बालपणात कोणी वातावरणाच्या अंदाजावर आपला खेळ मांडत नाही. रशियाच्या निज्नी तागिल शहरात त्या चिमुकल्यांनी देखील अशाच प्रकारे आपला खेळ मांडला होता. रस्त्यावर पसरलेल्या बर्फात तीन वर्षाचा चिमुकला आपल्या बहिणीसोबत खेळत असताना बर्फामुळे अदृश्य झालेल्या खड्ड्यामध्ये पडल्याची एक घटना समोर आली आहे. या घटनेतील जखमी चिमूकल्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. बर्फवृष्टी झाल्याने परिसरातील रस्त्यावर बर्फ साचला होता. हे दृश्य बालमनाला आकर्षित करणारे असे होते. त्यामुळे बर्फवृष्टी थांबल्यानंतर खेळाचा आनंद घेण्यासाठी एका चिमूकलीने आपल्या ३ वर्षाच्या भावासोबत आपल्या अंगणात डाव मांडला. अंगणातील रस्त्यावर आपल्याला धोका निर्माण होईल याची कल्पना या चिमुकल्यांना बिलकूलच नव्हती. भावा बहिणीचा पाठशिवणीचा डाव रंगला असताना, बर्फामुळे झाकोळलेल्या खड्ड्याजवळ दोघांचाही पाय घसरला. या घटनेत चिमुकलीने स्वत:ला कसेबसे सावरले. मात्र तिचा भाऊ या खड्यात पडला. आपल्या भावाला खड्यात पडल्याचे पाहून या मुलीने घराच्या दिशेने धाव घेतली. तर या चिमूकलीच्या डोळ्यातील पाणी आणि तिची तळमळ पाहून या ठिकाणी उभ्या असणाऱ्या सुरक्षा रक्षकाने त्या खड्याच्या दिशेने धाव घेतली. मात्र खड्यात पडलेल्या त्या मुलाला वाचविण्यासाठी त्याला खड्यात उतरविण्याचे धाडस झाले नाही. काही वेळानंतर या ठिकाणी अनेक लोक जमा झाले. त्यातील एकाने धाडसाने खड्यात उतरवून या चिमूकल्याला बाहेर काढले. या मुलाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होताना दिसत आहे.