्रसिद्धीच्या झोतात आणण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून कल्याण-डोंबिवलीत गणेशाच्या आगमन मिरवणुकाही धडाक्याने काढण्यात येत आहेत. मात्र, या मिरवणुकांना कोणताही काळ, वेळ नसल्याने ऐन गर्दीच्या वेळेत शहरातील रस्त्यांत वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. डोंबिवली शहरात शनिवारी संध्याकाळी आठ ते नऊ फूट उंचीची गणेशमूर्ती पूर्वेकडून पश्चिमेला नेण्यात येत होती. या ठिकाणी वाहतूक पोलीस तसेच वाहतूक सेवक तैनात असतानाही कोपर उड्डाणपूल ते द्वारका हॉटेल परिसरातील रस्त्यांवर प्रचंड कोंडी झाल्याचे चित्र होते. सायंकाळी सहाला सुरू झालेली ही कोंडी रात्री साडेदहाच्या सुमारास सुटली.
डोंबिवली पश्चिमेत जाणाऱ्या वाहनांना कोपर उड्डाण पूल व ठाकुर्ली रेल्वे फाटक हे दोनच मार्ग आहेत. ठाकुर्ली रेल्वे फाटकात वाहनांची तुडुंब गर्दी झाल्याने अनेक वाहने कोपर पुलाच्या दिशेने आली. कोपर पूल अगोदरच कोंडीने भरला होता.कोपर पुलाच्या दिशेने असलेले केळकर रस्ता, शिवमंदिर, टंडन रस्ता, बोडस सभागृह गल्ली हे सर्व रस्ते वाहनांनी भरून गेले. रविवारी सायंकाळीही असेच दृश्य पाहायला मिळाले.

पोलीसही हतबल
वाहतूक पोलीस, पोलिसांनी गणेश मंडळांना रात्री दहा वाजल्यानंतर रस्ते मोकळे झाल्यावर गणपती मखराच्या दिशेने नेण्यासाठी आवाहन करावे. तसेच, गणेश मंडळांनी समजूतदारपणा दाखवून रात्रीच्या वेळेत गणपती नेला तर वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होणार नाही, अशी मागणी रहिवाशांकडून केली जात आहे. मात्र, रात्री दहानंतर ढोल ताशांचा गजर करण्याची परवानगी नसल्याने ऐन गर्दीच्या वेळेत मुख्य रस्ते अडवून मिरवणुका सुरू असल्याचे चित्र आहे.