‘ढिंच्याक पूजा’.. हे नाव एव्हाना सगळ्यांनाच चांगलं परिचयाचं झालं आहे. ‘love her or hate her but you can’t ignore her’ असं बोलण्याची वेळ नेटिझन्सवर आलीय. कधीतरी अकारण वादांमुळे एखाद्या व्यक्तीला खूप प्रसिद्धी मिळते. तसाच काहीसा प्रकार तसंच ढिंच्याक पूजाच्या बाबतीतही घडला आहे. गेले काही दिवस ढिंच्याक पूजाचे व्हिडिओ येणे बंद झालं होतं. काही महिन्यांपूर्वी ढिंच्याक पूजाचे व्हिडिओ युट्यूबवरून काढून टाकण्यात आले होते. पण या अपयशाने ‘हिरमुसून’ न जाता ढिंच्याक पूजा परत आली आहे. ती आता ‘बापू दे दे थोडा कॅश’ हे नवं गाणं घेऊन आली असून सध्या सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे.

जुलै महिन्यात कथप्पा सिंह याच्या विनंतीवरून युट्युब चॅनेलवरून ढिंच्याक पूजाचे १२ व्हिडिओ हटवण्यात आले होते. तत्पूर्वी एका गाण्यामुळे दिल्ली पोलिसांनी तिच्यावर कारवाई केली होती. ‘दिलो का स्कूटर’ या गाण्याचं चित्रिकरण करताना हेल्मेट घातलं नाही आणि वाहतुकीचे नियम मोडले म्हणून तिच्यावर दिल्ली वाहतूक पोलिसांनी कारवाई केली होती. त्यामुळे जुलैपासून ढिंच्याक पूजा सोशल मीडियापासून चार हात लांबच होती. पण आता ती तिचं ‘बापू दे दे थोडा कॅश’ हे गाणं घेऊन परत आलीय.

वाचा : ‘बिग बॉस’मध्ये ढिंच्याक पूजाला मिळणार इतरांपेक्षा जास्त मानधन

‘ढिंच्याक पूजा’ बिग बॉसच्या ११ व्या सिझनमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी होणार असल्याची चर्चा आहे. ‘बिग बॉस’ तिला इतर स्पर्धकांपेक्षा जास्त मानधन देणार असल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे. पण अजूनही ‘बिग बॉस’च्या स्पर्धकांची अंतिम यादी आलेली नाही.