पत्रकारांचं जग भाऊ जाम धावपळीचं असतं. काळवेळाचं काही भान नाही, खाण्यापिण्याची शुध्द नाही. कशाचा कशाला पत्ता नाही आणि दिवसभर नुसती पळापळ. सणवार नाही, दोन दिवसांचं एकसारखं शेड्युल नाही. एकदम मशीनसारखं काम करावं लागतं.

याच भावनेतून कदाचित चीनमध्ये एक ‘रोबोट’ पत्रकार तयार करण्यात आला आहे. या रोबोट पत्रकाराचं नाव आहे झाओ नान. या रोबोटने नुकतंच एक ३०० शब्दांचा लेख लिहून पूर्ण केला. शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार हा लेख या रोबोटने एका सेकंदात लिहित पूर्ण केला. हा लेख सदर्न मेट्रोपोलीस डेली या तिथल्याच एका पेपरमध्ये छापून आलाय.तिथल्या सणासुदीच्या काळात तिथे होणाऱ्या गर्दीवर हा लेख या रोबोटने लिहिला आहे.चीनमधल्या बीजिंग युनिव्हर्सिटीमधल्या अभ्यासकांचा एक गट हे रोबोट तयार करण्याच्या प्रकल्पावर काम करत आहे.

या गटाने शाओ नान हा रोबोट तयार केला आहे. हा रोबोट सध्या लहान आणि विस्तृत असे दोन्ही प्रकारचे न्यूज रिपोर्ट तयार करू शकतो.

शाओ नान रोबोटने लिहिलेला हा न्यूज रिपोर्ट या अभ्यासकांच्या गटाने तपासला तेव्हा त्यांना त्या पेपरमधल्या रिपोर्टर्सनी लिहिलेल्या रिपोर्टर्सपेक्षा चांगला आढळला. मिळालेल्या माहितीचं विश्लेषण हा रोबोट मानवी रिपोर्टर्सपेक्षा चांगल्या पध्दतीने करू शकतो असं आढळून आलं. यामुळे या वर्तमानपत्रात काम करणारे रिपोर्टर आश्चर्यचकित झाले.

पण रोबोट रिपोर्टरने लेख लिहिला म्हणजे मानवी पत्रकारांची सद्दी संपली असं नाही. अजूनही एका माणसाची प्रत्यक्ष मुलाखत रोबोट संपूर्णपणे घेऊ शकत नाही. मानवी चेहऱ्यावरचे सूक्ष्म हावभाव लगेच टिपत त्यावरून संभाषण पुढे नेण्याचं कौशल्य या प्रकारच्या रोबोट्समध्ये अजून आलेलं नाही.

पण मानवी पत्रकारांना पूरक असं काम हे रोबोट्स नक्कीच करू शकतात असं या प्रकल्पावर काम करणाऱ्या अभ्यासकांचं मत आहे.