एअर इंडियाच्या आरक्षण यंत्रणेतील त्रुटींचा फटका कोलकात्यात प्रवाशांना बसला आहे. आरक्षण यंत्रणेतील बिघाडामुळे प्रत्यक्षात विमानामध्ये उपलब्ध असलेल्या आसनांपेक्षा अधिक तिकिटे कर्मचाऱ्यांकडून आरक्षित करण्यात आली. आरक्षण यंत्रणेतील त्रुटींमुळे एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांचा जीव टांगणीला लागला, तर प्रवाशांवर मनस्ताप सहन करण्याची वेळ आली आहे.

शनिवारी कोलकात्याहून गुवाहाटीला जाणारे विमान पकडण्यासाठी १९४ प्रवासी विमानतळावर पोहोचले. एअर इंडियाचे एआय ७३१ विमान गुवाहाटीला जाण्यासाठी उड्डाण करणार होते. मात्र या विमानात केवळ १४४ आसनेच रिक्त होती. अनेकदा विमान कंपन्यांकडून ओव्हरबुकिंग करण्यात येते. मात्र इतक्या मोठ्या प्रमाणात एअरबुकिंग कोणत्याही विमान कंपनीकडून केले जात नाही. एअर इंडियाच्या या पराक्रमामुळे ५० प्रवाशांना विमानातून प्रवास करता आला नाही. त्यामुळे ५० प्रवाशांना एअर इंडियामुळे मनस्ताप सहन करावा लागला.

एअर इंडियाच्या एका अधिकाऱ्याने नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर या प्रकरणावर भाष्य केले. ‘आम्ही २ ते ३ टक्के ओव्हरबुकिंग करतो. मात्र त्यावेळी ओव्हरबुकिंगचे प्रमाण ३१ टक्क्यांवर जाऊन पोहोचले. त्यामुळे प्रवासी संतप्त होणे स्वाभाविक आहे. याबद्दल आमच्याकडे कोणतेही स्पष्टीकरण नाही. तिकिट आरक्षण यंत्रणेत काहीतरी तांत्रिक बिघाड झाला असण्याची शक्यता आहे. त्यामुळेच १४४ आसने आरक्षित होऊनही तिकिटांचे आरक्षण सुरुच होते आणि विमान पकडण्यासाठी १९४ प्रवासी पोहोचले,’ असे या अधिकाऱ्याने सांगितले.

ओव्हरबुकिंगमुळे उद्भवलेल्या या परिस्थितीचा सामना करण्यासाठी एअर इंडियाकडे दुसऱ्या विमानाचा पर्याय उपलब्ध होता. उड्डाणासाठी सज्ज असलेल्या एअरबस ए ३१९ मध्ये जागा नसल्याने ए ३३० आणि बोईंग ७८७ ड्रिमलायनर विमानांचा वापर करुन एकाचवेळी सर्व प्रवाशांना गुवाहाटीला पाठवणे एअर इंडियाला शक्य होते. मात्र वेळ अतिशय कमी असल्याने एअर इंडियाला तातडीने दुसरे विमान उपलब्ध करुन देता आले नाही. त्यामुळे प्रवाशांचा मोठा खोळंबा झाला.