ट्रेकिंग, गिर्यारोहण, भटकंती, दुर्गभ्रमंती ही सारीच क्षेत्रे खरेतर आजही चाचपडत प्रवास, भ्रमंती करणारी आहेत. माहितीचा अभाव, साहित्यसुविधांची वानवा, अभ्यासू दृष्टिकोन नसणे अशी अनेक कारणे त्यामागे आहेत. पण आता या विषयातही अनेक अभ्यासक पुढे येऊ लागले आहेत. पुस्तकांपासून-माहितीपर्यंत ज्ञानार्जनाची अनेक साधने तयार होऊ लागली आहेत. यातीलच एक नवे पाऊल म्हणजे यंदाच्या काही दिवाळी अंकांकडे पाहावे लागेल.
डोंगरदऱ्यांमधील वाटांवर तितक्याच कष्टाने, पदरमोड करत काही भटक्यांनी यंदा हे दिवाळी अंक काढले आहेत. कुठलेही व्यावसायिक गणित नसतानाही केवळ या विषयांवरील प्रेमापोटी हे निसर्गप्रेमी दरवर्षी या अशा ‘भटक्या’ साहित्याची निर्मिती करत असतात. किल्ला, दुर्ग, दुर्गाच्या देशातून आणि जिद्द अशा आगळय़ावेगळय़ा अंकांची ही गोष्ट. रामनाथ आंबेरकर, अंकुर काळे, संदीप तापकीर, योगेश काळजे आणि सुनील राज या डोंगरभटक्या मित्रांनी हे अंक तयार केले आहेत. मूळचे हे सर्व जण भटकंतीच्या विश्वात रमणारे, इथल्या विविध विषयांच्या वाटांवर चालणारे. मग त्यांनी याच वाटांवरचे हे विश्व स्वतंत्र अंकाद्वारे भटक्यांसमोर आणले आहे. काय आहे या अंकात. गड-किल्ले, सह्याद्रीची गिरिशिखरे, सुळके, कडे, गुहा, लेणी, कोरीव मंदिरे, निसर्ग-जंगले अशा अनंत विषयांची माहिती. त्यासाठी चालणाऱ्या मोहिमा. इथे योजले जाणारे उपक्रम, या विषयातील नवे संशोधन, काम-संस्था-व्यक्तींचा परिचय आदी विषयांचा या अंकामध्ये प्रामुख्याने समावेश आहे. सह्याद्रीतील कुठल्याशा गिरिदुर्गापासून ते एव्हरेस्ट शिखरापर्यंत असा मोठा परीघ इथे उलगडतो.
रामनाथ आंबेरकर हे दुर्ग अभ्यासक आहेत. गेली अनेक वर्षे ते या विषयाचा ध्यास घेऊनच ‘किल्ला’ नावाचा अंक तयार करतात. ‘किल्ला- इतिहासातला, मनातला आणि वास्तवातला’ अशी संकल्पना असलेला हा त्यांचा अंक वेगवेगळय़ा प्रदेशाची दुर्ग-मुशाफिरी घडवून आणतो. यंदाच्या अंकातील पहिलाच विषय गडांवरील देवतांचे मूर्ती माहात्म्य घेऊन येतो. ज्येष्ठ पुरातत्त्वतज्ज्ञ डॉ. गो. बं. देगलूरकर यांनी लिहिलेल्या लेखातून या देवतांच्या स्थानवैशिष्टय़ापासून ते आकृतिबंधापर्यंत अनेक गोष्टी उलगडत जातात. किल्ले कंधार (डॉ. प्रभाकर देव), जिंजी (महेश तेंडुलकर), मंगळवेढे (गोपाळ देशमुख), किल्ले नगरधन (अमोल सांडे) इथपासून ते टॉवर ऑफ लंडन (अनिल नेने) आदी दुर्गाची मुशाफिरी या अंकातून घडते. दुर्गाच्या या माळेतच मग प्रसिद्ध चित्रकार भास्कर सगर यांनी रंगवलेला रायगड येतो. ज्येष्ठ गिर्यारोहक आनंद पाळंदे यांनी नकाशातून रेखाटलेले किल्ले येतात. तर निसर्ग-पर्यावरण अभ्यासिका सीमंतिनी नूलकर यांनी सांगितलेले निसर्गातील किल्लेही भेटतात. संजय अमृतकर यांनी केवळ छायाचित्र माध्यमातून वेताळगड नावाचा किल्ला उभा केला आहे. बुलंद नळदुर्गच्या नाजूक पाणीमहालाचे सौंदर्य आणि स्थापत्य अभिजित बेल्हेकर घेऊन आले आहेत. ज्येष्ठ अभ्यासक सुहास सोनावणे यांचा अष्टप्रधान मंडळ, ज्येष्ठ साहित्यिक-संशोधक विश्वास पाटील यांचा शिवस्मारक आणि मिलिंद आमडेकर यांचा तोफांवरील लेख कुतूहल चाळवतात. हे सारेच लेख ज्ञानात भर घालतात. महाराष्ट्राचे सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे यांनी या साऱ्या दुर्ग वारशाबद्दल सरकारची भूमिका स्पष्ट करत या विषयाला परिपूर्णता दिली आहे. एखाद्या विशिष्ट विषयाचा खोलवर घेतलेला वेध, अभ्यासू-व्यासंगी साहित्य, लक्षवेधक छायाचित्रांची जोड, आकर्षक मांडणी आणि सर्वात महत्त्वाचे उत्कृष्ट छपाईमुळे ‘किल्ला’ अंक नजरेत भरतो आणि अभ्यासूंसाठी संग्राहय़ ठरतो.
दुर्ग आणि दुर्गाच्या देशातून ही आणखी दोन अशीच भटक्यांची व्यासपीठे. खऱ्याखुऱ्या भटक्यांनी सजवलेले लेख हे या दोन अंकांचे वैशिष्टय़ आहे. अंकुर काळे यांनी तयार केलेल्या ‘दुर्ग’ अंकात दुर्गवेडे गोनीदा (डॉ. विजय देव) या लेखाने या भ्रमंतीची सुरुवात होते. गोनीदांचे दुर्गवेड नव्या पिढीला प्रेरणा देते. यानंतर दुर्गस्थापत्यशास्त्र (डॉ. अमर आडके) हा लेख या विषयातील विज्ञान मांडतो, तर मैत्र दुर्गाचे (अभिजित बेल्हेकर) हा गडकोटांशी असलेल्या मैत्रीचे धागे जुळवतो. याशिवाय मग राजगड, सोनगड, खांदेरी-उंदेरी, सरसगड, सिंहगड, हरिहर, सुवर्णदुर्ग, अजिंक्यतारा, गाळणा, त्रिंगलवाडी, औसा, गोवळकोंडा अशा अन्य दुर्गाच्या पालख्याही इथे आपल्याला भेटण्यासाठी येतात. या प्रत्येक लेखासोबत दुर्गप्रकार, त्याची उंची, कसे जायचे ही उपयुक्त माहितीही इथे मिळते. या अंकातील मजकुराएवढीच त्याची मांडणी आणि छपाईदेखील लक्ष वेधून घेते.
‘दुर्गाच्या देशातून’ या अंकाचे यंदा चौथे वर्ष. संदीप तापकीर आणि योगेश काळजे या भटक्या जोडगोळीने हा अंक तयार केला आहे. यंदाचा अंक त्यांनी ज्येष्ठ दुर्गयात्री आणि साहित्यिक गो. नी. दांडेकर आणि इतिहास संशोधक निनाद बेडेकर यांना अर्पण केला आहे. यामुळे या दोन विभूतींवरचे अनुक्रमे ओंकार नेर्लेकर आणि संतोष जाधव यांचे लेख या अंकाचे वैशिष्टय़ ठरले आहे. याशिवाय अंकात मग गाविलगड ते माऊंट एव्हरेस्ट असा मोठा परीघ उलगडतो. सिंधुदुर्ग (विनायक बेलोसे) आणि विदर्भातील किल्ले (विवेक चांदूरकर) त्यांच्या कथा आणि व्यथेसह भेटतात. गडांच्या या लेखांसोबतच मग त्यांच्या भोवती सुरू असलेले उपक्रमही इथे भेटतात. संभाजीराव भिडे यांची ‘धारातीर्थ वारी’ (प्रा. पराशर माने), शिवप्रताप युद्धनीती (उमेश सणस), रायगड प्रदक्षिणा (समीर कदम), ऐतिहासिक शस्त्रांची माहिती (संतोष चंदने), कॅमेऱ्यातून दुर्गदर्शन ( प्रीतम विटणकर) आदी लेख नवनवी माहिती देतात. प्रवीण भोसले, धनंजय मदन, विशाल पेडणेकर, राम खुर्दळ यांचे लेख दुर्गसंवर्धन चळवळ घेऊन येतात. काही साहसवाटाही या अंकात आपल्याला भेटतात.
गिर्यारोहण-गिरिभ्रमण विषयाला वाहिलेला अंक अशी ‘जिद्द’ची ओळख आता बरीच जुनी आहे. सुनील राज मोठय़ा जिद्दीने गेली अनेक वर्षे हा ‘जिद्द’चा किल्ला लढवत आहेत. यंदाच्या अंकात मोहीम शिखर सावरकर (आनंद शिंदे), पापसुरा शिखर (डॉ. अमित प्रभू) या दोन मोहिमांवर सविस्तर लेख आहेत. याशिवाय वन्यजीव भटकंती (धनंजय मदन), नाथबाबाची गुहा (गजानन परब), बाजीराव पेशवे (अरुण भंडारे), बापूजी मुद्गल देशपांडे (राजाराम देशपांडे), जावळी आणि महाराष्ट्र नामाची प्राचीनता (शिल्पा परब-प्रधान) हे लेख आपल्या भटकंतीच्या आमच्या वाटा समृद्ध करतात.
ट्रेकिंग, गिर्यारोहण, भटकंती, दुर्गभ्रमंती ही सारीच क्षेत्रे खरेतर आजही दुर्लक्षित. या विषयावर लेखन हा आजही हौसेचाच भाग आहे. या पाश्र्वभूमीवर अशा विषयांवर दिवाळी अंकांची निर्मिती हे एक शिवधनुष्यच असते. वेगळा विषय, त्याचे वाचकही निराळे. या परिस्थितीत पदरमोड करत या डोंगरमित्रांनी हे चार अंक काढले आहेत. यंदाच्या दिवाळीत भटक्यांच्या जगात हे अंक कुतूहलाचे विषय ठरले आहेत. अंकासाठी संपर्क- (किल्ला- रामनाथ आंबेरकर (९०२९९२९५००), दुर्ग (९७६७८९५७८२), दुर्गाच्या देशातून- संदीप तापकीर (९८५०१७९४२१), जिद्द- सुनील राज (९८६९३३१६१७).

 प्रतिनिधी

Ananta joshi cap collector
गोष्ट असामान्यांची Video: ३५००पेक्षा जास्त भन्नाट टोप्यांचा खजिना जपणारे अनंत जोशी
Birds mumbai, Birds suffer from heat,
मुंबई : वाढत्या उष्म्याचा पक्ष्यांना त्रास, १६ दिवसांमध्ये १०० हून अधिक पक्षी व प्राणी रुग्णालयात दाखल
What was the cause of the Rwandan genocide 30 years ago
१०० दिवसांत ८ लाखांची कत्तल…३० वर्षांपूर्वीच्या रवांडा नरसंहाराचे कारण काय होते? सद्यःस्थिती काय?
Indiscriminate firing in nagpur by criminal over money of MD
नागपुरात एमडीच्या पैशावरून गुन्हेगाराचा अंधाधुंद गोळीबार, कुख्यात टोळ्या पुन्हा…